-->
हा खेळ आकड्यांचा

हा खेळ आकड्यांचा

बुधवार दि. 13 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
हा खेळ आकड्यांचा
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपाकडे शिवसेनेने सत्तेतील वाटा 50 टक्के मागितला होता. परंतु त्यावरुन युतीमध्ये तब्बल पंधरा दिवस घोळ सुरु होता. शेवटी भाजपाने सरकार स्थापनेस नकार दिला आणि आकड्यांच्या खेळातील पहिला अंक संपुष्टात आला. त्यानंतर राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरु झाला. सत्तेचा दावा करणार्‍या शिवसेनेला बहुमतासाठी आवश्यक पाठिंब्याची पत्र दाखवणे काही जमलेले नाही. यात कॉँग्रेसने घोळ घातला व दिल्लीतील नेत्यांनी ही समिकरणे विस्कटून टाकली असे आरोप झाले. खरे तर या आकड्यांच्या गणितात राष्ट्रवादीने गेम केला व शिवसेनेला पहिला दणका दिला. मात्र हा गेम अशा रितीने केला की त्यात शिकारी हा कॉँग्रेस ठरला. नेहमीप्रमाणे पवारांची रणनिती याला कारणीभूत होती अशी दबक्या आवाजातली चर्चा सुरु होती. यातील खरे काय आणि आणि खोटे काय हे काळाच ठरविल. यानंतर राज्यपालांनी राज्यातला तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रित केले. सध्याच्या या घटना म्हणजे चॅनेलवाल्यासाठी एक मोठी पर्वणीच ठरली आहे. एका चॅनेलने तर काऊंट डाऊन करणारे घड्याळच दिवसभर प्रसिद्द केले होते. जसे काही हे घड्याळ संपले की सत्तेचे रॉकेट हवेत उडणारच होते. मराठी चॅनेल्सनी तर दर मिनिटालाच बातम्यांचा धडाका लावला होता. त्यात अनेक अफवाही बातम्या म्हणून आदळल्या जात होत्या. कॉँग्रेसचे पत्र तयार, राष्ट्रवादीचे पत्र तयार, कॉँग्रेस मुख्यलयातून राष्ट्रभवनात फॅक्स, शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे, दोन्ही कॉँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद  इत्यादी बातम्या म्हणजे केवळ गॉसिपच होती आणि त्या बातम्या म्हणून खपविल्या गेल्या. ज्यावेळी शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपालांना जाऊन भेटले व बाहेर येऊन पत्रकारांना त्यांनी परिस्थीती नेमकी काय आहे ते सांगितल्यावर खर्‍या राजकीय घडामोडी समजल्या. तोपर्यंतच विविध चॅनेल्स केवळ हवेत बातम्यांचे पतंग उडवत होते. त्या बातम्यांची जर छाननी केली गेली असती तर त्यातील अनेक बातम्या खोट्या होत्या हे उघड होईल. परंतु ब्रेकिंग बातम्या देण्याच्या नादात आपण खोट्या बातम्या देऊन प्रेक्षकांची दिशाभूल करीत आहोत याचा विचार कोणतेच चॅनेेल करताना दिसत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही पक्षाचा नेता मिडियासमोर आला की, त्याभोवती गराडा घालून एकत्रच सर्वच पत्रकारांनी प्रश्‍नांचा भडीमार करायचा, हे दिसताना किती ओगळवाणे दिसते याची कल्पनाही या चॅनेल्सच्या पत्रकारांना येत नाही का, असा सवाल पडतो. एकाद्या नेत्यासमोर एकेक पत्रकार शांतपणाने का प्रश्‍न विचारत नाही? एकाच वेळी प्रश्‍न विचारुन कलकलाट करण्याचा उद्देश काय असतो, हे काही समजत नाही. त्यातच काही पत्रकार दुसर्‍याला ए तुझे डोके बाजुला कर अशा देत असलेल्या सूचनाही संतापजनक असतात हे त्यांना का समजत नाही? चॅनेल्सच्या पत्रकारांना यासंबंधी प्रशिक्षण देण्याची गरज वाटते. असो, निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 19 दिवस उलटले तरी राज्याचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. याची चिंता चॅनेल्सवर कधीच पडलेली नसते. आपला टी.आर.पी. वाढावा यासाठी गॉसिपही बातम्या म्हणून दाखविण्याचा प्रकार निंदनीय आहे. प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्याच्या निवडणुकीत एकदाही 288 पैकी किमान 75 जागा जिंकता आलेल्या नाहीत. सेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना 1995 मध्ये सर्वाधिक 73 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी अयोध्या प्रकरणामुळे देशात जहाल हिंदुत्वाची चर्चा होती. सेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेने 2014 मध्ये 63 आणि 2019 मध्ये 56 जागांवर विजय मिळवला आहे. याउलट राष्ट्रीय पक्ष अशी स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या भाजपाने राज्यात 1995 मध्ये 65, 2014 मध्ये 122 आणि 2019 मध्ये 105 जागांवर विजय मिळवला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. या पक्षाने 2004 मध्ये सर्वाधिक 71 जागा, 2009 मध्ये 62, 2014 मध्ये 41 आणि 2019 मध्ये 54 जागा जिंकल्या. तर दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाने 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त 44 जागांवर विजय मिळवून राज्यात चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. एकेकाळी कॉँग्रेसचे हे राज्य म्हणजे बालेकिल्ला होता, हे विसरुन चालणार नाही. त्या स्थितीवरुन कॉँग्रेसची एवढी वाताहात झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा सोडला तर एकाही पक्षाने जाागंची शंभरी ओलांडलेली नाही. मणिपूर, गोवा, बिहार, मेघालय या राज्यात सर्वात मोठा पक्ष नसतानाही केंद्रात असलेल्या सत्तेच्या जीवावर भाजपाने तेथे सत्ता हस्तगत कशा प्रकारे केली हे आपण पाहिले आहे. तोच पक्ष महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सत्ता स्थापन करता येत नाही असे सांगतो, हे अनाकलीन वाटते. त्यामुळे हा सर्व आकड्यांचा खेळ असला तरी यामागचे सत्ताकरणाचे राजकारण दिसेत तेवढे सोपे नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. यात कोणही कोणाचा शत्रू नाही की मित्रही नाही... हे मात्र पटण्यासारखे आहे.
----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "हा खेळ आकड्यांचा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel