-->
श्रीलंकेचा बोध

श्रीलंकेचा बोध

गुरुवार दि. 25 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
श्रीलंकेचा बोध
श्रीलंकेतील आठ साखळी बाँबस्फोटातील मृतांची संख्या 300च्या वर तर जखमींची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. अलिकडच्या काळातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील ही एक सर्वात मोठी घटना म्हटली पाहिजे. या हल्ल्याची जबाबदारी दोन दिवसांनंतर इसिसने अखेर स्वीकारली. 80च्या दशकातील श्रीलंकेतील वांशिक दंगलीनंतर चालू दशकात श्रीलंका शांततेच्या मार्गावर जात होता. आता श्रीलंका स्थिरावत आहे, येथील आर्थिक घडी रुळावर येत आहे असे आशादायी चित्र दिसत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा जागतिक स्थरावरुन निषेध होत आहे. या घटनेनंतर देशात अस्थिरता माजू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. हा दहशतवादी हल्ला होईल अशी सूचना सरकारला पूर्वीच मिळूनही ती रोखता आलेली नाही हे मोठे दुर्दैव आहे. जेमतेम दोन कोटी लोकसंख्या असलेला श्रीलंका हा आपल्या दक्षिण भारतातून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ज्यावेळी तेथे वाशिंद दंगली उसळल्या होत्या त्यावेली तेथील लाखो लोक भारतात तामीळनाडूतील किनारपट्टीवर आश्रयाला आले होते. श्रीलंकेतील सिंहली व ताणीळ यांचा संघर्ष हा रक्तरंजितच होता व त्याची बिजे ही देखील इतिहासात रोवली गेली होती. स्वतंत्र तामिळी राष्ट्राच्या विचाराने प्रेरित होऊन हिंसाचार घडविणार्‍या लिट्टे या संघटनेने या देशाला 80 च्या दशकात हैराण करून सोडले होते. दशकभरापूर्वी प्रभाकरनच्या मृत्यूसोबतच लिट्टेचे अस्तित्व संपले आणि श्रीलंका पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊ लागला होता. श्रीलंकेत सत्तास्थानी असलेल्या सिंहलींनी तेथील अल्पमतात असलेल्या तामिळींवर पिढ्यानपिढ्या भयानक अत्याचार केले होते. हे अत्याचार वाशिंक होते, त्यामुळे त्याला एक वेगळाच रंग होता. श्रीलंकेतील हा वाशिंक हिसाचार मिटावा यासाठी त्यावेळी भारताने नेहमीच सहकार्य केले होते. एक शेजारी देश तसेच तेथून येणार्‍या स्थलांतरीतांचा भार यामुळे भारताने त्यावेळी हस्तक्षेप केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी तेथे शांती सेना पाठवून त्या देशात मोठे सहकार्य केले होते. त्यामुळे या देशाचे विभाजन टळले. यात आपण आपल्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राहूल गांधींना गमावले. राजीव गांधींच्या हत्येनंतरही तेथील हिंचार मिटायला तब्बल एक दशक लागले. आता श्रीलंका पुन्हा एकदा शांततेच्या वाटेवर असताना दहशतवादाने डोके वर काढले आहे. 70 टक्के सिंहली-बौद्ध असलेल्या या देशात 12 टक्के हिंदू तामिळी आहेत आणि जवळपास तितकेच मुस्लिम तामिळी आहेत. हिंदू तामिळींची स्वतंत्र राष्ट्राची मागणी होती. लिट्टेचा जन्म त्यातूनच झाला असला तरी मुस्लिम तामिळी या मागणीपासून दूर होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बौद्ध सिंहली आणि मुस्लिमांमध्ये या देशात संघर्ष सुरु झाले. आज श्रीलंकेत कट्टरतावादाने तेथील राजकारण बिघडले आहे. कट्टरवादाला खतपाणी घालणारे राजकीय नेतृत्व आणि वेळोवेळी निवडणुकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणारी वक्तव्ये आणि बहुसंख्याकांची मते मिळवून देशात सत्तेवर येण्याची राज्यकर्त्यांची हव्यास यामुळे श्रीलंकेतील सर्व वातावरण गढूळ झाले. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या निर्वासितांचा प्रश्‍न देखील श्रीलंकेला भेडसावित आहे. यावरूनच कट्टरतावाद श्रीलंकेतील सत्ताधार्‍यांनी टोकाला पोहोचविला आहे. राजेपक्षे यांच्या पक्षाने देशात सातत्याने ध्रुवीकरण केले आणि त्याचा परिणाम लंकेला भोगावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा वापर करून राजकीय वक्तव्ये केली त्याबाबतीत श्रीलंकेत तीव्र पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. कट्टरतावाद हा सर्वार्थाने गैरच आहे. ज्या ज्या इस्लामी राष्ट्रांमध्ये कट्टर गटांनी आपले हातपाय पसरत पसरत हिंसेच्या मार्गाने सत्तांतर घडविले त्यांच्या देशांची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे. माझाच धर्म, माझाच वंश श्रेष्ठ आणि त्या वंशाला किंवा धर्मालाच राज्य करण्याची परवानगी आहे किंवा बहुसंख्य आहे म्हणून त्यांच्या पद्धतीनेच हा देश चालला पाहिजे अशा विचाराने लोकांची माथी भडकवण्याचे कारस्थान ज्या ज्या देशात रचले गेले त्या त्या देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. भारतात देखील गेली पाच वर्षे यापेक्षा काही वेगळे राजकारण भाजपा करीत नाही. अमेरिकेने तेलाच्या बाजारपेठेवर आपले वचर्व राहावे यासाठी कट्टर मुस्लिपंथीयांना पोसले व त्यातून मुस्लिम दहशतवाद वाढत गेला. हा दहशतवाढ वाढण्यामागे, पोसण्यामागे अमेरिकाच कारमीभूत आहे. अफगाणिस्तान, सिरिया, इराक देशांचा विचार केला तर हे अधिक स्पष्ट होऊ शकेल. जगावर आर्थिक साम्रज्य स्थापन करण्यसाठी कोणत्याही थराला जाणे, वर्चस्ववादासाठी अतिरेकी शक्तींना मदत करणे, अनिर्बंध शस्त्रस्पर्धा यामुळे जग अस्थिर बनलेे आहे. त्याचे परिणाम कधी श्रीलंकेला, कधी भारताला तर कधी संपन्न राष्ट्रांना भोगावे लागतात. यातून कोणताही देश सुटलेला नाही. अगदी अमेरिकेनेही त्याच फटका खाल्ला आहे. गेल्या पाच वर्षात भारताने नेपाळ, चीन, भूतान या एकेकाळच्या आपल्या देस्त राष्ट्रांशी संबंध वाईट केले आहेत. चीनचे आजचे वर्चस्व आपम मान्य करुन आपण मोठ्या मनाने धाकट्या भावाची भूमिका घेतली तर आपण आपल्या विकासावर लक्ष केंद्रीत करु शकतो, परंतु आपण तसे करीत नाही. खोट्या अविश्‍वासावर आपण आशिया खंडावर साम्राज्या करण्याची इच्छा बाळगतो. यातून अस्थिरतेची बिजे रोवली जातात. भारतातही कट्टरतावाद सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने कुरवाळला जात आहे. यातून भारताने बोध घेऊन मानवतेला प्राधान्य देण्याची गरज आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "श्रीलंकेचा बोध"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel