-->
रजनीकांत का चिडले? / निरव मोदीची धमकी

रजनीकांत का चिडले? / निरव मोदीची धमकी

सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
रजनीकांत का चिडले?
विविध मुद्द्यांवर जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करणारे दक्षिणेतील नामवंत अभिनेते रजनीकांत यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने संपूर्ण दशात खळबळ माजली आहे. भाजपकडून मला भगवा रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपने तमिळ कवी आणि ज्येष्ठ विचारवंत थिरुवल्लावर यांच्या बाबतीतही हेच केले. परंतु आम्ही दोघेही भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केल्याने रजनीकांत हे मोदींची स्तुती करीत असले तरी ते काही बगव्.ा विचारांने प्रभावित झाले नव्हते असे म्हणावे लागेल. आपल्याला भाजपकडून पक्षात येण्याची कोणतीही ऑफर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रजनीकांत यांनी पंतप्रधानांचे कायम कौतुक केल्यामुळे त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे बोलले गेले. परंतु त्यांनी स्पष्टपणे भाजपच्या जाळ्यात अडकणार नसल्याचे सांगितल्याने तामीळनाडूतील राजकारणाला एक वेगळाच व्टीस्ट मिळाला आहे. तामिळनाडूमध्ये ज्येष्ठ विचारवंत थिरुवल्लावर यांच्या विचारांना आदराचे स्थान आहे. पण थिरुवल्लावर यांच्या बाबतीत भाजप राजकारण करत असल्याचा आरोप तामिळनाडूतील स्थानिक पक्ष करत आहेत. याची सुरुवात अलिकडेच झाली. थिरुवल्लावर यांच्या पुतळ्याला तामिळनाडू भाजपकडून भगवी वस्त्र परिधान करण्यात आल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. भाजप संतांनाही राजकारणात आणत असल्याचा आरोप डाव्या पक्षांसह डीएमकेनेही केला होता. भाजपाच्या या भगवीकरणाला तामीळनाडूत सर्व थरातून विरोध होणे स्वाभाविक होते. थिरुवल्लावर यांचा जन्म मैलापूरमध्ये झाला. थिरुवल्लावर हे दोन हजार वर्षांपूर्वी तामिळनाडूचे प्रसिद्ध कवी होऊन गेले. त्यांनी 1330 पानांचे प्रसिद्ध थिरुक्कुराल हे धर्मनितीशास्त्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच थायलंड दौर्‍यात तमिळ भाषेतील या धर्मनितीशास्त्राचे थाय भाषेत प्रकाशन केले. त्यानंतर खरे या तामीळनाडूतील भगवीकरणाला भाजापाकडून प्रारंभ झाला असे म्हणता येईल. नुकतेच रजनीकांत यांनी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना त्यांनी कृष्ण आणि अर्जुनाची उपमा दिली होती. त्यानंतरच हे नवीन रामायण घडले आहे. आपण कोणत्याही पक्षाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर करणार नाही, मात्र भाजपच्या जाहीरनाम्यातील नदीजोड प्रकल्पाचे स्वागत आहे, अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली होती. शिवाय मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील आणि भाजपच्या स्वबळावर 300 पेक्षा जास्त जागा येतील, असा अंदाजही रजनीकांत यांनी एप्रिल 2019 मध्ये वर्तवला होता. त्यानंतर रजनीकांत हे भाजपा व मोदींचे समर्थक असल्याचे एक चित्र निर्माण झाले होते. तिकडे दुसरे एक अभिनेते कमल हासन हे मात्र सुरुवातीपासूनच मोदींचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र रजनीकांत असे का बरे मोदींवर चिडले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निरव मोदीची धमकी
मला भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करीन, असे पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीने ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात सांगितले. यावेळी कोर्टाने त्याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला. मला तीन वेळा तुरुंगात मारहाण करण्यात आल्याचा दावाही त्याने केला. मात्र, त्याने केलेल्या या बतावणीचा न्यायाधीशांवर काहीही परिणाम झाला नाही. याउलट पुन्हा एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला गेला. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीने जामीनासाठी आजवर पाचव्यांदा अर्ज केला होता. पीएनबी संबंधित प्रकरणात भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंबंधीचा खटला तो लढत आहे. नीरवला वेंड्सवर्थ तुरुंगात दोनदा मारहाण झाली. त्याचे वकील कीथ यांच्या दाव्यानुसार, सकाळी साधारण नऊ वाजल्यानंतर अन्य दोन कैदी नीरच्या सेलमध्ये गेले. त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि नीरवला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नीरव त्यावेळी फोनवर बोलत होता. हा हल्ला कटाचा भाग होता. त्याला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले होते. नीरव मोदीचा वैद्यकीय अहवाल लीक झाल्याचा उल्लेख करत कीथ यांनी ही घटना सांगितली. तुरुंग अधिकार्‍यांनी या घटनेनंतर कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्याने केलेली विनंतीही धुडकावून लावण्यात आली, असेही कीथ यांनी सांगितलं. नीरव मोदीचा उल्लेख माध्यमांमध्ये कोट्यधीश हिरे व्यापारी असा होत राहिला तर यापुढील काळातही त्याच्यावर अशाच प्रकारे हल्ले होतील, असा कीथ यांचा दावा आहेे. यावेळी प्रथमच नीरवने आत्महत्येची धमकी दिली. मला भारताकडे सोपवले तर मी स्वतःला संपवेल, असे तो म्हणाला. भारतात निःष्पक्ष सुनावणी होईल अशी अपेक्षा नाही, असेही त्याने सांगितले. तरीही त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळून लावण्यात आला. भारत सरकारच्या विनंतीनंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली होती. नव्याने केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्याने नीरव मोदीला मोठा दणका बसला आहे. आता तो आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. निरव हा भारताचा गुन्हागार आहे व त्याला भारताच्या ताब्यात देणे ब्रिटनच्या सरकारचे काम आहे. त्याच्या आत्महत्येच्या धमक्या पोकळ आहेत. भारतात आल्यास आपल्या शिक्षा भोगावी लागणार असल्यानेच तो ही धमकी देत आहे.
-----------------------------------------------

0 Response to "रजनीकांत का चिडले? / निरव मोदीची धमकी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel