-->
महाआघाडीचे शिवधन्यूष्य

महाआघाडीचे शिवधन्यूष्य

सोमवार दि. 17 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
महाआघाडीचे शिवधन्यूष्य
पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारण एकदम स्वींग झाल्यासारखे झाले आहे. भाजपाची तर पुरती वाचा बसल्यासारखी स्थिती झाली आहे. सोशल मिडीयावरही आजवर फारसा कधी भाजपाविरोधी सुर नसायचा, परंतु इकडेदेखील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. एखादी घटना आपल्याकडे राजकारणाची दिशा कशी बदलू शकते त्याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. या बदलत्या राजकारणाची दिशा पाहून जे काँग्रेस-राष्ट्वादीत जे संधीसाधू नेते भाजपच्या दारी गेले होते ते माघारी परतण्याच्या बातम्या प्रसिध्द होऊ लागल्या आहेत. काही नेते आपल्याकडे राजकारणात पक्षाला वाहिलेले निष्ठावान असतात, ते कधीच आपला विचार, निष्ठा सोडत नाहीत. असे विचाराने पक्के असलेले लोक सर्वच पक्षात आपल्याला सापडतील. काही वेळा माणसे तात्वीक किंवा वैचारिक मतभेदाने पक्ष सोडतात. तर काही जर केवळ सत्ता मिळविण्यासाठी पक्ष सोडतात. अशी आयाराम गयारामांची संख्या आपल्याकडे अलिकडे बरीच वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर किमान पन्नास जणांनी आपली निष्ठा बदलली होती. अनेकदा आपल्या माणसांना सत्ताधारी पक्षात पाठविलेही जाते. आता राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार नाही अशी शक्यता वाटू लागल्यावर ही दुसर्‍या झाडावर उडालेली अनेक पाखरे आपल्या मूळ झाडावर परतण्याचा विचार करु लागली आहेत. येत्या काही दिवसात तशा घटनाही घडू लागतील. काही जण या पक्षांतराला तात्वीक मुलामाही देतील. एकूणच सध्या राजकीय वारे  बदलू लागले आहेत हे नक्की. भाजपा-शिवसेनेचा पाडाव करायचा असेल तर सेक्युलर पक्षांनी एकञ आले पाहिजे हे नक्की. त्यांची जी ताकद विभागली गेली आहे, जी मतविभागणी होते, ती होता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे. काँग्रेस, राष्ट्वादी, शेकाप, समजवादी पक्ष यांनी समान विचारांवर आघाडी उभारुन याची सुरुवात केली आहेच. नुकतेच सारकारनामाला मुलाखत देताना शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अशा प्रकारच्या आघाडीला चालना देण्याचे सुतोवाच केलेच आहे. शेकापची या संबंधीची वैचारिक बांधिलकी पक्की असल्याने वाटल्यास काही जागांवर पाणी सोडू पण सेक्युलर पक्षांची आघाडी झाली पाहिजे त्यांची ही त्यांची घोषणा स्वागतार्ह आहे. राज्यातील सर्व डाव्या पक्षांनी या आघाडीत सामिल होण्याची आवश्यकता आहे. अजूनही अशा प्रकारच्या आघाडीत सामिल होण्याची मानसिकता भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची झालेली नाही. ते जर अशा आघाडीत सामिल झाले नाहीत तर विधानसभेत शून्यावर येतील व आपली सर्व ताकद गमावून बसतील. कदाचित याचा फायदा जातियवादी पक्षांनाच होईल. त्यामुळे सर्व डाव्या पक्षांनी या महाआघाडीत सामिल होणे आवश्यक आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, नारायण राणेंचा स्वाभीमानी पक्ष देखील या आघाडीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होण्याची चिन्हे आहेत. अशा प्रकारे महाआघाडीचा ढाचा हळूहळू आकार घेऊ लागला आहे. राष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी य कामी पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने त्यांचे सध्या राज्यभर दौरे सुरु आहेत. या महाआघाडीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीनेही यावे असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते. सध्या बहुजन आघाडीने ओसेसींच्या पक्षाच्या सोबतीने जी आघाडी केली आहे त्यामुळे जातीयवादी पक्षांचाच फायदा होणार आहे. परंतु हे बाळासाहेब आंबेडकरांना पटवून कोण देईल? व त्यांना तरी पटेल का? असा सवाल आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधेल कोण असा प्रश्‍न आहे. जर आघाडीत बहुजन आघाडी आलीच तर त्याचा फायदा निश्‍चित होईल. माञ ते नसतील तर काही जागांवर नुकसानही होणार आहे. कालच अजित पवारांनी व्यापक आघाडीसाठी सर्व समविचारी पक्षांनी एकञ यावे असे आवाहन केले आहे. त्यांनी मनसेच्या राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांनाही आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला एक महत्वाचा संदर्भ आहे. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांच्या व्यासपीठावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. गेले दोन वर्षे राज ठाकरे मोदी विरोधात कट्टर भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर आपण उत्तर भारतियांच्या विरोधात नाही, मराठी माणसांना राज्यात प्राधान्याने नोकर्‍या मिळाव्यात व त्यानंतर अन्य राज्यातील येथील रहिवाशांना द्याव्यात ही त्यांची भूमिका पटणारी आहे. सध्या सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या विरोधात जबरदस्त जनमत आहे. शिवसेना सत्तेचा मलिदा खात असतानाही विरोधकांसारखे वागून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु  या सरकारचे अपयश हे दोन्ही पक्षांच्या पदरात पडणार आहे. या विरोधी मतांची विभागणी आगामी निवडणुकीत होता कामा नये याची दखल भाजपाविरोधी पक्षांनी घेण्याची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी 48 पैकी 40 मतदारसंघात आघाडीमध्ये मतभेद नाहीत. त्यामुळे आठ जागांचा तिढा सोडविला जाऊ शकतो. सध्याच्या स्थितीत भाजप लोकसभा व विधानसभा निवडणुका एकञ घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकसभेला सामोरे जाताना महाआघाडीचे शिवधन्युष्य पेलले जाईल यात काही शंका नाही. शरद पवारांनी हे पेलण्याचा निर्धार केला आहे. परंतु त्याला सर्व सेक्युलर व समविचारी पक्षांची साथ लाभली पाहिजे, हे ही तेवढेच खरे आहे. मोदी विरोधी लाट संपुष्टात येऊन भाजपा विरोधी देशात वातावरण निर्माण झाले आहे. आता जनतेचा हा संताप शिडात भरुन घेणारा पुढील लोकसभेतील निवडणुकीत विजयी ठरणार आहे. हे शिवधन्युष्य विरोधक पेलतील व हे जातीयवादी, जनविरोधी धोरण घेणारे सरकार उखडून टाकले जाईल हे नक्की.
-------------------------------------

0 Response to "महाआघाडीचे शिवधन्यूष्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel