-->
धर्मरक्षणासाठी नावाखाली...

धर्मरक्षणासाठी नावाखाली...

बुधवार दि. 22 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
धर्मरक्षणासाठी नावाखाली...
नालासोपरा येथील अटकेनंतर व तेथील शस्त्रास्त्र साठा जप्त केल्यानंतर आपल्याकडे हिंदुत्ववादी संघटना किती पुढेपर्यंत गेल्या आहेत याचा अंदाज येऊ शकतो. अतिरेकी मुस्लिम संघटना व या हिंदुत्ववादी संघटना यांच्या काहीच फरक राहिलेला नाही, हे देखील यावरुन स्पष्ट दिसते. धर्माच्या बुरख्याखाली अनेक तरुणांची माथी भडकावून त्यांची दिशाभूल करुन धर्माच्या नावावर त्यांच्याकडून हत्या करवून घ्यायच्या हे तंत्र त्यांनी अवलंबिले होते. या प्रकरणाची जशी चौकशी होईल तसे अनेक बुरखे यातून टराटरा फाडले जाणार आहेत. खरे तर हे अगोदरच उघड व्हायला पाहिजे होते, परंतु कर्नाटकच्या ए.टी.एस.ने गौरी लंकेश यांच्या खुन्यांचा थडा लावल्यावर त्यातून हिंदुत्ववाद्यांची ही हत्यारी साखळी आता उघड होत आहे. राज्यात त्यांना पोषक सरकार असल्यामुळे हा बुरखा लपविला गेला होता. मात्र कर्नाटकच्या सरकारने जोर लावल्यावर आता हे सर्व उघड झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दीर्घकालीन कटाचा भाग होती आणि या कटाची व्याप्ती कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत पोचली आहे, या निष्कर्षापर्यंत केंद्र आणि राज्यस्तरीय तपास संस्था आल्या आहेत. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्या पाठोपाठ त्याचे आणखी साथीदार येत्या काही दिवसांत गजाआड होतील, असे दिसते. अत्यंत नियोजनपूर्वक आणि भविष्यातील त्याचे सर्व परिणाम लक्षात घेऊन दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत, यावरही तपास संस्थांचे अधिकारी ठाम आहेत. दुर्जनांचा नाश करायचा, धर्मसंरक्षणासाठी निधी संकलन करायचे आणि शस्त्रसाठा जमा करून संघर्ष करायचा, हा या सार्‍या हत्यांमागील उद्देश असल्याचे तपासात पुढे येत आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे, सनातनी प्रवृत्तीचे घटक त्यासाठी एकत्र आल्याचेही उघड होत आहे. हिंदू जनजागृती समितीचा राज्य समन्वयक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकोलकर, समितीचा अमोल काळे, सचिन अंदुरे आदींची नावे तपासांत पुढे आली आहेत. त्यांच्या अजून काही साथीदारांची नावेही तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. त्यांच्या देखील लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी अंदुरे आणि त्याचा साथीदार 20 ऑगस्ट 2013 रोजी औरंगाबादहून पहाटे सहा वाजता पुण्यात पोचले. शनिवार पेठेजवळ एका हॉटेलच्या बाहेर हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल लावलेली होती. तिची बनावट किल्ली हल्लेखोरांकडे होती. ती ताब्यात घेऊन काही वेळ ते शहरात फिरले. त्यानंतर दाभोलकरांची वाट पाहत ते पुलाजवळ थांबले. दोन्ही हल्लेखोरांच्या अंगावर ट्रॅक सूट होते. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सीसीटीव्ही नसल्यामुळे त्यांनी त्या जागेची निवड हत्येसाठी केली होती. दाभोलकरांना गोळ्या घातल्या तेव्हा मोटारसायकलवर अंदुरे मागे होता. मोटारसायकल चालविणार्‍या हल्लेखोराने दाभोलकरांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी दाभोलकरांच्या कानाजवळून पार झाली, तर दुसरी गोळी पुलाच्या रेलिंगवर आदळली. त्यामुळे अंदुरे मोटारसायकलवरून उतरून पुढे आला आणि दाभोलकरांच्या छातीच्या दिशेने दोन-तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते दोघेही मोटारसायकलवरून पळून गेले. डॉ. दाभोलकर यांना गोळ्या घालण्यापूर्वी तब्बल दोन वर्षे हल्लेखोरांना पिस्तूल वापरण्याचे प्रशिक्षण दिले गेले असल्याचेही तपासात समजले आहे. गोळ्या डोक्याच्याच दिशेने मारण्यावर प्रशिक्षणात भर दिला होता. दाभोलकरांचे लक्ष्य निश्‍चित केल्यावर अंदुरे आणि त्याच्या साथीदाराने पुण्यात तीन-चार वेळा ये-जा केली होती. सारंग अकोलकरचे घर शनिवार पेठेतच आहे. त्यानेही काही टिप्स दिल्या असाव्यात, असा यंत्रणांचा संशय आहे. हल्लेखोरांसाठी दोन पिस्तूल देणे, त्यांच्यासाठी ट्रॅक सूट विकत घेणे, शहर व घटनास्थळाची त्यांना पुरेपूर माहिती देणे, मोटारसायकल उपलब्ध करणे, तिच्या बनावट किल्ल्या तयार करून त्या त्यांच्यापर्यंत पोचविणे, शहरातून बाहेर पलायन करण्यासाठी माहिती देणे यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे आणि अमोल काळे सक्रिय होते. तसेच हल्ला झाला त्या दिवशी दोघे जण पुण्यात होतेे. एकूणच त्यांचे नियोजन पाहता हा एक मोठ्या कटाचा भाग होता. सर्वात महत्वाचे म्हणजे, आज सनातन संस्था हात झटकून हे आमचे साधक नाहीत, परंतु हिंदू धर्मासाठी कार्यरत असल्याने आम्ही त्यांच्यामागे उभे राहाणार आहोत अशी दुटप्पी भूमिका घेत आहेत. धर्मरक्षणासाठी या हत्या केल्या असे कबुलीजबाब त्यांनी दिले आहेत. आता प्रश्‍न उपस्थित होतो की, या विचारवंतांना मारुन कोणते धर्म रक्षण केले? अशा प्रकारे धर्माचे रक्षण करता येते का? असे प्रश्‍न उपस्थित होतात. यावरुन या तरुणांचे ब्रेन वॉशिंग कशा प्रकारे केले जाते याचा अंदाज येतो. खरा हिंदू धर्म यांना शिकवलाच जात नाही असेच यावरुन दिसते. कारण कोणत्याच धर्मात अशाप्रकारे मानव हत्येचे समर्थन करण्यात आलेले नाही. हे सर्व करीत असताना त्यामागे सनातन संस्था किंवा अन्य हिंदुत्ववादी संघटना आहेत हे काही छुपे राहिलेले नाही. सनातन संस्था आता हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळातच हिंदुत्ववादी संघटनांच्या साधकांच्या घरी अशी प्रकारे हत्यारेच कशासाठी सापडतात? याचे उत्तर त्यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "धर्मरक्षणासाठी नावाखाली..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel