-->
आयटकचे शताब्दी वर्ष

आयटकचे शताब्दी वर्ष

रविवार दि. 03 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
आयटकचे शताब्दी वर्ष
--------------------------------------
इंग्रज वसाहतवाद्यांचे भारतावर राज्य असताना स्वातंत्र्यपूर्वकाळात 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई शहरात आयटक या भारतातील सर्वात जुन्या व पहिल्या कामगार संघटनेची स्थापना झाली. त्यापूर्वीही देशात कामगार संघटना होत्या. स्थानिक पातळीवर, उद्योगापूरत्या, प्रादेशिक पातळीवर, औद्योगिकीकरणाच्या काही वर्षानंतर छोट्या-मोठ्या कामगार संघटना जन्मास आलेल्या होत्या. बॉम्बे मील हँडस असोसिएशन ही नारायण मेघाजी लोखंडे यांची संघटना होेती. तसेच देशभरात स्थानिक पातळीवर संघटना कार्यरत झाल्या होत्या. अशा देशभरातील कार्यरत असणार्‍या संघटना मुंबईत एकत्र आल्या व या सर्व संघटनांनी महासंघ निर्माण केला. ऑल इिंउया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या नावाने महासंघ 31 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन झाला. 64 कामगार संघटना या महासंघाशी अर्थात आयटकशी या स्थापना अधिवेशनातच संलग्न झाल्या. भारताच्या कामगार चळवळीत महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या 100 वर्षाच्या लढ्याची, त्यागाची परंपरा असलेल्या आयटकने आता शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्ताने वर्षभर चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयावरील वाङमयाचे प्रकाशन, मेळावे आदी विविध मार्गाने हे संपूर्ण वर्ष देशभर साजरे होणार आहे. बरोबर 99 वर्षापूर्वी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली आयटकचे स्थापना अधिवेशन चर्चगेट जवळच्या न्यू इंपिरियल थिएटरमध्ये भरले होते. आयटकचे पहिले अध्यक्ष होण्याचा मानही लाला लजपतराय यांनाच मिळाला होता. त्यानंतर दत्तोपंत ठेंगडी, जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, व्ही.व्ही. गिरी, एस.ए. डांगे, एस.एस. मिरजकर यासारखे अनेक दिग्गज नेते आयटकच्या अध्यक्षपदी लाभले होते. जागतिक औद्योगिक क्रांतीच्या नंतर पाश्‍चिमात्य देशात कारखानदारीची सुरुवात भारतापेक्षा लवकर झाली. उद्योगधंदे लवकर आल्यामुळे तेथे कामगार संघटनाही भारतापेक्षा लवकर उदयास आल्या. भारतात मात्र 1853 साली मुंबईत पहिली कापड गिरणी स्थापन झाली आणि औद्योगिकरणास प्रारंभ झाला. त्यानंतर लगेचच कामगार संघटनांचाही जन्म झाला. मुंबईनंतर नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अहमदाबाद आदी विविध ठिकाणी टेक्सटाईल मिल्स व बंगालमध्ये तागाच्या गिरण्या सुरु झाल्या. इंग्रज राजवटीत उशिरा का होईना पण आधुनिक उद्योग धंद्याची सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातून कामगारांचा लोंढा अशा कारखान्याकडे येऊ लागला. अशिक्षित, शेती व्यवस्थेशी संबंधीत व जाती-जातीत विभागलेल्या या कामगारांचे शोषण करणे कारखानदारांना, भांडवलदारांना सोपे होते. प्रारंभीची काही वर्षे शोषण सहन केलेले कामगार जमेल तसा आवाज उठवू लागले. यातून कामगार पुढारी उदयास आले, कामगारांना संघटीत करु लागले. या संघर्षातून पहिला कारखाना कायदा 1881 साली इंग्रज सरकारने अस्तित्वात आणला. दुसरीकडे सोव्हिएत युनियनमध्ये कॉ. लेनिनच्या नेतृत्वाखाली 1917 साली जी क्रांती झाली त्याचे परिणाम भारतातील कामगार चळवळीवरही होत होते. देशभरात विखूरलेल्या कामगार संघटनांनी एकत्र येऊन आयटक स्थापन करण्यामागे रशियन क्रांतीची ही पार्श्‍वभूमी होती, त्याचा प्रभाव होता. कामगारांमध्ये वर्ग म्हणून जाणीवा निर्माण करण्याचा यानंतरच्या काळात प्रयत्न झाला. स्वातंत्र्याच्या आंदोलनाशीही भारतातील कामगार चळवळीची नाळ जोडली गेली. टिळकांना झालेल्या अटकेनंतर कामगारांनी त्याच्या निषेधार्थ केलेली कृती व भारतातील कामगारवर्ग राजकीयदृष्ट्या जागृत होत आहे ही लेनिनने केलेली टिपणी महत्त्वाची होती. कामगार चळवळीने स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेली नाळ 1946च्या नाविकांच्या उठावापर्यंतही तुटली नाही. नाविकांसह या उठावात मुंबईचा गिरणी कामगारही सहभागी होता. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडून घेणाचा आयटकच्या नोव्हेंबर-डिसेंबर 1921 साली झालेल्या दुसर्‍या अधिवेशनातील पहिलाच ठराव होता. आयटकची शक्ती वाढत होती, कामगारांत वर्गीय जाणीवा निर्माण झालेल्या होत्या, सोविएत क्रांतीचा प्रभाव होताच. म्हणूनच ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात त्यांनी दंड थोपटले होते. एकीकडे चिवट लढे करुन 1881च्या कारखाना कायद्यात बदल करावयास भाग पाडणे, खाण कायदा बदलावयास लावणे, प्रसूति रजेसाठी आग्रही असणे, 1926 चा ट्रेड युनियन कायदा करावयास भाग पाडणे इ.साठी संघषर्र् तीव्र झाले होते. या संघर्षामुळेच कामगारांना कायद्यांचे कवच प्राप्त होत होते. कामगारांच्या मागण्या ऐरणीवर आणल्या जात होत्या, तर त्याचवेळी इंग्रज साम्राज्यवाद्यांना घालवून देणार्‍या स्वातंत्र्य आंदोलनातही कामगार वर्ग आघाडीवर होता. भारतातील दीडशे वर्षाच्या कामगार चळवळीच्या इतिहासात 100 वर्षाच्या आयटकचे योगदान मोलाचे ठरलेले आहे. कामगार वर्गाने प्रचंड लढा करुन जे मिळवले ते काढून घेण्याचे प्रयत्न सत्तेवर बसलेले पक्ष व सत्ताधारी वर्ग आज जोमाने करीत आहेत. कामगार कायदे बासनात गुंडाळले जात आहेत, संघटीत क्षेत्र कमी करुन असंघटीत क्षेत्राला सूज आणली जात आहे. सेवा सुरक्षा, पेन्शन, किमान वेतन, कल्याणकारी सुविधा सर्वच निकाली काढले जात आहे. जाती अस्मितांचा वापर करुन जात जाणीवा मजबूत केल्या जात आहेत, वर्ग जाणीवा ठिसूळ केल्या जात आहेत. कामगार वर्गासह शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक, कारागीर आदीवर हल्ले वाढले आहेत. धर्माचा, देशप्रेमाचा खुबीने वापर केला जात आहे. कामगार चळवळीसमोरील ही मोठी आव्हाने आज उभी आहेत. कामगारांनी संघर्ष करुन ज्या सवलती मिळविल्या, जे कामगार हक्काचे कायदे केले त्याला पायदळी तुडवले जात आहेत. कंत्राटी कामगार पध्दतीने कामगार वर्गाचे कंबरडे पार मोडले जात आहे. कामगारांना, कर्मचार्‍यांना व व्हाईट कॉलर कामगारांना पगारवाढीचे आमीष दाखवून त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. सेवा क्षेत्रात गेल्या दशकात मोठे रोजगार निर्माण झाले परंतु येथील सुक्षिशित कामगार, कर्मचारी अत्यंत असुरक्षीत जीवन जगत आहे. गिरमी संपानंतर कामगारातील राजकीय जाणीवा संपुष्टात येऊ लागल्या व कामगार वर्गही आर्थिक नफ्याकडे पाहू लागला. यातून त्याचा चळवळीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. कामगार युनियन हा एक व्यवसाय झाला. कामगारांसाठी ते एक पगारवाढ करुन देणारे मशिन ठरले. असा स्थितीत विविध कामगार वर्गाची आव्हाने पुढे आ वासून उभी असताना आयटकचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. आयटक ही ध्येयवादी कामगार संघटना म्हणून गेल्या शतकात नावारुपाला आली, हे वास्तव असले तरी त्यांच्यापुढे भविष्यात मोठी आव्हाने आहेत.
---------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "आयटकचे शताब्दी वर्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel