-->
कांद्याने केला वांदा

कांद्याने केला वांदा

शुक्रवार दि. 06 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कांद्याने केला वांदा
कांद्याच्या भावातील चढउतार आता नेहमीचाच झाला असला तरी यावेळी निर्माण झालेली स्थिती अभूतपूर्व अशीच आहे. कांद्याच्या भावाचे दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. मोठ्या शहरात तर कांद्याची किंमत 150 रुपयांच्या जवळ येऊन ठेपली आहे. सोशल मिडियावर कांद्याविषयी जोक्सला उधाण आले आहे. त्यातून जनतेचा संताप व्यक्त होत आहे. सध्या सोशल मिडियावर असा प्रकारे संताप व्यक्त करण्याशिवाय जनतेच्या हातात काही राहिलेले नाही. त्यामुळे सध्या कांदा सोशल मिडियावर जोरात झळकत आहे. सोशल मिडिया वगळता कांद्याच्या दरांची चर्चा फारशी होताना काही दिसत नाही. कांदा महागल्याने साहजिकच सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडून पडले आहे. सर्व स्तरांतून कांदा भाववाढीबाबत ओरड सुरू आहे, मात्र दुसरीकडे शासनस्तरावर मात्र धोरण सातत्याअभावी हा प्रश्‍न अधिकाधिक जटिल बनत चालला आहेे. कांदा हे काही अत्यावश्यक नाही असे असले तरीही त्याची प्रत्येकाला नितांत गरज लाभते. गरिबातला गरीबही कांदा-भाकरी खाऊन संतुष्ट राहतो. त्यामुळे कांंद्याची नाळ केवळ पैशेवाल्यांशी नाही तर श्रमजीवींशी जास्त जोडली गेली आहे. कांदा हे आपल्याला त्यामुळे टाळता येत नाही. भारतीय पाककृतींमधील कांदा हा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याचबरोबर त्याचे विविध रोगांवर गुणकारी असल्याने कांदा ही आपली गरज आहे. एकवेळ कितीही गोड वाटत असला तरी आंबा खाणे टाळले जाऊ शकते. द्राक्ष व फणसाचीही तशीच स्थीती आहे. मात्र कांदा काही जेवणात टाळता येणार नाही. इतिहासात प्रथमच घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिक्विंटलला पंधरा हजारांच्या घरात गेले आहेत. साधारणपणे नोव्हेंबरअखेरीस कांद्याचे दर चढेच असतात. पण, यंदा उन्हाळी कांदा संपुष्टात येऊनही खरिपाचा कांदा बाजारात येऊ शकला नाही. मध्यंंतरी झालेल्या अतिपावसाने कांद्याचे अमाप नुकसान केले. त्यामुळे सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा प्रचंड आटला आहे. लासलगावच्या बाजारतळावरसुद्धा कांदा मुश्किलीने दृष्टीस पडत आहे. मागणी आणि पुरवठ्यातली ही प्रचंड तफावत या समस्येचे मूळ आहे. अर्थात या कांद्याच्या दराच्या वाढीचा फायदा शेतकर्‍यांना होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे खिसे भरत नाहीत तर सट्टेबाजांचे अच्छे दिन आले आहेत. सरकारने यावर उपाय म्हणून कांद्याच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय योजण्याची गरज आहे. सहा महिन्यांपूर्वी सरकारने कांदा उत्पादकांना 200 रुपयांचे अनुदान देऊन त्यांची चेष्टाच केली होती. खरे तर शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहता, त्यांना प्रत्येकी 500 रुपये अनुदान धेण्याची मागणी केली जात होती. परंतु शेतकर्‍यांच्या तोंडाला अखेर या सरकारने कमी अनुदान देऊन पानेच फुसली आहेत. सहा महिन्यांपूर्वीच शेतकर्‍यांना त्यांना झालेल्या खर्चापेक्षा कितीतरी पट कमी उत्पन्न हातात येत असल्यामुळे अनेकांनी तो बाजारात जाऊन विकण्यापेक्षा रस्त्यावर फेकणे पसंत केले. शेतकर्‍यांनी नासधूस करुन नये हा शहरी मध्यमवर्गीयांचा सल्ला आपण समजू शकतो, परंतु हा शेतकरी एवढा हतबल झाला होता, की त्याला आपला कृषी माल असाच फेकून देण्याशिवाय काही पर्याय राहिला नव्हता. नाशिकजवळील एका शेतकर्‍याने आपल्याला शेकडो टन माल विकूनही केवळ सोळाशे रुपयांचा आलेला मोबदला पंतप्रधानांना मनीऑर्डर करुन पाठविला होता. परंतु तेथील उद्दाम नोकरशाहीने ती मनीऑर्डर तर परत पाठविलीच शिवाय या प्रकरणाची चौकशी सुरु केली. यात असा निकर्ष काढण्यात आला की, सदर शेतकर्‍याचा माल हा जुना होता त्यामुळे त्याला योग्य तो भाव आला नाही. आपल्याकडील नोकरशाही कशी वागते हे आपल्याला यातून समजते. अर्थात मोदींनी यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले. कांद्याचा हा प्रश्‍न पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता शेतकर्‍यांचा हा प्रश्‍न म्हणून सोडविला गेला पाहिजे. गेले किमान दहा वर्षे तरी कांदा हा उत्पादकांना, राजकारण्यांंना व ग्राहकांनाही आलटून पालटून रडवत आला आहे. त्यावर कायमस्वरुपी उपाय काढणे शक्य आहे. मात्र त्यासाठी शेतकर्‍यांसाठी मनापासून काम करण्याची इच्छाशक्ती हवी. कांदा उत्पादकांना नुकसानभरपाई म्हणून अनुदान देणे हे एक तात्तपुरती उपाययोजना झाली. परंतु, अनुदान देऊन विशेष काही साध्य होत नसल्याचे आजवर आढळले आहे. कांद्याचे उत्पादन कधी विक्रमी होते तर कधी कमी. एकूण काय तर कांदा ग्राहक व शेतकर्‍यांचा असा दोगांचाही वांदा करतो. कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले तर त्याची निर्यात शेजारच्या देशात किंवा अन्य राज्यात तो माल पाठविता येईल किंवा नाही त्याची योजना आखावी लागेल. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून असंघटित कांदा उत्पादकांना संस्थात्मक स्वरूपात जोडण्याबरोबरच पायाभूत सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे. हे सर्व करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत कांदा रडवतच राहाणार.
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "कांद्याने केला वांदा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel