-->
मतदारांचे औदासिन्य

मतदारांचे औदासिन्य

शुक्रवार दि. 26 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मतदारांचे औदासिन्य 
रायगड लोकसभा मतदार संघातील 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण 61.77 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत 64.57 टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणूकीच्या तुलनेने या निवडणूकीत 2.80 टक्के मतदानात घट झाली असल्याचे आकडेवारीनुुसार दिसत आहे. लोकसभा निवडणूक ही देशातील महत्वाची निवडणूक समजली जाते व अशा या देशाचे भवितव्य ठरविणार्‍या निवडणुकीबाबत मतदारांचे औदासिन्य ही बाब खेदजनकच म्हटली पाहिजे. रायगडमध्ये यावेळी महाआघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे व शिवसेनेचे उमेदवार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या लढत होती. केंद्रीय मंत्री येथून लढत असल्याने येथे फार मोठी उत्सुकता होती. तसेच तटकरे यांनी त्यांना एक जबरदस्त आव्हान निर्माण केले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे तटकरेंच्या बाजुने कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप हे एकदिलाने काम करीत होते. या तिन्ही पक्षांचे नेते कधी नव्हे ते एकाच व्यासपीठावर आले होते. रायगडातील ही एक ऐतिहासिक घटना होती. असे असले तरीही येते मतदान का कमी व्हावे हा एक प्रश्‍न आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूक महिनाभरापुर्वी म्हणजे 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून या मतदार संघात आचारसंहिता लागू करण्यात आली. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. प्रशासकिय अधिकार्‍यांबरोबरच वेगवेगळ्या राजकिय नेते, प्रतिनिधींसोबत बैठका घेऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदाराला आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान मतदारांनी करावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात बाजी केली गेली. अनेक ठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. सर्वच यंत्रणा कामाला लागली होती. मोठ्या अपेक्षेने जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रशासनाचे सर्व प्रयत्न फेल ठरले असल्याचे दिसून आले आहे. या मतदार संघात एकूण 61.77 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणूकीच्या तुलनेने 2.80 टक्के मतदानात घट झाली आहे. तसेच मागील लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत महिलांनी 64.46 टक्के तर पुरुषांनी 64.68 टक्के मतदान केले होते. या लोकसभा निवडणूकीत महिलांनी 61.17 व पुरुषांनी 62.70 टक्के मतदान केले. तुलनेने पुरुषांच्या 03.29 टक्के तर महिलांच्या 02.28 टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात मतदान कमी होण्यामागे हे केवळ प्रशासकीय अपयश आहे असे नव्हे तर त्याला सध्याची परिस्थितीही कारणीभूत आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या बहुसंख्य ठिकाणी मतदान कमी तरी झाले आहे किंवा गेल्या वेळचे प्रमाण कायम राहिले आहे. मात्र फारच अपवादात्मक स्थिततच मतदानाची टक्केवारी वाढली आहे. याचे कारण म्हणजे यावेळी देशात कुणाचीही लाट नाही. भाजपा कितीही जोमात मोदींची लाट सांगत असले तरीही त्यात काही तथ्य नाही. जर खरोखरीच लाट असती, मग ती कोणाचाही असती तरी मतदान निश्‍चितच वाढले असते. यावेळी मतदारांमध्ये नैराश्या आहे त्याचे कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत आहे. गेल्या वेळी भाजपा व मोदींनी लोकांना एवढी आश्‍वासने देऊन अपेक्षा वाढवून ठेवल्या की त्याची पूर्तता होणे अशक्यच होते. परंतु मोदींकडून लोकांनी मोठ्या आशा-आकांक्षा बाळगल्या होत्या. त्याला सुरुंग लागला आहे. त्यामुळे लोकांना मतदान करण्यात यावेळी फारशी उत्सुकता नाही. हेच जर मोदींनी लोकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता किंवा त्यादिशेने प्रामाणिकपणे पाऊले जरी टाकली असती तरी लोकांना त्यांच्याबद्दल विश्‍वास वाटला असता व लोकांनी त्यांना पुन्हा साथ देण्यासाठी मतदान केले असते. परंतु यावेळी लोकांचा भ्रमनिरास झाल्याने लोकांमध्ये नैराश्य उत्पन्न झाले. देशातील अंबानी, अडाणी हे बडे उद्योगती वगळता कोणाताही समजाघटक समाधानी नाही. शेतकरी अस्वस्थ आहे, बेकारांचा ताफा वाढला आहे, लोकांना आज नोकर्‍या नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिवसांगणीक वाढत चालल्या आहेत. नोटा बंदीमुळे सर्वच समाजघटकांना फटका सहन करावा लागला. पंरतु त्याबाबत सरकार टोकाला जाऊन निर्लजपणे समर्थन करते. नोटाबंदीचा फायदा कोणालाच झाला नाही. त्याबाबत सरकारने जनतेची माफी मागावयास हवी होती. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग हैराण आहे, त्याची कर भरायची तयारी आहे परंतु त्याला कररचना सुटसुटीत हवी. जीएसटीची अंमलबजावणी करताना जी घाई करण्यात आली ते पाहता त्याचे चांगले परिणाम जनतेला पहायला मिळाले नाहीत. सरकार केवळ आपल्या कामाचा मोठ्यामोठ्या जाहीराती करुन गवगवा करते. प्रत्यक्षात मात्र जनतेला त्याचा लाभ काही दिसत नाही. आपल्या विरोधात कोणीही बोलणार नाही, याची खात्री सरकार घेते. तसेच अनेक शासकीय आकडेवारी प्रसिद्द केली जात नाही, त्यामुळे खरे चित्र जनतेपुढे येतच नाही. केवळ मोदी, मोदी हेच जनतेपुढे बिंबवले जाते. मोदींचा चेहरा आल्यावर ते चॅनेल बदलणारे अनेक लोक आज आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर जनता निराश आहे. गेल्या वेळी मतदान मोठ्या अपेक्षेने केले, त्याचा काहीच फायदा झाला नाही. यंदा तरी मतदान करुन काय उपयोग, अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे. त्यातून यंदा मतदान कमी झाले आहे. अर्थात ही तात्कालीन स्थिती राहिल. लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास कायम आहे, ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे.
----------------------------------------------------------

0 Response to "मतदारांचे औदासिन्य "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel