-->
मान्सूनची खूषखबर

मान्सूनची खूषखबर

बुधवार दि. 24 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मान्सूनची खूषखबर
लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून यंदा चांगले असेल ही बातमीच सुखकारक असते. सध्या उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात घामाच्या धारा वाहत आहेत. अशा वातावरणातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा देशात पाऊस सरासरी गाठणार (96 टक्के ) असा अंदाज वर्तविल्यने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. सध्या तापलेल्या राजकीय वातावरणात तसेच दुष्काळाच्या तीव्र झळा बसलेल्या असताना ही बाब दिलासादायक ठरणारी आहे. एप्रिलचा उकाडा सुरु झाला की प्रत्येक जण मान्सूनची वाट पाहू लागतो. यंदा चांगाल पाऊस पडू देत अशी हाक बळीराजा देतो. परंतु त्याच्या या हाकेकडे वरुणराजा लक्ष देतोच असे नाही. यंदा दुष्कालाने राज्याला वेढलेले असताना पावसाच्या अंदाजाचे महत्त्व आणखी वाढते. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करुन सर्वांची चिंता वाढवली होती. आता हवामान खात्याच्या अंदाजाने ही चिंता दूर झाली आहे. या अंदाजानुसार, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त 17 टक्के आहे. दुसरी, प्रशांत महासागरातील अल निनो हा घटक प्रतिकूल असला तरी, हिंदी महासागरातील पूर्व आणि पश्‍चिम भागांतील तापमानाचा फरक दर्शवणारा इंडियन ओशन डायपोल (आय.ओ.डी.) हा घटक यंदा सकारात्मक राहील. अल निनो सक्रीय असताना आय.ओ.डी. सकारात्मक असेल तर भारतात चांगला पाऊस पडतो, असा आजवरचा अनुभव आहे. हवामान खात्यातर्फे दरवर्षी दोन टप्प्यांत मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्यात येते. आता दुसरा अंदाज मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. भारताच्या दृष्टीने या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या मोसमी हवामानाच्या देशात सर्व अर्थकारण, समाजकारण, राजकारण पावसावर अवलंबून असते. पाऊस सरासरी गाठणार, या अंदाजानेच भारतीय शेअर बाजारात नवचैतन्य आले आहे. देशात निवडणुकीचा मोसम सुरु असताना देखील शेअर बाजारात तेजी आली आहे, ती याच बातमीमुळे. गेल्या नऊ वर्षांत हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरले आहे. स्कायमेटला तर दोन वर्षांपूर्वी अंदाज चुकले म्हणून जाहीर माफी मागावी लागली होती. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहात असून, 50 टक्के लोक रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत़  आपल्याकडे मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून असून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो़ त्यामुळे मान्सून कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष असते़  गेल्या सहा-सात वर्षांपासून मान्सूनच्या आगमनावर एल निओचा प्रभाव होता़ त्यामुळे मान्सूनचे आगमन अनेकदा लांबले होते़ परंतु यंदाच्या अंदाजामुळे देशवासीयांना दिलासा मिळाला आहे. सांख्यिकी आणि सी.एफ.एस. या दोन्ही मॉडेलचा आधार घेऊन हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे़  त्यासाठी प्रामुख्याने पाच घटकाचे मार्चपर्यंत निरीक्षण करण्यात आले. त्यात उत्तरी अटलांटिक आणि उत्तरी प्रशांत महासागरातील डिसेंबर व जानेवारीतील तापमान, भूमध्य रेखीय दक्षिण हिंद महासागरातील फेब्रुवारीचे तापमान, फेब्रुवारी व मार्चमधील पूर्व एशियाचे समुद्र स्तरावरील दबाव, जानेवारीतील उत्तर-पश्‍चिम युरोपातील जमिनीवरील हवेचे तापमान, जानेवारी, फेब्रुवारीतील प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान याचा विचार करण्यात आला. एल निओचा प्रभाव 2014 आणि 2015 साली मोठ्या प्रमाणात जाणवल्याने मान्सूनवर त्याचा परिणाम झाला होता़ भारताचे सरासरी पाऊसमान 887़5 मिमी आहे़ 2014 मध्ये 781 मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा 12 टक्के कमी होता़ 2015 मध्ये 76़6 मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा 14 टक्के कमी होता़ दोन वर्षापूर्वी संपूर्ण देशात चांगला पाऊस झाला असला तरी तो 862़.2 इतका झाला होता़  हवामान खाते पावसाचा अंदाज वर्तविताना सामान्य, सामान्याहून कमी व सामान्याहून अधिक अशा परिमाणात वर्तविते. ही वर्गवारी दीर्घकालीन सरासरीच्या आधारे केली जाते. सन 1951 पासूनच्या 50 वर्षांत देशात झालेल्या मान्सूनच्या पावसाच्या सरासरीस एल.पी.एफ .असे संबोधिले जाते. भारतीय उपखंडात नैऋत्य मान्सून व आग्नेय मान्सून असे पावसाचे दोन हंगाम आहेत. जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या हंगामात एकूण पावसाच्या 70 टक्के पाऊस पडतो. आग्नेय मान्सूनचा हंगाम ऑक्टोबरनंतर सुरू होतो व तो पाऊस प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सक्रिय असतो. पावसाचे प्रमाण कितीही असले तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अर्थात त्याला सरकारी धोरणे जबाबदार आहेत. यंदा देखील चांगला पाऊस अपेक्षित असल्याने व प्रत्यक्षात तसा चांगला पाऊस पडल्यास हे सलग चांगल्या पावसाचे दुसरे वर्ष असेल. त्यामुळे एकूणच शेती क्षेत्राला नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे अर्थचक्र थंडावले होते. त्याला गती मिळणे सध्या तरी अवघड आहे. अशा वेळी चांगला पावसाळा झाल्यास केवळ शेतकरीच नाही तर सर्वानांच चांगले दिवस येतील. त्याचबरोबर नवीन येणारे सरकार हे पुन्हा मोदींचे नसेल त्यामुळे मान्सूनच्या आगमनाबरोबर देशातील वातावरण सुखकारकच असेल, असे दिसते.
--------------------------------------------------------

0 Response to "मान्सूनची खूषखबर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel