-->
देशातील गौरींचे वास्तव

देशातील गौरींचे वास्तव

सोमवार दि. 17 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
देशातील गौरींचे वास्तव
सध्या आपल्याकडे गणपतींसोबत गौरी देखील मोठ्या दिमाखात आल्या आहेत. अनेक घरात गौरींबरोबर मोठ्या भक्तीभावाने गौरीचेही पुजन केले जाते. हा त्या गौरीचा मोठा मान असतो. यातून आपण आपल्या महिलांचा गौरव करीत असतो, असा दावा आपल्याकडील संस्कृतीरक्षक करतीलही. मात्र आपण एकीकडे गौरीचे पुजन करीत असताना देशातील जिवंत गौरीला नरकयातना देत आहोत, असेच चित्र आहे. गौरींचे पुजन करताना आपल्याला देशातील गौरींची स्थिती काय आहे, हे देखील बघणे आवश्यक ठरते. जगातील प्रत्येक झालेल्या तीन महिलांच्या आत्महत्येत एका भारतीय महिलेचा समावेश असतो, असा अहवाल लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल ने प्रसिध्द केला आहे. या जर्नलने जागतिक आरोग्यचा व भारतातील आरोग्याचा एक अहवाल नुकताच नवी दिल्लीत प्रकाशीत केला. या अहवालात आपल्याकडील महिलांची स्थिती अत्यंत दारुण असल्याचे दाखविते. त्याचबरोबर भारतातील आरोग्याविषयी अनेक आकडेवारी यात प्रसिध्द करण्यात आली आहे. जगातील एकूण लोकसंख्येमध्ये भारताचा वाटा 18 टक्के आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्याविषयी जगाने लक्ष ठेवणे आपण समजू शकतो. जगात होणार्‍या आत्मह्त्येंपैकी 37 टक्के भारतात महिलांच्या होतात व हेच प्रमाण पुरुषांच्या बाबतीत 24 टक्के आहे. विवाहित महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे आपल्याकडील या अहवालात आढळले आहे. याच्या मागच्या प्रमुख कारणांमध्ये लवकर लहान वयात होणारी लग्ने, समाजातील दुय्यम स्थान, लहान वयात आलेले मातृत्व, घरातील मारहाण व सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक परावलंबित्व यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांना या कारणातून आलेल्या नैराश्येवर कोणताही उपाय न झाल्यामुळे देशातील स्त्रिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात दिसतात. आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता ही केवळ कागदावर राहिली आहे. महिलांना अगदी शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत कोणतेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. पुरुषावरच तिला अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे काही समाजात महिलांचे वर्चस्व दिसते, परंतु याचे काही अपवाद आहेत. बहुतांशी महिलांना समाजात दुय्यम स्थानच असते. देशात होणार्‍या महिलांच्या आत्महत्येपैकी 63 टक्के आत्महत्या या 15 ते 39 या वयोगटातील आहेत. 1990 ते 2016 या काळात भारतात आत्महत्येंचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले आहे. कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. तर केरळ, छत्तीसगढ या राज्यात पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. महिलांचा हा केवळ निव्वळ आरोग्याचा प्रश्‍न नाही तर त्यात सामाजिक वास्तव दडलेले आहे. महिलांना स्वावलंबी करणे व त्यासाठी समाजातील तळागाळातील घटकापासून त्याचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडे महिलांना सरपंचापासून विविध पदे राखीव ठेवली. परंतु तेथे अनेक ठिकाणी त्या महिला केवळ सह्यांपुरत्या नामधारीच असतात. त्यांच्या जागी त्यांचे नवरेच सर्व कामे करताना दिसतात. त्यामुळे महिलेला पद मिळाले तरी तिला समाजातील दर्जा दुय्यमच राहिला आहे. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्‍नात आपल्याकडे कुणी गांभीर्याने विचारच केलेला नाही. सध्याच्या गणपतीच्या काळात किंवा कोणत्याही सणासुदीच्या काळात मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्याचे प्रमाण सध्या शहरांपासून ते ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढले आहे. याचे भयानक साईड इफेक्टस् आहेत. परंतु मासिक पाळी म्हणजे विटाळ, काही तरी वाईट, या काळात देवापुढे जाणे म्हणजे गुन्हाच अशा समजुतींपायी महिला या गोळ्याचे सेवन करतात आणि नंतर काही काळाने विविध रोगांच्या बळी ठरतात. या गैरसमजुतींचे जाळे आपण फेकून देत नाही तोपर्यंत महिला खर्‍या अर्थाने सबळ होणार नाहीत. अजूनही आपल्याकडे अल्पवयातील मुलींची लग्ने होतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की बापाला हायसे वाटते. त्यामुळे लवकर लग्ने करण्याकडे कल जास्त असतो. लग्न झाले की लगेचच मुलांचा गाडा सुरु होतो. यात परत मुलगी नको, मुलगाच हवा या अटीतर असतातच.यात सर्व कही सोसणारी महिला शरीराने व मनाने खंगत जात असते, याचा कुणी विचारच करीत नाहीत. घरगुती मारहाण हा महिलांसाठी आपल्याकडे मोठा प्रश्‍न आहे. नवरा कधी दारु पिऊन तर कधी संशयाने पछाडून आपल्या बायकोला मारहाण करीत असतो. तर सासू-सासरे हुंड्याच्या लोभापाई तिला छळत असतात. कायद्याने महिलांना यासंबंधी संरक्षण दिलेले असले तरी कायदा हा केवळ कागदावरच राहतो, आपल्याकडे जोपर्यंत याविषयी समाजजागृती होत नाही तोपर्यंत महिलांवरील हे अत्याचार काही थांबणार नाहीत. महिलांना आर्थिक स्वावलंबी करणे ही सारव्त महत्वाची बाब ठरणार आहे. कारण एकदा का तिला आर्थिक स्वावलंबन लाभले की ती तिच्या पायावर उभी राहू शकते. आज शहरात अनेक स्त्रिया अशा प्रकारे आर्थिक स्वालंबनामुळे स्वत:चा निर्णय स्वत: घेताना दिसतात. परंतु जोपर्यंत हे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत यात खरी क्रांती होणार नाही. महिलांचे हे प्रश्‍न गंभीर आहेत, अगदी प्रत्येक घरात नसले तरी कमी जास्त प्रमाणात असतातच. आज आपल्याकडे आलेल्या गौरीचे पुजन करताना महिलांच्या या प्रश्‍नांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय रहात नाही. 
--------------------------------------------------

0 Response to "देशातील गौरींचे वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel