-->
समाजातील अस्वस्थता

समाजातील अस्वस्थता

मंगळवार दि. 25 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
समाजातील अस्वस्थता
सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणूस हे ठरवावे लागेल, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी व्यक्त केल्याने देशातील समाजमनातील अस्वस्थता पुन्हा एकदा उफाळून बाहेर आली आहे. फादर दिब्रिटो यांनी आपले भाषण करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनीही आपली अस्वस्थता बोलून दाखविली होती. त्यानंतर त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत माजल मारली गेली. फादर दिब्रिटो व शहा यांनी व्यक्त केलेली ही खंत आपल्याकडील सत्ताधार्‍यांना दिलेली ही एक चपराकच आहे. परंतु यातून ते काही बोध घेतील असे वाटत नाही. त्याऐवजी आपले हिंदुत्वाचे राजकारण पुढे रेटण्याचे काम सध्याचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोमानेच करतील असे दिसते. या देशातील सामान्य माणूस लोकशाहीचा संरक्षक आहे, परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट दिशेने वाहू लागते. आपला प्रवास असहिष्णुतेकडे, संकुचितपणाकडे, ठोकशाही आणि अराजकतेच्या दिशेने होऊ  लागतो. काहींच्या भावना पटकन दुखावतात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्तींविषयी चिकित्सक भाष्य केले की संबंधित गट संतप्त होतात. कायदा हाती घेऊन प्रसंगी हिंसाचार घडवतात, अशी फादर दिब्रिटो यांनी व्यक्त केलेली व्यथा काही खोटी नाही. गेले चार वर्षे ावर साहित्यिक, विचारवंत, कलाकार व पुरोगामी लोकांमध्ये याविषयी सातत्याने मंथंन सुरु आहे. परंतु यातून काही बोध घेऊन करण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रकार केला जातो. यासंबंधी विचारांचा लढा विचारानेच देण्यास फारसे कुणी पुढे येत नाही. तर थेट अशा व्यक्तींना सध्याच्या सोशल मिडियाच्या भाषेत बोलायचे तर ट्रोल केले जाते. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे पुण्यात भरविलेल्या 18व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो बोलत होते. विचारांचे जागतिकीकरण आपल्या वेदांमध्ये आणि संत साहित्यामध्ये आहे. सहिष्णुता हा धर्म आणि असहिष्णुता हा अपघात आहे. राज्यघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत या देशातील प्रत्येक जण सुरक्षित आहे. साहित्यिक आणि कलावंतांनी स्वाभिमान विकायचा नसतो. सुदैवाने काही निर्भीड विचारवंत राजा तू नग्न आहेस, अशी स्पष्ट भूमिका घेत आहेत, ही आशादायक बाब आहे, असे त्यांना सांगून नसिरउद्दीन शहा यांच्यासह अनेकांनी जी भूमिका घेतली त्याचे जोरदार समर्थन केले. सरकारी समितीवर वर्णी लावण्यासाठी किंवा सरकारी कोटयातून घर मिळविण्यासाठी जे रांगेत उभे आहेत त्यांच्याकडून अशा बाणेदारपणाची अपेक्षा करता येणार नाही, अशा शब्दांत दिब्रिटो यांनी काही साहित्यिकांच्या भूमिकेवर टीका केली, ती देखील रास्तच आहे. विभूतिपूजा, कर्मठपणा आणि पोथिनिष्ठा वाढत असल्याने हाडाच्या संशोधकांची कुचंबणा आणि विचारवंतांचा कोंडमारा होतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनसत्रामुळे आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होतो, असा फादर दिब्रिटो यांनी उपस्थित केलेला सवाल महत्वाचा होता. धर्मग्रंथ नाकारतो ते राज्यघटना आपल्याला देते हे शबरीमला प्रकरणात दिसले, हे दिब्रिटो यांचे विधानही महत्वपूर्ण आहे. कारण आजवर शबरीमला प्रकरणी अनेकांनी सोईस्कररित्या मौन बाळगले आहे. टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्या तेव्हा सामान्यांनी तिसरा डोळा उघडला, आताही लोक तिसरा डोळा उघडत आहेत, असे सांगत दिब्रिटोंनी नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे विश्‍लेषण केले. काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत अशा गोष्टींपेक्षाही आपल्याला भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त भारत हे उद्दिष्ट गाठायचे आहे, हे त्यांचे विधान महत्वाचे ठरावे. दिब्रिटो यांच्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर नुकतेच शह यांचे विधान आले होते. त्यांच्या विधानाचा सोयीस्कररित्या चुकीचा अर्थ लावण्यात आला तसेच त्यांच्या विधानांची मोडतोड करुन सोयीस्करित्या दाखविण्यात आले. शहा हे हिंदू धर्म मानतात. मात्र त्यांची पत्नी रत्ना पाठक या हिंदू आहेत. परंतु त्यांच्या घरी पुरोगामी परंपरा असल्याने त्या देव-धर्म मानीत नाहीत. आम्ही आमच्या मुलांना कोणत्याच धर्माची शिकवणूक दिलेली नाही, अशा वेळी जर एखाद्या जमावाने त्यांना गाठले व धर्माविषयी विचारले तर ते काहीच उत्तर देऊ शकणार नाहीत. मला अशा प्रकाराची भीती वाटते, नरिसउद्दीन शहांचा सवाल सध्याच्या उत्तरप्रदेशातील हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर योग्यच होता. त्यातून अल्पसंख्यांक समाजातील भीती, अस्वस्थता व्यक्त होत होती. यातून ते देशद्रोही कसे ठरु शकतात? परंतु त्यांच्या या विधानाच्या पाठोपाठ होणार्‍या एका साहित्यिक संमेलनाला त्यांना जाणे रद्द करावे लागले. त्यांनी या संमंलनास जाणे रद्द करमे यातूनच त्यांच्या विरोधी हिंदुत्ववाद्यांनी किती काहूर माजविले याचा विचार न केलेला बरा. अशा घटना झाल्या की यापूर्वीचे कॉँग्रेसचे हवाले दिले जातात. परंतु कॉँग्रेसशी कशासाठी तुलना केली जाते़? कॉँग्रेसच्या हातून चुका झाल्या म्हणूनच जनतेने मोठ्या विश्‍वासाने बहुमताने सत्तेवर बसविले आहे ना? शहा हे राष्ट्राभीमानी आहेत, त्याचे त्यांना काही पुरावे देण्यास सांगण्याची गरज नाही. परंतु नुकतेच त्यांनी पाक पंतप्रधानांना ज्याप्रकारे ठणकावून सांगितले ते पाहता हिंदुत्ववादी समजून चुकले असतील. अर्थात त्यांना यातून शहाणपण येणार नाही. कारण त्यांना देशाला हिंदुत्ववादी करायचे आहे. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने सर्वधर्मसमभाव ही झूठ कल्पना आहे. भाजपा किंवा त्यांच्या हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील सहिष्णुता पहावी, त्याचा इतिहास, पार्श्‍वभूमी तपासावी व नंतर टीका करावी. केवळ धर्माच्या आधारावर उभ्या असलेल्या देशांची झालेली शकले, स्थिती तपासावी आणि मग हिंदुत्ववादी घोडे पुढे दामटावे.
------------------------------------------------------------------- 

0 Response to "समाजातील अस्वस्थता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel