-->
अलिबागेत शेकापच का ?

अलिबागेत शेकापच का ?

रविवार दि. 20 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
अलिबागेत शेकापच का ?
--------------------------------------
मतदाराने आपले अमूल्य मत देताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत? कारण आपले मत हे खरोखरीच आपल्या भागातील विकासासाठी तसेच देशात शांतता व सौदार्ह्यासाठी कामी आले पाहिजे. अशा प्रकारे आपण विचार करुनच मतदान केले पाहिजे. मग मतदान करताना कोणते निकष वापरले गेले पाहिजेत? सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या उमेदवाराला मतदान करणार तो कोणत्या पक्षाचा आहे? त्यांचे नेतृत्व कसे आहे? त्यांची ध्येयधोरणे कशी आहेत? त्या पक्षाचा इतिहास काय आहे? त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवार कसा आहे? आजवरचा उमेदवाराचा इतिहास कसा आहे? त्या उमेदवाराची क्षमता आहे का? या प्रमुख गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. सध्या आपण अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघाचा विचार करु. खरे तर हा मतदारसंघ म्हणजे शेकापचा बालेक्किला. आजवर गेल्या दहा निवडणुकांचा विचार केल्यास यात शेकापचा आठ वेळा व दोन वेळा कॉँग्रेेसचा विजय झाला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने हा शेकापचाच बालेकिल्ला आहे. गेल्या वेळी म्हणजे 2014 साली मोदी लाट असताना देखील शेकापचे उमेदवार पंडितशेठ पाटील हे 17 हजार मतांनी विजयी झाले होते. शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला पक्ष आहे. कॉँग्रेसच्या खालोखाल देशातील सर्वात जुना पक्ष अशी त्यांची ख्याती आहे. या पक्षाचे जसे नेते राज्यपातळीवर होते तसेच जिल्हा पातळीवरही सक्षम नेतृत्व या पक्षाला लाभले. आजवर रायगडात या पक्षाचे मोठे योगदान आहे. रायगडातील प्रत्येक घर, संस्था या पक्षाशी कधी ना कधी तरी निगडीत असल्याचे आपल्या जाणवेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने तळागाळात पोहोचलेला पक्ष अशी त्यांची ओळख आहे. तर त्यातुलनेत शिवसेना हा पक्ष नवीन आहे. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या उध्दारासाठी झाली हे खरे असले तरी त्यांनी नंतर आपला मोर्चा हिंदुत्ववादाकडे वळविला. सोयीनुसार पक्षाने आपल्या विचाराला सोडचिठ्ठी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मद्राशांविरोधात मुंबईत मोठे आंदोलन 70च्या दशकात उभारले होते. आता मात्र त्यांची तिसरी पिढी मतांचा जोगवा लुंगी नेसून मागत आहे. अशा प्रकारे विचारांची धरसोड शिवसेनेने केली आहे. त्याविरुध्द शेकापने आपला विचार कधी सोडलेला नाही. डाव्या विचारांशी आपली असलेली बांधिलकी तसेच सेक्युलर विचारांशी गेल्या सात दशकात कधी प्रतारणा केलेली नाही. त्यामुळे वैचारिक पातळीवर विचार करता शेकापच सरस ठरतो. शेकापचे नेतृत्व हे नारायण नागू पाटलांपासून ते प्रभाकर पाटील, दत्ता पाटील ते आता भाई जयंत पाटील यांच्यापर्यंत पाहिल्यास त्यांची नेहमीच पुरोगामी विचारांशी बांधीलकी होती व आहेे. रायगडच्या विकासातील प्रत्येक टप्प्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. आज रायगडात उभ्या असलेल्या प्रत्येक संस्थांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिह्यात शेकापच्या खालोखाल कॉँग्रेसच्या संस्था दिसतील परंतु शिवसेनेच्या अगदीच नगण्य संस्था पहायला मिळतील. याचे कारण त्यांच्याकडे संस्थात्मक काम करण्याची दृष्टी नाही. भाई जयंत पाटील यांनी ज्याप्रकारे आपल्या दूरदृष्टीतून उद्योग व्यवासय उभारले तसेच समाज उपयोगी शैक्षणिक संस्था देखील उभारल्या. शेेतकर्‍यांच्या असो किंवा नव्याने उभ्या राहिल्यातील कामगारांचे प्रश्‍न असो त्यांच्या मागे नेहमीच शेकाप उभा राहिला आहे. शिवसेनेचे जे तथाकथीत नेते आहेत ते मात्र यात कुठेच दिसत नाहीत, उलट त्यांची नावे ही तालुक्यातील भूमाफियात घेतली जातात. शेकापने शेतकरी, कामगारांचे हित तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांच्या बाजूने नेहमीच साथ दिली आहे. अगदी नारायण नागू पाटलांच्या काळातील शेतकर्‍यांचा संप आसो, त्यानंतरच्या काळातील सेझचा लढा असो, आर.सी.एफ.च्या जमीनग्रस्तांचा हक्काचा प्रश्‍न असो, अलिकडचा आन्तरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तचा लढा असो या प्रत्येक लढ्यात शेकाप हाच अग्रभागी राहिला आहे. यातून त्यांच्यामागे जिल्ह्यातील जनता ठामपणाने उभी राहिली हे विसरता येणार नाही. शेकापची पक्ष संघटना यातून उभी राहीली आहे. त्यामुळेच शेकापच्या पाठीमागे जनता गेली कित्येक वर्षे ठामपणाने उभी आहे. हीच त्यांची ताकद आहे. गेल्या सात दशकात शेकापपासून काही नेते सोडून गेले परंतु पक्ष त्यामुळे दुबळा झाला नाही. पक्षाच्या असलेल्या जाळ्यामुळेच अलिबागची जागा कायम राखण्यात त्यांना यश आले आहे, हे विसरुन चालणार नाही. अलिबाग हे मुंबईला जवळ, पण इथे पर्यटनाच्यादृष्टीकोनातून विकास सुरु व्हायला 90 साल उजाडले. भाई जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीने पीएनपी कॅटमरान सेवा सुरू झाली आणि या भागाचा चेहरा मोहराच बदलण्यस सुरुवात झाली. रेवस ते भाऊचा धक्का हा लॉन्च प्रवास कंटाळवाणा आणि सोईस्कर नव्हता. मांडव्याची जेट्टी बांधून अनेक वर्ष लोटली पण तशीच पडून होती. तीचा वापर जयंतभाईंच्या प्रयत्नाने सुरु झाला आणि अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला खर्‍या अर्थाने तिथूनच सुरवात झाली. आज मांडव्यापासून थेट मुरूडपर्यंत पर्यटकांचा ओघ चालू असतो. त्यातून अनेक उद्योग उभे राहीले, पूरक व्यवसाय वृध्दींगत झाले. अलिबाग-मुरूडच्या पर्यटन व्यवसायाचा पायाच भाई जयंत पाटील यांनी घातला असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही. या पर्यटन व्यवसायामुळे या भागातील हजारो लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाले, घरी कॉटेज सुरु करुन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. अलिबागचा पर्यटन व्यवसाय वाढीला लागला याचे आणखी एक कारण म्हणजे इथला सांप्रदायिक सलोखा. शेकापचे जुन्या पाढीतील नेते मग ते दत्तापाटील असो की प्रभाकर पाटील आणा आजच्या पाढीतील नेते मंडळी भाई जयंत पाटील, मिनाक्षीताई पाटील की पंडित पाटील, प्रशांत नाईक असोत, या सर्व मंडळींनी सर्वधर्मातील सलोखा व भाईचारा नेहमीच जपला आहे. आणि त्यामुळेच अलिबागला सांप्रदायिक दंगलीचा इतिहासच नाही. त्याचबरोबर अलिबागेतील क्राईम रेट अगदीच नगण्य असण्याचे मुख्य कारण ही सर्व नेते मंडळी आहेत. कुठल्याही दंग्याधोप्याला किंवा वैमनस्याला हि मंडळी कधीही खतपाणी घालीत नाहीत. परिणामी आज संपूर्ण अलिबाग आणि मुरूडचीही ख्याती शांत प्रदेश अशीच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चांगली हॉटेल्स, दळणवळण हे जसे आवश्यक असते तसेच किंबहूना त्याहीपेक्षा शांतता ही जास्त महत्वाची असते. अलिबागेत कधीही अगदी बिनधोक फिरा, आपल्याला कसलाही त्रास होणार नाही, हा विश्‍वासच पर्यटकांची पावले अलिबागेत वळवतो. कोकण एज्युकेशन सोसायटी ही तत्कालीन कॉन्ग्रेसच्या नेतेमंडळींनी जरी स्थापन केलेली असली तरी, सोसायटीचा खर्‍या अर्थाने विकास मात्र शेकाप नेते दत्ता पाटील यांच्याच कारकिर्दित झाला.  शिक्षणाची गंगाही तळागाळापर्यंत पोचली पोचली पाहीजे, खेड्यातील शेतकर्‍याचा मुलगा, कातकरी ठाकरवाडीवरील माझ्या बांधवाची मुलगी शिकली पाहिजे, ती सरकारी नोकरीत उच्च पदस्त राहिली पाहिजे हा त्यांचा ध्यासच होता. आणि म्हणून दत्ता पाटलांच्या इच्छेनुसार कोएसोने रायगड जिल्ह्यात खेडोपाडी, वाडीवर शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. अगदी हाच कित्ता नंतरच्या पिढीतील जयंत पाटील यांनीही गिरवला. त्यांनी पुढाकार घेवून पीएनपी एज्युकेशन संस्था स्थापन केली. अलिबागच्या आणि रायगडच्या शैक्षणिक कार्यात म्हणूनच दत्ता पाटील आणि जयंत पाटील यांचे योगदान विरोधकही मान्यच करतात.  जिल्हा परिषद हा जिल्ह्याच्या प्रशासनाचा कणा आहे. जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय भवनाची आवश्यकता होती. उत्तम प्रशासनिक कौशल्य असलेले तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी ही गरज जाणली. आणि जिल्हा परीषदेसाठी सुसज्ज भवन बांधण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. हे शिवधनुष्य पेलेल का? अशी शंका व्यक्त होत होती. पण प्रभाकर पाटलांच्या सर्वपक्षीय मंत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांनी फंडचा प्रश्‍न सोडवला आणि शिवतीर्थ साकार झाले. आज छत्रपती शिवरायांचे नांव सर्वच जण मतांसाठी घेतात. पण रायगडाच्या नगारखान्यावर सनईचौघडा याची सोय फक्त प्रभाकर पाटील यांच्याच प्रेरणेतून झाली हे वास्तव आता नवीन पिढीला सांगण्याची गरज आहे. जिल्हा परीषदेच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाडी रस्ते, पाणी या सुविधा प्रभाकर पाटील यांच्याच प्रयत्नातून पूर्ण झाल्या हे वास्तव कुणी नाकारु शकणार नाही. आज अवघ्या महाराष्ट्रात फक्त अलिबाग तालुक्यातच एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून पाणी दिले जाते. खरं तर त्यांचे काम उद्योगांना पाणी द्यायचे आहे. पण अलिबागेतील  खेड्यापाड्यांना पाणी दिले नाही तर पाईपलाईन फोडून टाकेन असा सज्जड दम अधिकार्‍यांना मिनाक्षीताई पाटील यांनी भरला आणि आणि अलिबागेत शुद्द पाणी आले. आंग्रे समाधी इतके वर्ष दुर्लक्षित राहीली पण मिनाक्षीताईंनी तीचे सुशोभिकरण करण्याचा ध्यास धरला. सरकार दरबारी खेटे घालून, अर्जविनंत्या करून, प्रसंगी धाक दाखवून शहराच्या मध्यवर्ती भागातील आंग्रे समाधीचे सुशोभिकरण पूर्ण केले याचे संपूर्ण श्रेय मिनाक्षीताईंना आणि जयंतभाईंना जाते हे कोण विसरेल? आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या कारकिर्दीत अलिबागच्या कोस्टल किनार्‍यावर अगदी रेवस ते रेवदंडा भागात आणि खारेपाट भागात बांधबंदिस्तीचे आणि बंधार्‍याचे काम करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला आणि ही कामे पूर्ण झाली याचे श्रेय केवळ मिनाक्षीताईंचेच आहे. बरेच वेळा लोकप्रतिनीधी निवडून गेल्यानंतर त्याची जनतेबरोबरची नाळ तुटते. हवेत जाणे हे कारण तर आहेच पण दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जनतेशी संपर्क तुटणे. शेकापच्या नेत्यांचा हा संपर्क कधी तुटलेला आजवर दिसला नाही. या सर्व बाबी पाहता अलिबाग मतदारसंघातून शेकापचाच उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे, हे तुम्हा सर्वांनाच पटेल.

Related Posts

0 Response to "अलिबागेत शेकापच का ?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel