-->
धुसर संकल्पपत्र

धुसर संकल्पपत्र

गुरुवार दि. 17 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
धुसर संकल्पपत्र
सत्तेवर असलेल्या पक्षाने पुढील पाच वर्षांचा जाहीरनामा उर्फ संकल्पपत्र सादर करताना गेल्या वेळच्या जाहिरनाम्यात कोणती आश्‍वसने दिली व त्याची पूर्तता कितपत झाली हे दाखविले पाहिजे व त्यानंतर पुढील पाच वर्षात कोणते नवीन संकल्प आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे. मागच्या कामाचा हिशेब देणे ही त्यांची पहिली जबाबदारी ठरते. व त्यानंतर त्यांना भविष्यातील कामे जनतेपुढे सादर केली पाहिजेत. शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी आपण गेल्या पाच वर्षात काय कामे केली हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. याचा अर्थच स्पष्ट आहे की, त्यांच्याकडे कोणती कामे केली याचे उत्तर नाही. त्यामुळे आता भविष्यात पुढे जाताना नवीन थापा मारावयाच्या आहेत, हे लक्षात घेऊन भाजपाने आपले संकल्पपत्र सादर केले आहे. मतदान आता केवळ सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना हा संकल्प जाहीर झाला आहे. खरे तर सत्तेत असलेल्या व ज्यांचे विकासाचे धोरण स्पष्ट आहे असा ते दावा करतात त्याबाबतीतचे संकल्पचित्र उभे करण्यास एवढा काळ लागण्याचे कारणच काही समजत नाही. याचा अर्थ बराच विचार करुन म्हणजे आता कोणत्या नवीन थापा मारावयाच्या आहेत याचा विचार करुन हे संकल्पपत्र उभे करण्यात आले आहे. भाजपाचा सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेनेने तर मोठ्या आश्‍वासनांची खैरात केली आहे. भाजपाने यात आपण देखील काही कमी नाही हेच दाखवून दिले आहे. राज्यात पुढील पाच वर्षांत एक कोटी रोजगारनिर्मिती, दुष्काळमुक्ती आणि केंद्र सरकारच्या मदतीने पायाभूत सुविधा क्षेत्रात पाच लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन भाजपने संकल्पपत्रात दिले आहे. आता खरे तर गेल्यावेळी देखील यातील बहुतांशी आश्‍वासने दिली होती. परंतु त्यातील एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. सरकारने फक्त कामे झाल्याची जाहीरातबाजीच केली आहे. एक कोटी रोजगार निर्मिती हे गेल्या वर्षीचेच कलम होते. परंतु गेल्या पाच वर्षात किती रोजगार दिले याबाबत मौन पाळण्यत आले आहे व नव्याने एक कोटी रोजगार देण्याची घोषणा केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने महाराष्ट्रात 55 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून दिला असा सरकारचा दावा आहे. मात्र गेल्या पाच वर्षात तर बेकारी गेल्या 30 वर्षातील निचांक स्तरावर आहे. मग रोजगार कोणाला मिळाले व कुठले मिळाले? त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या पाच वर्षात अनेकांचे रोजगार गमावले गेले त्याचा हिशेब काय? आता पुढील पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच 30 हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात येतील. कामगारांनाही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल याची सोय केली जाईल. राज्याच्या प्रत्येक विभागात टेकपार्क उभारण्यात येईल, असेही संकल्पपत्रात जाहीर करण्यात आले आहे. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात ठेवीदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.  मात्र अशा प्रकारे बँकां बुडत चालल्या असताना ठेवीदारांच्या ठेवी कशा सुरक्षीत राहातील त्याची जबाबदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ एक लाख रुपयांच्या ठेवीवरच सुरक्षा उपलब्ध आहे. ही मर्यादा वाढवून एक कोटी रुपयांवर नेण्याची गरज आहे. स्तातधार्‍यांनी हे जनतेच्या हितासाठी करण्याची गरज आहे. मात्र भाजपा हे विसरली आहे. पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, ही एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार ही घोषणा गेल्या वेळी केली त्याचवेळी दुष्काळमुक्ती होणार असे आशादायी चित्र रंगविले गेले. मात्र प्रत्यक्षात या योजनेची कामे कमी व भ्रष्टाचार जास्त अशी स्थिती झाली. आता एक नवे आश्‍वासन दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आले आहे. समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची योजना आहे. वैनगंगेचे वाहून जाणारे पाणी पश्‍चिम विदर्भात वळवणार असे ही सांगण्यात येते. मात्र याचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करुन त्याची व्य्वहार्यता तपासून त्यावर काम केले पाहिजे. केवळ इकडे पाणी तिकडे सोडून प्रश्‍न सुटणारा नाही तर तेथील जमीनीत पाणी मुरले पाहिजे, तसेच सध्या हाती असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. एक कोटी कुटुंबांना महिला बचतगटांशी जोडून महिलांना रोजगार देण्याची घोषणा कितीही आकर्षक असली तरीही ती प्रत्यक्ष उतरवणे वाटते तेवढे सोपे नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. पण या निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्यातील अनेक रस्ते टोलमुक्त करीत राज्य सरकारने तो विषय कधीच संपवला असल्याचे फडणवीस यांनी सांगत हा विषय आता भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवर नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षात टोलमुक्ती काही झाली नाही. त्यामुळे भाजपाने गेल्या पाच वर्षात जनतेची अशी अनेक बाबतीत फसगत केली आहे. आता नव्याने फसवणूक कशी करणार त्याचे संकल्पपत्र उभे करण्यात आले आहे.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "धुसर संकल्पपत्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel