-->
विचार करा पक्का...

विचार करा पक्का...

मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
विचार करा पक्का...
रायगड लोकसभा मतदारसंघातील सुमारे साडे सोळा लाख मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. रायगडमधील जागृत मतदार आपले मत विकासाला व देशाची लोकशाही टिकविण्याच्या बाजुले आपला कौल देतील यात काही शंका नाही. यावेळी राष्ट्रवादी-कॉँग्रेस-शेकाप आघाडीचे सुनिल तटकरे यांचा विजय निश्‍चित मानला जातो. 2014 साली गेल्या वेळी तटकरेंचा विजय जेमतेम दोन हजारांनी हुकला होता. परंतु आता यावेळी त्यांच्या सोबतीला शेकाप असल्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित आहे. गेल्या लोकसभेला शेकापच्या उमेदवाराच्या पारड्यात सुमारे सव्वा लाख मते पडली होती, ती आता तटकरेंना जातील. तसेच कॉँग्रेसमधील बंडखोराने गेल्या वेळी 40 हजार मते मिळविली होती, ही मते देखील आता तटकरेंना पडतील यात काही शंका नाही. ही सर्व गणिते पाहता तटकरेच यावेळचे रायगडचे प्रतिनिधीत्व लोकसभेत करतील याबाबत कुणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही. कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप या महाआघाडीमुळे तटकरेंची ताकद वाढली आहे त्यामुळे त्यांचा विजय ही काळ्या दगडावरती रेघ आहे. सध्याच्या राजकारणाचा विचार करता आपल्याला रायगड जिल्ह्यातून तटकरेंना लोकसभेवर पाठविणे ही एक आवश्यक बाब ठरणार आहे. देशाचा विचार करताना सध्याच्या काळात नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून जाणे ही आपली लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी प्राधान्यतेची बाब आहे. देशात गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केवळ स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात काम कोणतेच केले नाही. सरकारने आपल्या कामांच्या प्रसिध्दीसाठी साडे चार हजार कोटी रुपये खर्च केले. अनेकदा तर खोटी आकडेवारी सादर केली. असे हे खोटारडे सरकार आपल्याला नको आहे. सरकारने खरे तर गेल्या पाच वर्षातील आपल्या कामाचा लोखाजोखा सादर करावयास हवा होता व त्या आधारे लोकांकडे मते मागावयास पाहिजे होती. परंतु सरकारने पाच वर्षात काय केले? विकास केला म्हणजे नक्की काय केले? नोटबंदीचे चुकीचे समर्थन केले, त्यातून बेकारीचा भस्मासूर उभा राहिला. आधार व जीएसटीला कॉँग्रेसच्या काळात यांनीच विरोध केला, मात्र सत्तेत येताच त्याचे समर्थन केले. बरे जीएसटीची अंमलबजावमी चुकीच्या मार्गाने केली, त्याचा फटका व्यापारी, लघुउद्योजकांना सर्वात जास्त बसला. महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी काय केले? शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे योग्य पैसे मिळाले का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या का वाढल्या? वाढती बेरोजगारी, देशावर आणि राज्यावर दुपटी ने वाढत चाललेले कर्ज, रासायनिक अन्न आणि त्यामुळे होणारे दुषपरिणाम, कर्जमाफी खरोखर झाली की फक्त जाहिरात, सरकारी योजनाची खरोखरच अंमलबजावणी होत आहे का? जाहिरातीमधे दिसलेली गोष्ट कितपत खरी आणि त्याची वास्तविकता किती? बँका चे वाढत चललेले अनुत्पादीत मूल्य, आयात निर्यात धोरण, शेतमाल आयात निर्यात धोरण, पेट्रोल डिजेल किंवा अन्य रूपातुन होणार्‍या वसूलीचे पुढे काय होते? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. देशातील विव्देषाचे राजकारण थांबविण्यासाठी तटकरेंना लोकसभेत पाठविण्याची म्हणजेच महाआघाडी बळकट करण्याची आवश्यकता आहे. रायगड मतदारसंघाचा विचार करता गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदार अनंत गिते काय कामे केली असा प्रश्‍न उपस्थित होतो. गिते यांची ही लोकसभेतील एकूण सहावी टर्म आहे. तसेच रायगड मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतरची ही दुसरी टर्म आहे. रायगडचा विचार करता गेल्या दहा वर्षातील खासदारकीपैकी पाच वर्षे गीते केंद्रीय मंत्री होते. या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी नेमके काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केल्यास याचे उत्तर नकारात्मकच देता येईल. अनंत गीते हे केंद्रीय मंत्रीपदी असताना त्यांच्याकडे अवजड मंत्रालय होते. खरे तर एखादा सरकारी कंपनीचा मोठा प्रकल्प या मतदारसंघात आणू शकले असते. परंतु तसे त्यांनी काहीच केले नाही. एवढेच कशाला येथील सरकारी कंपनी आर.सी.एफ. च्या थळ प्रकल्पातील विस्तार प्रकल्पाचेही काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले नाही. रत्नागिरीत येऊ घातलेला नाणार प्रकल्पही शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला. अशा प्रकारे नवीन प्रकल्प न आणणे तसेच येणार्‍या प्रकल्पांना विरोध यामुळे येथील रोजगाराला आळा बसला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही खासदार अनंत गिते यांच्यावर येते. मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्ताराला होत असलेला विलंब तसेच राज्यातील विविध केंद्रीय अर्थसहाय्याने होणार्‍या प्रकल्पांची रखडपट्टी याचे अपयश हे गीतेंचेच आहे. केंद्रातील मंत्री या नात्याने गीते रायगड जिल्ह्याासाठी भरीव कार्य करु शकले असते. परंतु त्यांना हे सर्व करण्यात अपयश आल्याने आता त्यांच्या जागी तटकरेंसारखा कार्यक्षम खासदार आणण्याची ही रायगडमधील मतदारांची आता जबाबदारी आहे. म्हणून यावेळी राज्यात माजी मंत्री असलेले व प्रशासनावर पकड असलेले सुनिल तटकरेच खासदार म्हणून आपल्याला हवेत. रायगड हा मुंबईला जोडून असलेला जिल्हा आहे. हळूहळू मुंबई या जिल्ह्यात सरकण्यास सुरवात झाली आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन दशकात अनेक प्रकल्प आले, यातून या रायगडचा चेहरामोहरा बदलला, हे खरे असले तरी भविष्यातील जिल्हायाचे प्रश्‍न जोराने मांडण्यासाठी आपल्याला कार्यक्षम खासदार हवा. मंत्री असूनही कामे न करणारा निष्क्रिय खासदार आपल्याला नको. त्यामुळे विचार करा पक्का...
------------------------------------------------------

0 Response to "विचार करा पक्का..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel