-->
पहिला टप्पा सुरु

पहिला टप्पा सुरु

गुरुवार दि. 11 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पहिला टप्पा सुरु
सतराव्या लोकसभेच्या सात टप्प्यातील पहिला टप्प्प्यात आज मतदान होणार आहे. सध्या उन्हाचा जबरदस्त तडाका बसल्याने प्रचाराचा जोर फारसा मोठा नसला तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश असेल. नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम या सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा, उद्धव ठाकरे, मायावती, शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या नेत्यांनी विदर्भात अनेक ठिकाणी प्रचाराच्या धुवाधार सभा घेतल्या. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी पूर्व नागपूर परिसरात सभा घेऊन प्रचाराची समाप्ती केली, तर चंद्रपूरमध्ये राजनाथसिंह यांनी हंसराज अहिरांसाठी सभा घेतली. यावेळी नितीन गडकरी यांच्यासाठी निवडणूक म्हणजे केवळ उपचार असल्याचे सर्वत्र बोलले जात असले तरीही काही पत्रकारांच्या मते त्यांच्यासाटी ती तेवढीही सहज सोपी नाही. त्यामुळे येथील निकाल काय लागतो ते पहावे लागेल. आजच्या मतदानात अनेक दिग्गज नेत्यांची कसोटी लागणार आहे. यात केंद्र सरकारमधील सहा मंत्री व एकूण 44 खासदारांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात सुमारे पावणे नऊ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावतील. एमआयएमचे नेते ओवेसी हे हैदराबादमधून तीन वेळा निवडून आले असून ते पुन्हा येथूनच रिंगणात उभे आहेत त्यांचीही आज कसोटी लागेल. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह हे गाझियाबादेतून उभे असून त्यांची लढत काँग्रेसच्या डॉली शर्मा व महाआघाडीचे सुरेश बन्सल यांच्याशी होत आहे. अजित सिंह हे रालोदचे हे संस्थापक मुझफ्फरनगरमधून उभे असून त्यांचा सामना भाजपच्या संजीव बालियान यांच्याशी होईल. सर्वसमान्य माणूस हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. या निवडणुकीत या सामान्य माणसाचा कल काय असेल ते अजून नेमके समजलेले नाही. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, केंद्रातील विद्यमान सरकार व नरेंद्र मोदी सरकारवर सर्वच जण नाराज आहेत. राष्ट्रवादीचे हेवीवेट माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रातील राज्यमंत्री हंसराज अहीर या तिघांमुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेे. आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी तिघांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. गेल्या निवडणुकांच्या वेळी देशात काँग्रेसविरोधी वातावरण आणि मोदी लाट होती. त्याचा फायदा भाजपला झाला. या सातही मतदारसंघांत भाजप-सेनेच्या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. वेगळ्या विदर्भाचे भाजपने दिलेले लेखी आश्‍वासन हा भावनिक मुद्दाही त्यात होता. पाच वर्षांत परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. नागपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत होत असलेली काही विकासकामे आणि शहरात आणलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांचे भांडवल करत भाजपचा प्रचार सुरू आहे. काँग्रेसने मोठी ताकद लावत एकेकाळी आपलाच असलेला गड पुन्हा कसा ताब्यात येईल, यासाठी आखणी करत भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बसपनेही मोठ्या ताकदीने आपले उमेदवार उभे केले आहेत. कडक उन्हामुळे विदर्भ तापत असताना निवडणुकांचा माहोल मात्र या चुरशीच्या वातावरणातही तापला नाही. मतदार आणि कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उदासीनता पाहायला मिळते आहे. यावेळी जनतेचा स्पष्ट कौल काही दिसत नसताना सत्ताधार्‍यांच्या विरोधात मात्र जनमत असल्याचे दिसत आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार, विदर्भवादी अशा वेगवेगळ्या स्तरांवरील समाजघटकांत मोठी नाराजी आहे. मतदार आता सरकारच्या व मोदींच्या विरोधात आहे मात्र त्याचे रुपांतर मतपेटीत दिसते का ते पाहणे योग्य ठरेल. सत्ताधार्‍यांना अनामिक भीतीही आहेच. एनडीएच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि इतर पक्षांची मदत घेण्याची वेळ आली तर पंतप्रधान म्हणून नितीन गडकरींच्या नावावर एकमत होऊ शकते. तसेच त्यांना संघाचाही पूर्ण पाठिंबा आहेच. त्यांना काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. परंपरागत मतदार, नाराज दलित, मुस्लिम, हलबा समाज तसेच वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करणार्‍या काही घटकांना सोबत घेत त्यांनी सामाजिक समीकरणाचा वेगळा डाव टाकला आहे. हंसराज यांनाही काँग्रेस उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेचे मर्यादित नेटवर्क आणि काँग्रेसने दिलेले आव्हान यामुळे रामटेकचा गड राखण्यासाठी शिवसेना उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. भाजपसाठी गत वेळी आश्‍वस्त असलेल्या या सगळ्या भागात या वेळी परिस्थिती तशी राहिलेली नाही. विदर्भात आश्‍चर्यकारक निकाल उगवले, तर धक्का बसण्याचे कारण नाही. पहिल्या टप्प्यातील लोकशाहीच्या उत्सवास आता प्रारंभ झाला आहे. जनमत सरकारच्या विरोधात आहे हे नक्की. त्याचे पडसाद या पहिल्या टप्प्यात निश्‍चतच उमटणार आहेत.
--------------------------------------------------------

0 Response to "पहिला टप्पा सुरु"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel