-->
छत्रपतींनाही विसरले / कारवाई कधी होणार?

छत्रपतींनाही विसरले / कारवाई कधी होणार?

शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
छत्रपतींनाही विसरले
सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा आहेत. केवळ एवढेच नव्हे तर छत्रपतींच्या वारसांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना पक्षाचे तिकिटीही दिले आहे. यातून आपम छत्रपतींच्या विचारांचे किती निष्ठावान पाईक आहोत असे या सत्ताधार्‍यांना दाखवून द्यायचे आहे. परंतु त्यांचे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम किती बेगडी आहे हे दाखविणारे प्रकरण आता उघड झाले आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याचे समोर आले आहे. महतवचे हे सर्व यंदाच्या वर्षापासून केलेले असल्याने याचा दोष यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांवरही त्यांना देता येणार नाही. भर निवडणुकीचा प्रचार सुरु असाताना हे प्रकरण उघड झाल्याने जनतेतून सत्ताधार्‍यांविषयी संताप व्यक्त होत आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणार्‍या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. पण त्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्यात आल्याचे कर्म या सरकारने केले आहे. सध्याचे सरकार इतिहास फुसून टाकायला बघत आहे व त्यासंबंधी सर्वत्र जी टीका होते त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांनीही या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. यांचं धाडसच कसं झालं? असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा भाजपचा कट असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणार्‍या सरकारनेच केला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून चौथीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद आहे तसेच छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट असल्याचे म्हणत शिवछत्रपतींचा अपमान करणार्‍या भाजपला 21 तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे छत्रपतींचा इतिहास सांगणारा धडा सरकारने वगळला असताना दुसरीकडे मात्र छत्रपतींचे नाव घेत मतांचा जोगवा पंतप्रधानांपासून सर्व भाजपावाले मागत आहेत. महत्वाचे म्हणजे छत्रपतींचा सर्वधर्मीयांना सोबत घेऊन जाण्याचा इतिहास या सरकारला जनतेपुढे आणावयाचा नाही हा खरा यामगचा उद्देेश आहे.
कारवाई कधी होणार?
पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या अंतर्गत तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. बँकेच्या नोंदींतून एकूण 10.5 कोटी रुपये गहाळ असल्याचे या पथकाने म्हटले आहे. एचडीआयएल आणि त्यासंबंधित कंपन्यांनी दिलेले अनेक धनादेश या पथकाला सापडले आहेत. हे धनादेश कधीही बँकेत जमा झाले नाहीत, तरीही त्यांना रोख रक्कम देण्यात आली. तसेच, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की हा घोटाळा 4,355 कोटींचा नाही तर 6,500 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आहे! पीएमसी बँकेच्या अंतर्गत तपासणी पथकाला मिळालेल्या धनादेशांची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त आहे. उर्वरित 50-55 लाख रुपयांचा कुठलाही हिशेब नाही. या व्यतिरिक्त बँक अधिकार्‍यांनी यापूर्वी घोटाळ्याची रक्कम 4,355 कोटी रुपये असल्याची नोंद केली होती, जी आता 6,500 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. बँकेच्या रेकॉर्डमधून 10.5 कोटी रुपये गहाळ झाल्याची माहिती मिळाली आहे. आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या आदेशाने बँकेच्या आर्थिक व्यवहारांची अंतर्गत चौकशी केली जात आहे. या तपासणीतच घोटाळ्याची रक्कम जास्त असल्याची माहितीही समोर आली आहे. एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांना रोकड हवी होती असे तपासात उघड झाले आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षात बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना धनादेश पाठविले. थॉमस यांनी त्यांना रोख रक्कम दिली पण धनादेश बँकेत जमा केले नाहीत. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्ये चेकची एन्ट्री नाही. थॉमस यांनी 50-55 लाख रुपये स्वत:कडे ठेवल्याचाही संशय व्यक्त होत आहे. पी.एम.सी. बँकेच्या या घोटाळ्यामागे भाजपाचे अनेक नेते आहेत हे आता उघड सत्य आहे. परंतु अजूनही यामागे असलेल्या राजकीय व्यक्तींना अभय देण्यात आले आहे. त्यांच्यावर कधी कारवाई होणार हा करा सवाल आहे.
-----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "छत्रपतींनाही विसरले / कारवाई कधी होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel