-->
प्रचाराचे बदललेले तंत्र / उन्हाचे चटके वाढले

प्रचाराचे बदललेले तंत्र / उन्हाचे चटके वाढले

शनिवार दि. 27 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्रचाराचे बदललेले तंत्र
निवडणुकीच्या प्रचारात यंदा झपाट्याने बदल झालेला आहे. खरे तर गेल्याच लोकसभा निवडणुकीपासून त्याची सुरुवात झाली होती. परंतु आता यंदाच्या निवडणुकीत सोशल मिडियाने जो धुमाकूळ घातला ाहे ते पाहता आता निवडणुकांवर त्यांचाच वरचश्मा राहाणार हे आता नक्की झाले आहे. एकेकाळी आवाज कुणाचा? अशा घोषणा देत निवडणुका आल्या की हातात पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर घोषणाबाजी करत प्रचार करणारे कार्यकर्ते हमखास दिसत. परंतु आता हे चित्र अपवादात्मकरित्या दिसते आहे. प्रचारसाहित्य विकत घेण्यासाठी नेहमी खचाखच गर्दी असणारी लालबागमधील दुकाने यंदा ओस पडलेली होती. यंदा त्यामुळे  प्रचारसाहित्य विक्रीत जवळपास 60 ते 70 टक्के घट झाली आहे. महायुती आणि आघाडीचा उशिरा झालेला निर्णय, तसेच सोशल मीडिया आणि जीएसटीमुळे विक्रीत घट झाल्याचे याची विक्री करणारे विक्रेते सागंतात. निवडणुका जाहीर झाल्या किंवा त्या अगोदरपासूनच लालबागमधील निवडणूक प्रचाराचे साहित्य पुरविणारी दुकाने सक्रिय होत असत. त्यांच्याकडे लाखोंची उलाढाल या काळात होत असे. परंतु यंदा तशी त्यांच्याकडे लगबग नाही, त्यांचा धंदा पूर्णपणे बसला आहे. भविष्यात हा धंदा कितपत चालेल त्यासंबंधीही ते साशंक आहेत. पूर्वीच्या काळी बॅनर लागायचे, झेंडे लागायचे, लाऊडस्पीकर फिरवायचे पण यावेळी तसे काहीच दिसत नाही. प्रचाराचे सर्वच तंत्र एका झपाट्याने बदसलत चालले आहे. उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करतात त्यामुळे प्रचारसाहित्याची मागणी अगदीच कमी झाली आहे. आता केवळ सभा असल्या तरच झेंडे, बँनर्स लागतात. अन्यथा सर्वच प्रचार आता सोशल मिडियावर चालतो. 2014 मध्ये मोदी लाट असल्याने प्रचार साहित्यासाठी थोड्या प्रमाणात ग्राहक होता, पण यावेळी अजिबातच नाही. आता उमेदवार फेसबुक, युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करुन मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. तसेच अशा प्रकारे सोशल मिडियावरुन प्रचार करणे फारच स्वस्त झाले आहे. जीएसटी आणि सोशल मीडियामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे प्रचार साहित्याचे विक्रेते सांगतात. त्यातच आचारसंहिता कठोर झाल्याने झेंडे लावण्याचे प्रमाण कमी झाले असून त्यांची मागणी कमी झाली आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याने टोप्या आणि स्कार्फची मागणी आहे. तसेच युतीचा निर्णय उशिरा झाल्याने नेमक्या कोणत्या उमेदवाराचा फोटो टी-शर्टवर छापावा याचा निर्णय होण्यास उशीर झाला. टी-शर्ट छापण्यास किमान एक महिन्याचा वेळ लागतो. यामुळे या विक्रेत्याना यंदा अत्यंत कठीण दिवसांना सामोरे जावे लागले आहे. अर्थात हा कल केवळ मुंबई व महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील आहे. सोशल मिडिया आता आक्रमकरित्या प्रचार करण्याचे एक नवे साधन झाले आहे. तसेच प्रचार साहित्यापेक्षा हे खूप स्वस्त पडते. स्मार्ट फोन आता जवळपास सगळ्यांच्याच हाती आल्याने त्यांच्यापर्यंत सोशल मिडिया पोहोचला आहे. त्यामुळे प्रचार करणे अतिशय सोपे झाले आहे. प्रचाराचे तंत्र हे झपाट्याने बदलत चालले आहे हे खरेच आहे. भविष्यात यात आणखी तंत्रज्ञानाच्यादृष्टीने बदल होतच जातील. परंतु सोशल मिडीया ही काळाची गरज ठरणार आहे.
उन्हाचे चटके वाढले
सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भासह जवळजवळ सर्वच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सध्या अंशत: ढगाळ आकाशासह उष्ण व कोरडे हवामान आहे. मागील आठवड्यात सरासरीच्या खाली उतरलेले तापमान पुन्हा सरासरीच्या वर सरकले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 42 अंशांच्या पुढे असून, ब्रह्मपुरीपाठोपाठ अकोला, चंद्रपूर वर्धा येथे तापमान 43 अंशांपेक्षा अधिक आहे. तर, जळगाव, मालेगाव, बीड, परभणी येथेही तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका आणखी वाढणार  असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख 30 पैकी 22 शहरांनी तापमानाची चाळीशी पार केली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, अलिबाग, रत्नागिरी, भिरा, डहाणू आणि मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर वगळता राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमानाच्या पार्‍याने सरासरीपेक्षा जास्त उसळी मारली आहे. मराठवाडा ते उत्तर तामिळनाडू तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटकाचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातील तापमान वाढले असून आंगाची लाही लाही होत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात व श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन, मंगळवारपर्यंत श्रीलंका आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत देण्यात आले आहेत. हे चक्रीवादळ तमिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, दक्षिण तमिळनाडून ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी उन्हाळा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात उन्हाचे चटके कधी नव्हे एवढे वाढू लागले आहेत. आपल्या परिसरातील हवामानाचे संतुलन बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "प्रचाराचे बदललेले तंत्र / उन्हाचे चटके वाढले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel