-->
भाजपाचा मोदीनामा

भाजपाचा मोदीनामा

बुधवार दि. 10 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाचा मोदीनामा
भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक जाहिरनाम्याला संकल्पपत्र असे नाव दिले असले तरी तो खर्‍या अर्थाने मोदीनामा आहे. कारण याच्या मुखपत्रावर केवळ नरेंद्र मोदींचेच छायाचित्र झळकलेले आहे. अन्य कोणत्याही भाजपाच्या नेत्याला मुखपृष्ठावर झळकण्याचा मान यावेळी मिळालेला नाही. गेल्या वेळच्या भाजपाच्या निवडणूक जाहिरनाम्यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांची छायाचित्रे होती. यावेळी मात्र एकमेव मोदींचेच छायाचित्र झळकले आहे. त्यामुळे यावेळी देखील भाजपा केवळ मोदींच्या नावावरच मते मागणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजपाने राष्ट्रवादाच्या मुद्यावर भर दिला आहे. खरे तर त्यांनी गेल्या वेळच्या आश्‍वासनांची कोणती पूर्तता केली हे सांगत आता पुढील टप्प्यात कोणत्या बाबी करणार त्याची जंत्री दिली पाहिजे होती. परंतु तसे काही झालेले नाही. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला राष्ट्रवादाच्या मुद्यासोबत लोककल्याणकारी योजनांचा तोंडवळा दिला आहे. देशाची सुरक्षा हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार असल्याचेही यातून स्पष्ट झाले, याचा अर्थ पुलवामाच्या निमित्ताने झालेला हल्ला व त्याला दिलेेल प्रत्यूर याचेच भांडवल केला जाणार आहे. त्यातुलनेत कॉँग्रेसचा जाहीरनामा हा अधिक आक्रमक व जनतेच्या हिताच्या बाबी घेऊन आलेला दिसतो आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात काँग्रेससारखी कुठलीही नवीन मोठी घोषणा नाही. पण 2022 चे लक्ष्य निर्धारित करून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचे आश्‍वासन पक्षाने दिले आहे. 2022 मधे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होणार आहेत. आपले सरकार आल्यास देशाचे नाव रोशन होईल, अशी वेगवेगळ्या क्षेत्रात 75 कामे केली जातील, असे म्हटले आहे. खरे तर ही कोणती कामे ते नमूद करावयास हवे होते, परंतु हे अधांतरीच ठेवण्यात आले आहे. 2047 मधे म्हणजे सुमारे 25 वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होणार आहे. पुन्हा आपली सत्ता आल्यास 2047 पर्यंत भारत एक महाशक्ती म्हणून नावारूपाला येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले आहे. आता हे एक नवीन स्वप्न दाखविण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या भारतातल्या 123 कोटी नागरिकांसाठीचे हे अपेक्षापत्र आहे, असे सांगतानाच राजनाथ सिंह यांनी जाहीरनाम्यातल्या महत्त्वाच्या मुद्यांना अधोरेखित केले. त्यामधे राष्ट्रवादाशी बांधिलकी, दहशतवादविरोधी धोरण, अवैध घुसखोरी रोखणार, सिटीझनशीप अमेंडमेंट बिल लागू करणार, लवकरात लवकर राम मंदिर उभे राहील यासाठी प्रयत्न करणार, एक देश एक निवडणुकीसाठी प्रयत्न करणार, शेतकर्‍यांचे उत्पन्न दाम दुप्पट करणार यासारख्या गेल्या पाच वर्षांतल्या अजेंड्यावरच येत्या पाच वर्षांतही काम करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. हीच आश्‍वासने गेल्या वेळीही देण्यात आली होती.
समान नागरी कायदा आणणार, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणार, तीन तलाक कायदा बनवणार ही जुनी आश्‍वासने यावेळीही जाहीरनाम्यात आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून भाजपच्या जाहीरनाम्यावर जुन्या बॉटलमधे नवी दारू, अशी टीका होणे स्वाभाविकच आहे. मागच्या काही विधानसभा निवडणुकांत छोटे व्यापारी आणि शेतकर्‍यांमधे सरकारविरोधात नाराजीचा सूर दिसला होता. जीएसटीमुळे छोटा व्यापारी भाजपपासून दुरावल्याचेही दिसले. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपने आता छोटे शेतकरी, शेतमजूर तसेच छोट्या व्यापार्‍यांना पेन्शन सुरू करण्याचा आश्‍वासन दिले आहे. पण ही पेन्शन किती रुपयांची असेल व कशी देणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. व्यापार्‍यांच्या हितासाठी राष्ट्रीय व्यापारी आगोय स्थापन करण्याचेही आश्‍वासन देण्यात आले आहे. शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डवर एक लाखापर्यंतच कर्ज पाच वर्षांसाठी शून्य व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाईल. गेल्या महिन्यातच लागू झालेल्या किसान सन्मान निधी योजनेत आता छोट्या आणि मध्यम शेतकर्‍यांसोबतच सगळ्या शेतकर्‍यांना सामील करण्याचेही आश्‍वासन देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. गावांच्या विकासासाठी 25 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. ही आकड्यांची फेकाफेकी करुन मतदारांना भूलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा मोदीनााम प्रकाशित करताना राजनाथिसंग, सुषमा स्वराज यांनी राहूल गांधींवर नाव घेऊन टाका केली. खरे तर तुम्ही विरोधी पक्षांना गिनत नसलात व राहूल गांधींना काहीच समजत नसेल अशी जर तुमची धारणा असेल तर राहूल गांंधींवर टीका करण्याचे कारणच काय? उलट अशा प्रकारे राहूल गांधीचे महत्व भाजपा वाढवितच आहे असे दिसते.  देशाला सध्या भेडसावित असलेल्या बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटीचा घोळ आणि काळापैसा या चार मुद्द्यांवर जाहीरनाम्यात कुठलेच नवे किंवा जुने आश्‍वासन नाही. तसेच या चार गोष्टींचे गेल्या पाच वर्षांत काय झाले हेही सांगितले नाही. गेल्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या विजयात नवमतदार असलेल्या तरुणांचा खूप मोठा वाटा होता. तसेच महिलांनीही भाजपला भरभरून मतदान केले होते. परंतु यंदाच्या जाहीरनाम्यात तरुण आणि महिलांबद्दल ठोस आश्‍वासन नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले गेले. एकूणच हा मोदीनामा फारसा कोणला बूरळ पाडणारा दिसत नाही.
--------------------------------------------------

0 Response to "भाजपाचा मोदीनामा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel