-->
जन्मठेपही कमीच!

जन्मठेपही कमीच!

शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
जन्मठेपही कमीच!
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यातील सहआरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोन जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पॉक्सो अ‍ॅक्टमध्ये झालेल्या बदलानंतर आलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आसारामसाठी विशेष कोर्टरुम तयार करण्यात आले होते. आसाराम साडेचार वर्षांपासून जोधपूर तुरुंगात कैद आहे. साडेचार वर्षांपासून तुरुंगात असल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर तुरुंगात जाण्याचे कोणतेही भय सुरुवातीला दिसले नाही. जेव्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हा मात्र आसारामचे मनोधैर्य खचले व हा बोगस बाबा ढसाढसा रडू लागला व न्यायमूर्तींना त्यांनी विनंती केली की, मी आता म्हातारा झालोय, माझ्या शिक्षेचा फेरविचार करा. आसारामसह शिल्पी उर्फ संचिता गुप्ता, शरतचंद्र दोषी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिल्पी ही आसारामच्या आश्रमताली वॉर्डन होती. तर शरद हा त्याचा सेवादार आहे. आसारामने गेल्या साडेचार वर्षांत जवळपास डझनभर जामीन याचिका दाखल केल्या मात्र त्याला जामीन मिळाला नाही. या खटल्यातील तीन प्रमुख साक्षीदारांची हत्य झाली आहे व नऊ साक्षीदारांवर हल्ले झाले होते. त्यावरुन आसाराम कोठडीत असला तरीही त्याचील बाहेर किती दहशत होती हे दिसते. पॉक्सो कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेले कोर्ट हे जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्तरावरील असते. या कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर थेट उच्च न्यायलयात आसारामला अपील करता येणार आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी आहे. आसाराम समर्थकांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना जबाब बदलण्यासाठी पैशांचे अमिष देण्यापासून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. परंतु या मुलीच्या वडिलांनी फार मोठ्या कष्टाने ही केल अखेर पर्यंत लढविली. उत्तर प्रदेशातून जोधपूरला येऊन केस लढण्यासाठी पीडितेच्या वडिलांना त्यांचे ट्रक देखील या दरम्यानच्या काळात विकावे लागले. तीन साक्षीदारांच्या ज्या हत्या झालेल्या त्यापैकी काही मुलीच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय होते. आसारामकडून मुलीवर अनेक लज्जास्पद आरोप करण्यात आले. एवढेच नाही तर ती मानसिकरुग्ण असल्याचाही आरोप करण्यात आला आणि यामुळे ती पुरुषांना एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त करते असेही घाणेरडे आरोप करण्यात आले. या सर्व आरोपानंतरही सलग 27 दिवस चाललेल्या सुनावणीत पीडिता आपल्या जबाबावर कायम राहिली. सरकारने नुकत्याच जारी केलेल्या पॉक्सो कायद्यानुसार 2012 मध्ये अल्पवयीनचे वय 16 वरुन 18 करण्यात आले. पीडिता 17 वर्षांची होती. द क्रिमिनल लॉ अमेंडमेंटमध्ये 2013 मध्ये दुष्कर्माची व्याख्या बदलण्यात आली. त्यामुळे कलम 376 लावण्यात आले. पीडितेचे वडील म्हणाले, मुलीला न्याय मिळवून देऊ शकतो याचे समाधान आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनी आसारामची तळी उचलून धरुन वरचे न्यायालय न्या देईल अशी आशा व्य्क्त केली. हिंदुत्ववादी संघटनांची ही भूमिका अतिशय लज्जास्पद अशीच आहे. आसाराम हा स्वंयघोषित संत असल्याने गुजरात, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये त्याचा मोठा भक्त संप्रदाय आहे. आसारामचा जन्म 17 एप्रिल 1941 मध्ये बिरानी नावाच्या गावात झाला होता. हे गाव आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर आसारामचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर ते, या शहरातून त्या शहरात फिरत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आसारामने चहाच्या हॉटेलवर काम केले. याच दरम्यान त्याने शिक्षण सोडले. वयाच्या 15व्या वर्षी आसाराम घरातून पळून जाऊन आश्रमात राहु लागला. त्यानंतर त्याची समजूत काढुन कुटुंबियांनी घरी आणले आणि लग्न करुन दिले. आसारामच्या पत्नीचे नाव लक्ष्मी आहे. त्याला दोन मुले आहेत, मुलगा नारायण साई आणि मुलगी भारती. निकाल जाहीर करण्यासाठी म्हणून आसारमचे आश्रम असलेल्या राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जन्मठेप म्हणजेच जिवंत असेपर्यंत जेलमध्येच राहावे लागेल. त्यामुळे आसाराम बापूचे जेलमधून सुटण्याचे स्वप्न भंगले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जन्मठेप जाहीर झाल्यावर आसारामचे भक्तगण ढसाढसा रडू लागले. त्यांचे वाहणारे आश्रु पाहून कोणालाही आश्‍चर्य वाटेल. अशा प्रकारे आपला बाबा बोगस आहे, त्याच्यावरील लैगिंक शोषणाचा गुन्हा सिध्द झाला आहे, तरी हे लोक त्यांच्या मागे कसे राहू शकतात असा प्रश्‍न उपस्थित होतो. यातून आपल्याकडे जी बुबावाजी फोठावलेली आहे की बोगस आहे हेच दिसते. आसारामरासखे आज अनेक बाबा-बुवा आपल्या श्रद्दाळू भक्तांचा गैरफायदा घेत असतात. एक तर मुळातच हे बाबा बोगस आहेत, ही बाबागिरी त्यांचे जगण्याचे साधन आहे. जनतेला ते फसवत असतात हे आपल्याला समजत असतानाही जनता मूर्खासारखी त्यांच्या नादी लागलेली असते. याचे महत्वाचे कारम म्हणजे, सध्याच्या अस्थिर जीवनात मनुष्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. तो आधार हे बाबा देतात व त्याच्या बदल्यात ते या सामान्य जनतेची लुबाडणूक करीत असतात. खरे तर वरच्या न्यायालयाने आसारामला यापेक्षा कडक शिक्षा द्यावी. त्यासाठी सरकारने जनतेच्या वतीने चांगला सरकारी वकिल पुरविणे गरजेचे आहे. या बाबाला फासावर लटवले गेलेच पाहिजे, त्यांच्यासाठी जन्मठेप ही शिक्षा सुध्दा कमीच झाली. परंतु असे करण्याची हिंमत सध्याचे सरकार दाखविणार नाही.
--------------------------------------------------- 

0 Response to "जन्मठेपही कमीच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel