-->
मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा

मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा

रविवार दि. 02 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा
--------------------------------------
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) हे यान मंगळ ग्रहावर नुकतेच उतरले.  सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर सुखरुपणे उतरले. आपल्याकडे ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा नकारात्मक समजला जातो. परंतु मनुष्याने याच ग्रहावर आता स्वारी करुन या मंगळाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान नासाकडून बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 कि.मी. प्रतितास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि मंगळभूमीवर उतरले. त्यापाठोपाठ इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवलेे. सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइट मंगळावर उतरले. नासाच्या या प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौरऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणार्‍या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल, अशी अपेक्षा आहे. इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फूट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्त्वाचे आहे. यावर्षी 5 मे रोजी नासाने कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस व्ही रॉकेटद्वारे या यानाचे प्रक्षेपण केले होते. यापूर्वी 2012 मध्ये मंगळावर क्युरोसिटी हे यान पाठवण्यात आले होते. तेव्हा मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला होता. इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणार्‍या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. मंगळावर भविष्यात मनुष्य पाठविण्यासाठीचे हे पहिले पाऊल मानले जाते. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुटनिक हा पहिला-वहिला मानवनिर्मीत उपग्रह अवकाशात सोडून एका नव्या क्रांतीला सुरुवात केली होती. त्या घटनेला तब्बल साठ वर्षे लोटली आहेत. या 60 वर्षाच्या काळात जग पूर्णपणे बदलले आहे. ज्या सोव्हिएत युनियनने हा उपग्रह अवकाशात सोडून जागतिक पातळीवर विक्रम केला तो सोव्हिएत युनियन हा देशच जगाच्या नकाशातून आता फुसला गेला. त्यामुळे आता गेल्या 60 वर्षात जगात केवळ तांत्रिक बदल झाले नाहीत तर जगाचा इतिहास-भूगोलही बदलला आहे. जगातील तंत्रज्ञानाने एक मोठी भरारी घेतली आहे. आज दळणवळाची माध्यमे सहजरित्या उपलब्ध झाली आहेत. ज्याकाळी रेडिओ हा देखील चमत्कार वाटे त्याकाळी मानवाने कृत्रीम उपग्रह अवकाशात पाठवून त्यातून लहरी स्वीकारण्यास सुरुवात करणे हे एका जबरदस्त क्रांतीचे एक महत्वाचे पाऊल होते. स्पुटनिकचे अवकाशात जाणे व त्याने पृथ्वीभोवती फेर्‍या मारणे ही त्याकाळी शास्त्रज्ञांनी साध्य केलेली मोठी बाब होती. आज संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे जग अतिशय जवळ आले हे वास्तव खरे असले तरीही स्पुटनिकची भरारी हा एक संशोधनातील महत्वाचा पल्ला होता. दुसरे महायुध्द संपल्यावर जी मिसाईल्स या युध्दात वापरण्यात आली होती त्यापेक्षा जास्त क्षमतेचा वापर करुन अवकाशात मानवाने पदार्पण करावे असा विचार सुरु झाला होता. मानवाला शंभर कि.मी.ची झेप घेऊन जर अवकाशात प्रवेश करावयाचा असेल तर काय केले पाहिजे याचे संशोधन त्यावेळच्या दोन महासत्ता सोव्हिएत युनियन व अमेरिका करीत होत्या. त्यासंबंधी या दोन महासत्तांमध्ये जबरदस्त स्पर्धाही होती. अर्थातच ही स्पर्धा दोन विचारांची होती. समाजसत्तावाद विरुध्द भांडवलशाही अशी ही लढाई होती. यातून जन्माला आली अमेरिका व सोव्हिएत युनियनमधील अवकाशातील स्पर्धा. 184 पौंड वजन असलेल्या स्पुटनिकचे स्वरुप हे एखाद्या फुटबॉलच्या चेंडू एवढे होते. याचे आयुष्यही अल्पच ठरले. जेमतेम वर्षाच्या आतच तो निकामी झाला. दर तासाला 1800 मैल अशा वेगाने त्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घालावयास सुरुवात केली. स्फुटनिकने यशस्वीरित्या रेडिओचे सिग्नल्स पाठविण्यास सुरुवात केली होती. स्पुटनिकचा हा प्रयोग पूर्णत: यशस्वी झाला होता. त्यादृष्टीने पाहता स्पुटनिकचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही. त्यापाठोपाछ अमेरिकेने सोव्हिएत युनियनवर मात करण्यासाठी एक्स्पोलर हा उपग्रह 31 जानेवारी 1958 साली अवकाशात पाठविला. परंतु या स्पर्धेत सोव्हिएत युनियन पुढेच राहिला. कारण एक्स्पोलरचे प्रक्षेपण होईपर्यंत सोव्हिएत युनियनने स्पुटनिक-2 चे प्रक्षेपण केले होते. स्पुटनिक यशस्वी झाल्याने अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यातील शीत युध्द भडकायला सुरुवात झाली. 1957 साली अमेरिकेला अवकाश कार्यक्रमात अनेकदा अपयशच लाभत होते. त्यांचा एक उपग्रह व्हॅनगार्ड हा लॉच पॅडवरच स्फोटाच्या बळी पडला. मात्र त्यानंतर अमेरिकन अवकाश शास्त्रज्ञांनी आपली जिद्द काही सोडली नाही, त्यांना एक्स्पोलरमध्ये यश मिळाले. अमेरिकेने अवकाशातील शस्त्रात्र वाढविण्याचा निर्णय घेतला. अणूस्फोटाच्या बंदीच्या बाजूने या दोन्ही महासत्ता बोलत असल्या तरीही त्यांनी अवकाशात आपली शस्त्रे नेण्याचे नवीन तंत्र आत्मसात केले. जग त्यावेळी या दोन्ही महासत्तांच्या ताब्यात होते आणि हे देश जसे वागतील तसे अन्य लहान देशांना वागावे लागत होते. अवकाशातील स्पर्धा ही मानवजातीचा नाश करण्याच्या थरापर्यंत पोहोचेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र 90 साली सोव्हिएत युनियन अस्तंगत पावल्यावर ही स्पर्धा संपुष्टात आली. त्यापूर्वी या दोन्ही महासत्तांनी चंद्रावर स्वारी केली होती, मानवाने आपले पाऊल चंद्रावर ठेवले. स्वातंत्र्यानंतर भारताने देखील इस्त्रो ही अंतराळ संशोधन संस्था स्थापन करुन या क्षेत्रात उडी घेतली. पंडित नेहरुंची दूरदृष्टी त्याला कारणीभूत होती. ज्येष्ठ संशोधक विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली या संशोधनाला सुरुवात झाली. तामीळनाडूतील थुंबा हे ठिकाण त्यासाठी निवडले गेले. आपण देशात बनविलेला आर्यभट्ट हा उपग्रह रशियातून सोडण्यात आला. त्यावेळी आपल्याकडे उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले नव्हते. त्यामुळे तो रशियातून सोडण्यात आला. त्यानंतर भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपण सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने 80च्या दशकात भारतीय अवकाशविराला अंतराळात पाठविले होते. मात्र आता इस्त्रो स्वत:च्या बळावर अवकाशात माणूस नेऊ शकतो. भविष्यात ते सहज शक्य आहे. चांद्रयान, मंगळयान अशा प्रकारच्या आपल्या स्वार्या आजवर यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण उपग्रह सोडण्याच्या संदर्भातील अनेक विक्रम केले आहेत. अगदी शंभराहून जास्त उपग्रह एकाचवेळी सोडण्याचा आपण जागतिक विक्रमही केला आहे. यातून आपली ही संस्था स्वबळावर उभी राहाणार आहे. कारण उपग्रहांचे प्रक्षेपण हा एक मोठा व्यवसाय आहे. अनेक देशांकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सर्वच देशांना त्यांच्या दळणवणासाठी उपग्रह हा लागतोच. ती सेवा आता इस्त्रो अनेक देशांना पुरवित आहे. गेल्या 60 वर्षात स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर जगात अनेक तांत्रिक बदल झाले. उपग्रहांमुळे दळणवळण सुलभ झाले. शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज आगावू देता येऊ लागला. शत्रू पक्षावर नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिपता येऊ लागल्या. मानवाच्या विकासात हा मोलाचा टप्पा आहे. त्यामुळेच 60 वर्षापूर्वी स्पुटनिकचे अवकाशातील प्रक्षेपण ही संशोधनातील क्रांतिकारी घटना आहे. त्यानंतर आता मंगळावरची स्वारी हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आता पुढील टप्पा म्हणजे, सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी 31 जुलै नासा अंतराळात सोडणार आहे. अशा प्रकारे थेट सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान असेल. ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती 2025 मध्ये संपेल. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल एवढे जवळ जाईल. 2,550 फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी 4.30 लाख किमी वेगाने सूर्याच्या 24 प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या तार्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल. मानवाची आपल्या ग्रहमालिकेचा शोध घेण्याची इच्छा ही अतिशय तीव्र आहे. आता तर या मालिकेचा पितग्रहावर त्याचे चाल केली आहे. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे नवनवीन शोधांचा ध्यास घेऊन काम करण्याचा प्रकार आहे. यात त्यांच्या संशोधनाला यश लाभो हीच सदिच्छा.
-----------------------------------------------------------

0 Response to "मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel