-->
भारतीय विद्वतेचा सन्मान

भारतीय विद्वतेचा सन्मान

बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
भारतीय विद्वतेचा सन्मान
जन्माने भारतीय असलेले मुंबईत वाढलेले व कोलकात्याचे अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्थर डफ्लो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. गरीबी निर्मुलनात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली व त्यांच्या या संशोधनाला नोबेल देऊन सन्मानित करण्यात आले. बॅनर्जी हे बारतीय असल्याने तसेच त्यांचे शिक्षण मुंबईत व नंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्‍वविद्यापीठात झालेले असल्याने एका सच्या भारतीयाचा हा जागतिक पातळीवरील सन्मान प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद वाटावा असाच आहे. आपल्याकडे गरीबीची व त्यांच्या निर्मुलनाची चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरे तर ही गरीबी जागतिक पातळीवर कमी-अधिक प्रमाणात आहे व त्यांच्या निर्मुलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असतात. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही गरिबीचे प्रमाण मोठे आहे. अर्थात तेथील गरीबी ही विकसनशील किंवा गरीब देशातील गरीबींपेक्षा थोडी वेगळी आहे. बॅनर्जी, डफ्लो आणि क्रेमर यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन प्रयोग केले, त्यांच्याशी संवाद साधले, योजनांचे विश्‍लेषण करण्यावर भर देण्याची आणि त्याद्वारे सैद्धांतिकरण करण्याची पद्धत विकसित केली. गरिबी दूर करण्यासाठी त्यांची ही पद्धत परिणामकारक ठरत असल्याचे नोबेल समितीने मत व्यक्त केले आहे. जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होऊन संपत्तीचे केंद्रीकरण वाढलेले असताना आणि गरिबांचे प्रश्‍न ऐरणीवर आणले जात नसताना बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्‍यांना नोबेलने सन्मानित करून रॉयल स्वीडिश अ‍ॅकेडमीने गरिबीच्या प्रश्‍नावर सार्‍या जगाचे लक्ष वेधले आहे. गरिबी आणि गरिबांचे प्रश्‍न वरकरणी सारखे दिसतात; गरिबी सार्वत्रिकही आहे. मात्र, ती दूर करण्यासाठी एकच व्यापक उपाय नसतो. उलट वेगवेगळ्या गटांत आणि समूहांत विभागलेल्या जनसामान्यांचे प्रश्‍न समजून घेऊन, त्यांच्या गरिबीचे मूळ जाणून, त्यांच्या त्यांच्या गरजांनुसार उपाय आखण्याची आवश्यकता आहे - आणि खरा उपाय दर्जेदार शिक्षण आणि उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यात आहे, असे बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दाखवून दिले. त्यांच्या या प्रबंधाचा, अभ्यासाचा जगातील गरीबी दूर करण्यसाठी मोठा उपयोग होणार आहे. या दाम्पत्याने पूअर इकॉनॉमिक्स - ए रॅडिकल थिंकिंग ऑफ द वे टू फाइट ग्लोबल पॉव्हर्टी, हा अर्थशास्त्रावरील ग्रंथ लिहून गरीबीच्या या प्रश्‍नावर आपले मोठे योगदान समाजाला दिले आहे. अपुर्‍या किंवा अभावग्रस्त शिक्षण आणि आरोग्यसुविधा यांचा गरिबांना कसा फटका बसतो आणि अर्थार्जनासाठी अपार कष्ट सोसूनही गरिबीच्या चक्रातून त्यांची सुटका का होत नाही, याचे विश्‍लेषण त्यांनी केले आहे. यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रात नोबेल मिळाले होते. ते देखील कोलकात्याचे होते. त्यामुळे कोलकात्याची नाऴ अर्थशास्त्राशी जुळल्याचा एक योगायोग जुळून आला आहे. आणखी एक योगायोग म्हणजे, बॅनर्जी यांची नाळ मराठीशीही जुळलेली आहे.  अभिजित बॅनर्जी यांचा जन्म मुंबईत 1961 मध्ये झाला. अभिजित यांची आई म्हणजेच निर्मला बॅनर्जी या मूळच्या मुंबईकर आहेत. निर्मला यांचे माहेरचे अडनाव पाटणकर. मुंबईमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या निर्मला यांचे अर्थशास्त्रातील पदवीचे शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले. कोलकात्यामध्ये राहणार्‍या निर्मला यांचा लंडनला गेल्यानंतर मुंबईशी संपर्क कमी झाला. कोलकत्यामधील सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या निर्मला यांनी इंग्रजीमध्ये खूप लेखन केले आहे. त्यांना मराठीमध्ये लिहायची इच्छा होती आणि आजही आहे पण त्यांना मातृभाषेत लिहिण्याचा तितकासा आत्मविश्‍वास नाही. बॅनर्जी यांनी मोदी सरकारने नोटाबंदीचे पाऊल उचलल्यावर या धोरणावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर सरकारने दोन हजाराची नोट छापावयास घेतली, त्यावरही हे अनावश्यक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. युपीएच्या शेवटच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ढिसाळ होण्यास सुरुवात झाली होती. मात्र मोदी सरकारची सध्याची स्थिती ही त्याहून वाईट आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्था सध्या संकटात सापडलेली आहे. निर्यात वाढत नाही, नव्याने गुंतवणूक होत नाही, बेकारी वाढलेली आहे, विकास दर घसरलेला आहे अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तातडीने सरकारने उपाय योजावेत, असे सांगून त्यांनी पंतप्रधानांचे कार्यालय ज्या प्रकारे प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करीत आहे ते चुकीचे आहे असे बँनर्जी यांनी म्हटल्याने सरकारवरील त्यांनी आपले मत अशा प्रकारे स्पष्टपणे मांडले आहे. बँनर्जी हे सरकारचे टीकाकार असल्याने मोदी व भाजपाला त्यांचे कौतुक वाटणार नाही. परंतु बँनर्जीसारख्या विद्वनांचे सरकारने सध्याच्या स्थितीत एैकून देशाला सावरले पाहिजे. बॅनर्जींचे मूळ भारतात असल्याने, कलकत्ता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतल्याने त्यांच्या यशाबद्दल आता भरभरून बोलले जाईल. त्याचबरोबर अशा अभ्यासकांना अमेरिकेत मिळणार्‍या संशोधन सुविधा व वातावरण देशात कशा निर्माण करता येईल, हेही पाहायला हवे. अन्यथा आपल्याकडील विद्धान, विचारवंत हे देश सोडून बाहेर जात आहेत व त्यांचा सन्मान होत आहे, ही बाब खेदजनक आहे. त्यांना संशोधनासाठी देशात सर्व साधने उपलब्ध झाल्यास ते देशातून बाहेर जाणार नाहीत, याचा ही विचार करण्याची वेळ आता आली आहे.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "भारतीय विद्वतेचा सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel