-->
राम के नाम...

राम के नाम...

मंगळवार दि. 27 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राम के नाम...
सध्या रामाच्या नावाचा जोरदार हुंकार सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून हा हुंकार उमटला आहे. तसे पाहता गेले चार वर्षे यांनी राम मंदिरासंबंधी मौन बाळगले होते. परंतु आता अचानक शिवसेनेला राम मंदिराचा प्रश्‍न किती गरजेचा आहे, असे वाटू लागणे म्हणजे निव्वळ निवडणुकांसाठी केलेला हा स्टंट आहे, हे समजण्यास जजनता काही दुधखुळी नाही. शिवसेना केंद्रात व महाराष्ट्रात भाजपासोबत मांडीला मांडी लावून सुरुवातीपासून सत्तेत आहे. परंतु त्यांना राम मंदिराच्या उभारणीची काही आठवण झाली नाही. भाजपाबरोबर सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे राम मंदिराचा प्रश्‍न उकरुन काढून भाजपाविरोधी कुरघोडी करावयाची, हे शिवसेनेचे राजकारण आहे. निवडणुका आल्या की भाजपापासून ते शिवसेनेपर्यंत सर्वांनाच गेल्या तीस वर्षात रामाची आठवण होत असते. आता देखील तसेच आहे. रामाची ही खेळी शिवसेनेची भाजपावर दबाव निर्माण करण्यासाठीच आहे. संघाचे देखील तसेच आहे. त्यांची राजकीय संघटना भाजपा केंद्रात गेली साडे चार वर्षे सत्तेत आहे. एवढा काळ राम मंदीराच्या उभारणीसाठी कोणते प्रयत्न केले असा सवाल उपस्थित होतो. हा प्रश्‍न न्यायालयाच्या दरबारात अडकला आहे, असे भाजापातर्फे सांगण्यात येते. जर तुम्ही राम मंदिराची उभारणीचे आश्‍वासन देले आहे तर ते कसे पाच वर्षात उभारले जाणार याची आखणी भाजपाने करावयास हवी होती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे बाबरी मशिद पाडल्यापासून प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराचा प्रश्‍न उपस्थित होतो. हिंदुंच्या भावनेंशी अशा प्रकारे खेळ केला जातो. मंदिर काही प्रत्यक्षात उभारले जात नाही. मंदीर उभारणे सोडा एक वीटही रचली जात नाही, केवळ गप्पा होतात व न्यायालयाच्या नावावर खापर फोडून मोकळे होतात. भाजपाचे हे राजकारण काही नवीन नाही. आता मात्र शिवसेनेने त्यांना यासंबंधी अयोध्येत जाऊन आव्हान दिल्याने भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी पक्षांमध्येच अशा प्रकारे मतभेद होणे भाजपाच्या हिताचे नही, हे मात्र खरे. अयोध्येत शरयूतीरावर शनिवारी उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर, फिर सरकार! असा नारा दिला, तर रविवारी विश्‍व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेतही त्यास दुजोरा देणारे नारे दणाणले. विहिंपला खर्‍या अर्थाने मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू व्हायला हवे आहे, तर शिवसेनेला या मुद्यावरून भाजपची कोंडी करून, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत. त्यामुळेच विहिंप आणि भाजप यांनी तीन दशकांपूर्वी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या मुद्यावर आमचाच जास्त हक्क आहे, हे शिवसेनेला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे उद्धव यांनी थेट अयोध्येचा रस्ता धरला आणि तेथे जाऊन या विषयावर सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपले आहे अशा तिखट शब्दांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. गेली दोन वर्षे भाजपला धारेवर धरण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. एकाच दगडात असे अनेक पक्षी मारण्याची संधी घेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सरकारने यासंबंधात अध्यादेश काढला, तर संसदेत शिवसेना त्यास पाठिंबा देईल, अशी ग्वाहीही थेट शरयूतीरावरून देण्यास ते विसरले नाहीत. शिवसेना सध्या विरोधी पक्षांसारखी भाजपावर टीका करीत आहे. मात्र सत्तेत राहून ही टिका केल्याने त्यांच्या शब्दाला जार रहात नाही हे देखील तेवढेच वास्तव आहे. गेल्या वर्षात शिवसेनेचे भाजपासोबतचे संबंध आता एवढे ताणले गेले आहेत की उभयतांमध्य्े यासंबंधी काहीच संवाद राहिलेले नाही. अशा स्थितीत शिवसेेना सत्तेची अंडी उबवत आहे. परंतु ही सत्ता सोडण्याचे धैर्य त्यांच्याकडे नाही. उद्धव यांनी शेतकरी वा दुष्काळ वा बेरोजगार आदी विषयांना हात न लावता थेट राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे आणि नेमका तोच मुद्दा त्यांना पुन्हा भाजपबरोबर जाण्याचा मार्गही मोकळा करून देणारा आहे. एका अर्थाने, हा सारा खेळ सत्तेसाठीच आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जेवढे शक्य आहे, तेवढे अडचणीत आणावयाचे आणि आपली महाराष्ट्रातील ताकद देशातही आहे, हे दाखवून देण्यासाठीच उद्धव यांनी अयोध्येवर स्वारी केली. पण भाजपाने त्यांच्यांवर कुरघोडी करीत त्यांना जाहीर सभेस परवानगी दिली नाही. शेवटी महाराष्ट्रातून शरयूतीरावर पोचलेल्या मराठी शिवसैनिकांसमोर उद्धव यांनी भाजपला आव्हान देणार्‍या गर्जना केल्या. राज्याचे सध्या भेडसाविणार्‍या प्रश्‍नाबाबत मौन बाळगून रामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने अयोध्या गाठणे हे सध्याच्या राज्यातील जीवनमरणाच्या प्रश्‍नांना बगल देण्याचा प्रकार होता. शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या, दुष्काळामुळे हैराण झालेला शेतकरी, बेकारी या जीवनमरणाच्या प्रश्‍नाबाबत शिवसेनेने हल्लाबोल करुन भाजपाला हैराण करुन सोडले असते तर उध्दवरावांचे कौतुक कोणीही केले असते. परंतु शरयुतीरावर जाऊन रामाच्या नावाने उगाचाच तीर मारण्याच्या बढाईचे कौतूक कोण करील असा सवाल आहे. कारण राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत आहे, त्यामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अपयशाचे धनी ते देखील आहेत. परंतु ते आपले अपयश लपविण्यासाठी रामाच्या नावाचा सध्या गजर सुरु आहे. सध्या रामाचा जो गजर सुरु आहे त्यांना रामाविषयी काडीमात्र आपुलकी नाही त्यांना फक्त त्यातून राजकारण करावयाचे आहे. 
-------------------------------------------------

0 Response to "राम के नाम..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel