-->
बंदुकीने नक्षलवाद संपणार नाही!

बंदुकीने नक्षलवाद संपणार नाही!

गुरुवार दि. 26 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
बंदुकीने नक्षलवाद संपणार नाही!
वर्षानुवर्षे नक्षलवादाच्या विळख्यात सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि सुरक्षा दलाने केलेल्या जोरदार कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठाच हादरा बसला आहे. गेल्या तीन दिवसांत जवळपास तीन डझन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. एकूणच अलिकडच्या काळातील नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या भागात नक्षलवाद्याच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत. आजवर हेच नक्षलवादी सुरक्षा जवानांच्या रक्ताचे पाट वाहत होते. हे सर्व पाहता नक्षलवाद संपविण्यासाठी सरकारने एकदम आक्रमक अशी मोहीम उघडलेली दिसते. मात्र अशा प्रकारे नक्षलींना गोळ्या घालून नक्षलवाद संपणार नाही. सरकारचा याबाबतीचा भ्रम दूर होण्यास फारसा वेळ लागणार नाही. नक्षलवादाविरोधातली आजवरची ही सगळ्यात मोठी कारवाई समजली जात आहे. अशा धडाकेबाज पावलांमुळे सुरक्षा यंत्रणांचे मनोबल उंचावते. कारण अनेकदा जवान मरण पावल्यावर याच जवानांत नैराश्य येते व त्याचा नक्षलवाद विरोधी कारवाईवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. हे सर्व करताना नक्षलवादात सामील झालेले हे युवक का नक्षलवादी झाले, याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागात स्वातंत्र्यानंतर विकासगंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे येथे नक्षली आपले साम्राज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरले आहेत. अनेक भागात नक्षलींचेच सरकार असल्यासारखी स्थिती आहे. जर नक्षलवाद सरकारला संपवायचा असेल तर त्यांनी पहिल्यांदा येथील आदीवासींचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. तसे केल्याने तेथील आदिवासी नक्षलींच्या विळख्यातून दूर जाऊ शकेल. केवळ बंदुकींने नक्षलवाद संपणार नाही, त्यासाठी त्यांचा वैचारिक पराभव करावा लागेल. पोलिसांच्या सी 60 दलाने नुकत्याच केलेल्या कारवाईचा आढावा घेतेवेळी गेल्या काही वर्षांत गडचिरोली परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीची पार्श्‍वभूमी जाणून घ्यायला हवी. ती पाहिल्यास 2014 पासून पोलिस दलाने नक्षलींना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या पोलिसी कारवाईच्या काळात तब्बल पाऊणशेहून अधिक नक्षलींचा खात्मा झाला. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या नक्षल कमांडर्सचा समावेश आहे. आताच्या कारवाईतसुद्धा याहून काही वेगळे झालेले नाही आणि या भागातील नक्षलींचे प्रभावक्षेत्र घटत असल्याचेच ते द्योतक म्हणावे लागेल. तसे असेल तर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण, कोणतीही व्यवस्था रक्ताळलेल्या स्वरूपात फार काळ टिकून राहू शकत नाही. या भागातील आदिवासींवर अन्याय होत असेल, दुर्लक्ष होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचे अन्य मार्ग अधिक प्रभावी आणि परिणामकारक आहेत. पंरतु हे आदिवासी नक्षलींच्याच मागे का आहेत, याचे सरकार उत्तर शोधत नाही तोपर्यंत नक्षलवाद काही संपणार नाही. सुरुवातीला मार्क्सवादाच्या प्रभावाने प्रेरीत झालेली ही चळवळ आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, हे देखील वास्तव आहे. कारण या नक्षलींनी आता मार्क्सवाद सध्या नावापुरताच ठेवून खंडणीची कामे सुरु केली आहेत. एक बाब स्पष्ट आहे की, त्यांच्यामुळे तेथील आदिवासी सुरक्षीत आहेत, केवळ त्यामुळेच लोक नक्षलींच्या मागे आहेत. नक्षलींना देशाची घटना मान्य नाही, त्यांना सशस्त्र क्रांती हवी आहे, कामगार, आदिवासी, कष्टकर्‍यांची सशस्त्र क्रांती करुन येथे समाजसत्तावाद स्थापन करावयाचा आहे, परंतु आता ते शक्य नाही. परंतु आपल्या देशात झालेले बदल स्वीकारण्यास नक्षली नेते तयार नाहीत. व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सी.पी.आय, सी.पी.एम. अथवा अन्य डाव्यांप्रमाणे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याशिवाय गत्यंतर नाही. अन्य राजकीय पक्ष, त्यांचे नेते भ्रष्टाचारी आहेत तर सत्तेच्या माध्यमातून व्यवस्था स्वत:च्या हाती घेण्याचा पर्याय नक्षलींकडे आहे. परंतु अजूनही ते निवडणुकांच्या रिंगणात उतरुन शांततेच्या मार्गाने क्रांती करण्याचे त्यांच्या खीजगणतीतच नाही. आपल्या प्रभाव क्षेत्रातील निवडणुका लढवून नक्षलींनी किमान ग्रामपंचायती जरी ताब्यात घेतल्या तरी बरेच काही साध्य होऊ शकते. त्यांनी तेथून सुरुवात करुन त्यामार्गाने जनतेचे भले करता येऊ शकते, हे लोकांना ते दाखवून देऊ शकतात. त्याउलट केवळ हिंसक क्रांतीचा मार्ग अवलंबला जात असेल तर अंतिमत: तो सगळ्यांसाठीच अहितकारक असेल. नक्षली चळवळींवर सध्या हिंसेचा शिक्का लागला आहे, त्यातून त्यांना कोणाचेच हित सांभाळता येणार नाही. हिंसाचार करुन प्रस्न सोडविता येत नाहीत, उलट त्या प्रश्‍नांची व्यापी अधिक, तीव्रता वाढते. त्यातून समस्या सुटत नाही, हे आपण आता अनेक वर्षे पाहत आहोत. सरकारने हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, बंदुकीने नक्षलवाद्यांना मारुन हा प्रश्‍न सुटणारा नाही. यातून कालांतराने हिंसेची पातळी वाढत जाते आणि मग त्याला उत्तरही त्याच प्रकारच्या कारवाईने देणे भाग पडते. या धडक कारवाईमुळे नक्षलींची तूर्त पीछेहाट होणार असली तरी आजवरचा इतिहास पाहता त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होणार हेसुद्धा उघड आहे. यातून प्रश्‍न सुटणार नाही, तर वाढणार आहेत.
------------------------------------------------------------

0 Response to "बंदुकीने नक्षलवाद संपणार नाही!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel