-->
दहा वर्षानंतर....

दहा वर्षानंतर....

सोमवार दि. 26 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
दहा वर्षानंतर....
मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याला रविवारी दहा वर्षे पूर्ण होत असताना या हल्ल्याचा पाकिस्तानातील मुख्य सुत्रधार व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद अद्याप मोकाट सुटलेला आहे. हाफिस सईद या दहशतवाद्याला पाकिस्तानने जेरबंद करावे यासाठी त्यांच्यावर जागतिक पातळीवर दबाव होता. त्यामुळे केवळ लाजेखातीर हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने काही महिने नजरकैदेत ठेवले होते. मात्र न्यायालयाने मुक्तता केल्याने आता हाफिज त्या देशातील राजकारणात थेट सहभाग घेऊ शकला. माञ नुकत्या झालेल्या निवडणुकीत त्याचे  पानिपत झाले. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा कट रचण्यामध्ये हाफिजबरोबरच सहभागी झकी उर रहेमान, काफिया, अबू हमजा, कर्नल आदी 12 पाकिस्तानी दहशतवादीही सामील होते. या सगळ्यांना आमच्या ताब्यात द्यावे, अशी भारताची मागणी आहे. परंतु त्याबाबत पाकिस्तान नेहमीच टाळाटाळ करीत आला आहे. आता सईदची मुक्तता केल्याने पाकिस्तानी सरकार कितीही दबाव आला तरी भारतविरोधी कारवाया काही कमी करणार नाही हे पुन्हा एकदा या घटनेनंतर सिध्द झाले आहे. मुंबईवर हल्ला चढवण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे काम ज्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केले त्या अबू जुंदालला अद्याप भारताच्या हवाली करण्यात आलेले नाही. मुंबई हल्ल्यासाठी ज्या डेव्हिड हेडलीने सर्व रेकी केली होती तो सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. डेव्हिड हेडली हा नेमका कोणाचा एजंट म्हणून काम करीत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्यासंदर्भात जी साक्ष अमेरिकेतून दिली त्यावरच भारताला समाधान मानावे लागले. दहा वर्षानंतरही मुंबई हल्ल्यामागील पाकिस्तानी सूत्रधार व त्याचे साथीदार मोकाट फिरत आहेत. या हल्ल्यात भारताच्या हाती लागलेल्या अजमल कसाबला मात्र आपण न्यायालयात उभे करुन त्याला फासावर चढविले. कसाब जर हाती लागला नसता तर या हल्यामागची सर्व योजना एक गुपीतच राहिली असती. कसाबने आपण पाकिस्तानातून आलो, तेथे हा कट शिजला हे मान्य करुनही पाकिस्तान सरकार मात्र मान्य करीत नाही. त्यामुळे पाकिस्तानचे या अतिरेक्यांना किती समर्थन आहे, त्याचा उत्तम पुरावा आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर तेथील सरकारने कठोर कारवाई करावी यासाठी अमेरिकेने गेल्या काही महिन्यांपासून दबाव आणखी वाढवला आहे. परंतु या दबावापुढे पाकिस्तान काही झुकणार नाही असेच दिसते. कारण हाफिजची मुक्तता न्यायालयाच्या पदराआडून करून पाकिस्तानने अमेरिकेच्या दबावाला केराची टोपली दाखवली. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला याआधीच दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. साहजिकच आता हाफिज सईदची मुक्तता झाल्याने अमेरिकेने पूर्वी कधी नव्हे इतका कडक पवित्रा घेतला. या घटनेचा अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परिणाम होऊ शकतो तसेच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला तडा जाऊ शकतो, असा इशाराच अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. पाकमध्ये आता नवीन सरकार सत्तेत आल्यावरही अतिरेक्यांच्या संदर्भात धोरण बदललेले नाही. तसे पाहता हाफिज सईदला अटक करून त्याला भारताच्या हवाली करणे पाकिस्तानला सहजशक्य होते. मात्र तसे केले असते तर पाकिस्तान दहशतवादी गटांना आश्रय देऊन भारतात व जगात अन्यत्र ज्या घातपाती कारवाया घडवून आणतो त्या सगळ्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला असता. हाफिजने स्थापन केलेल्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेने मुंबई हल्ल्याच्या आधी 2001 मध्ये भारतीय संसदेवर घातपाती हल्ला घडवून आणला होता. काश्मीरमध्येही दहशतवादी कारवाया करण्यामागे या संघटनेचा हात आहे. त्यामुळे लष्कर-ए-तोयबावर पाकिस्तानात बंदी आणण्यात आली असली तरी हाफिजने जमात-उद-दावा या संघटनेच्या पदराआडून आपले उपद्व्याप सुरूच ठेवले आहेत. याच हाफिजने काही वर्षांपूर्वी दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिलच्या नावाखाली पाकिस्तानातील चाळीसहून अधिक कट्टर व दहशतवादी संघटनांची मोट बांधली होती. या वेळी अमेरिका व भारताविरोधात जिहाद पुकारण्याचे आवाहन हाफिजने या संघटनांना केले होते. आता तर पाकिस्तानी न्यायालयाने त्याची मुक्तता केल्यानंतर हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला. भारत सरकार माझे काहीही वाकडे करू शकत नाही, काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल, अशी दर्पोक्ती त्याने पुन्हा केली आहे.  पाकिस्तानातून भारतात काश्मीरमध्ये होणार्या घातपाती कारवायांमध्ये सतत वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यात तर शेकडो भारतीय सैनिक धारातीर्थी पडले आहेत. अगदी लष्कराने पाकच्या हद्दीत घुसून केलेले ऑपरेशन हे मोदी सरकारने आपले एक मोठे कृत्य असल्याचे जाहीर करुन यामुळे घुसखोरी कमी होईल असे बोलले जात होते. मात्र तसे काहीच झालेले नाही. भाजपाच्या सरकारने आता तरी आपली छप्पन्न इंची छाती फुगवून पाकवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. 26/11 जे आरोपी पाकमध्ये लपलेले आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर शिक्षा होणे गरजेच आहे. पाकिस्तानात नवीन सरकार आल्याने फार मोठा काही धोरणात्मक बदल होणार नव्हता. पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातचे बाहुलेच आहेत. आज दहा वर्षानींही 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी कृत्यातील गुन्हेगार मोकाटच आहेत, हे पंतप्रधानांनी विसरु नये.
---------------------------------------------

0 Response to "दहा वर्षानंतर...."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel