-->
रायझिंग राहूल...

रायझिंग राहूल...

रविवार दि. 16 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
रायझिंग राहूल...
----------------------------------
पाच राज्यांच्या निकालाने देशाची राजकीय माहोल एकदम झपाट्याने पालटून टाकला आहे. सोशल मिडियावरही मोदी पुराण थांबल्यासारखे झाले असून मोदींच्या विरोधात इनिंग सुरु झाली आहे. कधी नव्हे ते एकदम कॉँग्रेसला पोषक व राहूल गांधींविषयी चार शब्द चांगले लिहीणारे लोक पुढे येऊ लागले आहेत. देशाच्या राजकारणाचा पोत झपाट्याने बदलला आहे. भाजपाचे व हिंदुत्वाचे सतत रेटून बोलणारे पोपट अचानक बोलती बंद झाल्यासारखे गप्प आहेत. या निकालाच्या निमित्ताने कॉँग्रेसचे कमबॅक झाले असून कॉँग्रेसच्या अच्छे दिनची सुरुवात झाली आहे व भाजपाचे आता बुरे दिन सुरु होतील असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. सध्याच्या निकालांच्या आधारे तयार केलेल्या अहवालानुसार, भाजपा केवळ 155 ते 165 च्या आसपास जागा मिळवेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांना 120 जागांचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने अन्य सेक्युलर पक्षांना बरोबर घेूऊन मोट बांधल्यास त्यांचा आकडा 150च्या वर जाऊ शकतो. कॉँग्रेसला अच्छे दिन येण्यास प्रारंभ झाला आहे, असे म्हणता येईल. अर्थातच याचे सर्व श्रेय कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनाच जाते. गेल्याच वर्षी याच दिवशी त्यांनी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यावेळी पक्ष अतिशय संकटातून वाटचाल करीत होता. मात्र गेल्या वर्षात राहूल गांधी यांनी खूप मेहनत घेऊन पक्षाला जीवदान दिले आहे. आता एक वर्षानंतर त्यांना फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजचा कॉँग्रेसचा विजय हा पक्षाला व कॉँग्रेसजनांना तसेच सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांचा एक मोठा विजय ठरावा. कारण साडेचार वर्षापूर्वी भाजपाने सत्तेत आल्यावर माज करीत कॉँग्रेसला संपविण्याचा व कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा भारतीय जनतेला मान्य नाही असेच आजच्या निकालावरुन दिसते. अन्यथा त्यांनी आजचा विजय कॉँग्रेस पक्षाला दाखविला नसता. आपल्याकडे लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाला एक महत्वाचे स्थान दिले आहे. प्रत्येकाला आपली विचारधारा बाळगण्याचा अधिकार देखील घटनेने दिला आहे. संपूर्ण भारत भगवा होऊच शकत नाही. सत्तेत असणार्‍याने विरोधी पक्ष संपविण्याची घोषणा करणे हेच मुळात लोकशाही विरोधी होते. यातून भाजपाची मानसिकता समजते. आता भारतीय जनता पक्षाचे फासे फिरु लागले आहेत, असेच या निकालावरुन म्हणावे लागेल. यापूर्वी गेल्या वर्षीच पंजाबमध्ये कॉँग्रेसने सत्ता काबीज केली होती. परंतु तसे पाहता हे राज्य लहान होते, त्यामुळे कॉँग्रेसचा विजय झाकोळला गेला होता. गुजरात राज्य मात्र कॉँग्रेसच्या हातून जरासाठी निसटले. किमान 20 आमदार हे 500 मतांच्या फरकाने पराभूत झाल्याने कॉँग्रेसला पराभव स्वीकारवा लागला. गुजरात भाजपासाठी व मोदी-शहा या जोडगोळीसाठी हा मोठा धक्का होता. खरे तर हा भाजपाचा विजयातला पराभवच होता. यातून धडा घेता आता कॉँग्रसने या पाच राज्यांसाठी व्यूहरचना आखली होती. ही व्यूहरचना म्हणजे, भाजपाच्या धोरणांवर टीका करणे व शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेकार तरुणांच्या मनातील असंतोष व्यक्त करणे. कुठेही वैयक्तीक पातळीवर टीका करण्यात आली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधवेच्या संदर्भात अगदी हिन विचार मांडून आपल्या वैचारिक दारिद्रयाचे दर्शन दिले. आज देशातील जनता अशा प्रकारचा विधवेचा अपमान सहन करीत नाही, हे निकाल सांगतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, ज्या राहूल गांधींना पप्पू म्हणून संबोधले, हिणवले त्याच्याच नेतृत्वाखाली भाजपाला या राज्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मोदीं-शहांना खरी भीती वाटते ती गांधी घराण्याचीच, हे यावरुन लक्षात येते. त्याच भीतीपोटी ते सतत राहूल गांधींना टार्गेट करीत होते. सोशल मिडियावर सर्वाधिक ट्रोलिंग राहूल गांंधींनाच ठरवून केले जात होते. असे असले तरीही राहूल गांधी कुठेही ढळले नाहीत, त्यांनी आपला विचार, आपल्या मनातील राग व्यक्त केला नाही. यातूनच त्यांचे परिपक्वपणा दिसला. पाच वर्षापूर्वीचे राहूल व आताचे राहूल याच बराच फरक झाला आहे. या विजयानंतर कॉँग्रेस पक्षाला एक नवचैतन्य येणार यात काही शंका नाही. गेल्या लोकसभेच्या पराभवानंतर कॉँग्रेस पक्ष नैराश्येच्या गर्तेतून बाहेर पडत नव्हता. आता पक्षाला यातून बाहेर पडण्यास मोठी मदत होऊ शकेल, असे दिसते. भाजपाने गेल्या काही वर्षात आक्रमक प्रचार, अवाढव्य पैसा खर्च करुन जाहीरातबाजी, चॅनल्स ताब्यात घेणे, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणे हे प्रकार सर्रास केले होते. सरकारी योजनाबाबत असो किंवा कोणत्याही इतिहासातील संदर्भ याबाबत जोमाने खोटे बोलत केवळ आपलाच विचार रेटणे हे प्रकार ते किळसवाणे होते. कोणत्याही विरोधकाला डोके वर काढता येणार नाही याची सर्व खात्री भाजपा बाळगीत असे. देशातील प्रत्येक महत्वाच्या संस्था त्यांनी आपल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्याखाली आणल्या आहेत. निवडणूक आयोग ही किती स्वायत्त संस्था असली तरीही तिचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते. परंतु अशा प्रकारे हुकूमशाही करण्याच्या प्रत्येक बाबीला मर्यादा असतात. आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे एवढी जबरदस्त मुरलेली आहेत की, जनता कितीही सत्ताधार्‍यांबरोबर आपण आहोत असे बाहेरुन दाखवत असली तरीही दर पाच वर्षानंतर त्यांना सत्ताभ्रष्ट करण्याचा हिसका दाखविते. ही आपली लोकशाहीची ताकद आहे. प्रत्येक वेळी मते विकत घेता येत नाहीत, किंवा लोकांना भूलथापा घालून दरवेळी फसवताही येत नाही. धर्माच्या नावावर लोकांचे धृवीकरणे करुन सत्ता काबीज करता येते, पण ती केवळ त्या जोरावर टिकवता येत नाही, याचा धडा आता भाजपाने घ्यावयास हवा. मुस्लिम मतांचे धृवीकरण करुन कॉँग्रेसने यापूर्वी हा धडा घेतला आहे. भाजपाचा विजयाबाबत एवढा आत्मविश्‍वास होता की पराभव स्वीकारणे त्यांना जड जाते आहे. विजयाबाबत कोणीही आशावादी असणे यात काही चूक नाही. परंतु लोकांना गृहीत धरण्याचा फाजिल आत्मविश्‍वास असू नये. सत्ता आली की त्या भोवती अनेक हितसंबंधी येतात. यातून कार्यकर्ते दूर सारले जातात, जनतेला गृहीत धरण्याची मनोवृत्ती सुरु होते. एजंट, कंञाटदार यांचे मोहोळ मंञ्यांभोवती तयार होते. यातच पराभवाची नांदी सुरु होते. यापूर्वी काँग्रेसचे असेच झाले होते. आता भाजपचे झाले. सत्ता आली की सत्ताधार्यांचे पतंग हवेत उडू लागतात. मग जनता निवडणुकीत या पतंगाचा मतपेटीव्दारे दोर कापते. नंतर या राजकारण्यांचे पाय अचानक जमिनीवर येतात. नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्याकडे सत्ता आल्यापासून एक प्रकारे मग्रुरी आल्यासारखे दिसत होते. आपल्या देशाचा इतिहास-भूगोल विसरुन आपण करु तेच खरे अशा थाटात ते वागू लागले होते. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विधवेसंदर्भात केलेले विधान हे तर मग्रुरीची परिसीमा होती. सोनिया गांधींचे पती हे गोळ्या झेलून हुतात्मा झाले आहेत, याचे त्यांना भान राहिले नाही. काँग्रेस पक्षाला स्वातंञ्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला कीतीही मान्य नसला तरी फुसला जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या सत्ताकरणात जरुर चुका झाल्या असल्या तरी त्यांना या देशातून संपविता येणार नाही. या देशात आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे. काँग्रेसने सत्तेत असताना हिंदुत्वाच्या विचारसारणीच्या लोकांना कधीच विरोध केला नाही किंवा त्यांच्यावर बंधने आणली नाहीत. मग भाजपा सत्तेत आल्यावर काँग्रेसला संपविण्याची भाषा का करतो? यामागे केवळ सत्तेची गुरमीच म्हटली पाहिजे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे देखील पंतप्रधान होते परंतु त्यांनी असा कधी विचार केला नाही. मोदी-शहा यांच्या जोडीने देशात हुकूमशाहीसारखी स्थिती निर्माण केली. आणीबाणी इंदिरा  गांधींनी कितीही चांगल्या हेतूने आणली असली तरी जनतेला ती अन्यायकारक वाटली, त्यामुळे त्यांना जनतेने आपला हिसका दाखविला. परंतु लगेचच केवळ दोन वर्षातच सत्तास्थानी बसविले. जनतेचे प्रेम व रोष लोकशाहीत असे असते. आता पुढील पन्नास वर्षे राज्य करण्याचा मनोदय जाहिर करणे म्हणजेच जनतेला गृहीत धरण्याचा  हा प्रकार आहे. ज्या मोदींना प्रेमाने सत्तेत आणले तीच जनता लाथाडू शकते हे विसरता कामा नये. विरोधकांनी गेल्या वर्षी सरकारवर मांडलेल्या अविश्‍वास ठरावाच्या वेळी राहूल गांधींनी जे आक्रमक, संवेदनाक्षम व सकारात्मक गूण दाखविणारे भाषण केले होते. त्याचवेळी त्यांच्यातले नेतृत्वगूण झळाळले होते. मोदी-शहा यांच्यात आपणच हुशार, ग्रेट आहोत हे सांगण्याची चढाओढ असते. परंतु त्यांची भाषणे टी.व्ही.वर लागली की लोक चँनेल बदलतात अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. ही स्थीती त्यांनी स्वत:वर ओढावून घेतली आहे. पंतप्रधानांनी सर्व पक्षीयांना सोबत घेऊन जात देशाचे नेतृत्व केले पाहिजे. परंतु मोदी तिकडे कमी पडतात. कारण त्यांना दुसर्‍यांचे एैकायचे नसते व आपले तेच खरे हे सांगायचे असते. त्यांच्या या स्वभावामुळेच घात झाला आहे व भविष्यातही होणार आहे. आता त्यांना जनतेला गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा द्यावयाचा आहे. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता किती केली ते दाखवायचे आहे. यावेळी मोदी व भाजपला त्या आधारावर जनता मते देणार आहे. याची त्यांनी जाण ठेवावी.
-------------------------------------------------------------------

0 Response to "रायझिंग राहूल..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel