-->
मोदींना जगात विरोध!

मोदींना जगात विरोध!

शनिवार दि. 28 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोदींना जगात विरोध!
नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या इंग्लंडसह काही युरोप देशांच्या दौर्‍यातील भारतीय चॅनेल्सवरील बातम्या पाहिल्या तर नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय नेते आहेत असेच सर्वांना वाटेल. परंतु सर्वांनीच फक्त मोदींच्या बाजुने बातम्या दिल्या. ठिकठिकाणीं मोदींचे झालेले काळ्या झेंड्यांनी स्वागत, त्यांच्या विरोधातील निदर्शने, इंग्लंडमधील त्यांची फिक्स केलेली मुलाखत हे सर्व पाहता आपल्याकडील मिडिया सत्ताधार्‍यांना कशा प्रकारे विकला गेला आहे, हेच विदारक चित्र बघावयास मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्लंडसह सार्‍या युरोपीय देशात परवा जे काळ्या झेंड्यांनी आणि निषेध मोर्चांनी स्वागत झाले. आपल्या देशाला ही बाब खरेतर निंदनीय वाटली पाहिजे. आजवर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांसमोर अशा प्रकारची संतप्त निर्देशने झाली नव्हती. अर्थात याचा गांभीर्याने विचार त्यांच्या पक्षास, संघाला आणि समाजालाही करावा लागणार आहे. मोदी परत जा, मोदी हे दहशतवादी आहेत, मोदी भारताचे सर्वात मोठे खुनी आहेत, मोदीच्या मागासल्यावृत्तींचा निषेध, भारतात धार्मिक स्वातंत्र्य हा अपराध आहे काय? दलित व अल्पसंख्याकांचे मारेकरी, असे शेकडो फलक हाती घेतलेले लोक रस्त्यावर उभे राहून मोदींचा निषेध करीत होतेे. गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल परिषदेच्या शिखर बैठकीला इंग्लंडला नरेंद्र मोदी गेले असताना त्यांनी ज्या ज्या युरोपीय देशांना भेटी दिल्या त्या त्या प्रत्येकच जागी त्यांना काळे झेंडे व निषेधाच्या फलकांचा सामना करावा लागला. त्यांना होत असलेला हा निषेध त्यांच्यासोबत गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाएवढाच राष्ट्रकुल परिषदेला आलेल्या जगभरच्या नेत्यांनीही पाहिला.येथे मात्र चॅनेल्सनी मीठाची गुळणी घेतली असली तरी जगाने हा निषेध पाहिला. जगात त्यासंबंधी भारताची बदनामी झाली. मोदींच्या ताब्यात असलेल्या भारतातील माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली नसली तरी जगभरातील माध्यमांएवढीच सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या लोकांनीच हा निषेध जगभर पोहोचविला. तीन वर्षांपूर्वी याच मोदींनी न्यूयॉर्क, लंडन आणि पॅरिसमध्ये हजारोंच्या सभेसमोर भाषणे केली, त्याचे अनेक ठिकाणी स्वागत झाले. भारतातील या नवीन उदयाला आलेल्या नेत्याचे जगाने स्वागत केले होते. आता केवळ चार वर्षाच्या अल्पकाळातच अशा अपमानाला सामोरे जावे लागेल असे कुणाला वाटले नसेल. भारतात अल्पसंख्याकांवर होणारे सामूहिक हल्ले, दलित तरुणांना केली जाणारी मारहाण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि असुरक्षीत स्त्रिया या बाबी ठळकपणे जगापुढे आल्या आहेत. भारतात घडत असलेल्या या घटनांमुळे भारताची प्रतिमा मलिन तर झाली आहेच शिवाय भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणालाही तडा गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मौनीबाबा बनले असल्याने ते या निषेधाविषयी तेथे व येथेही फारसे बोलत नाहीत. किंवा बोलले तरी मोघम बोलतात. गाईच्या मासांवरुन ज्या हत्या झाल्या त्यावर प्रदीर्घ काळानंतर मोदींनी निषेध करुन अपराधींना शिक्षा करण्याचे जाहीर केले होते. मात्र एरव्ही कोणत्याही बाबतीत झपाट्याने व्टीट करणारे मोदी अशा बाबतीत मौन बाळगतात हे जगाला समजले आहे. त्यामुळे आता यावेळी त्यांच्या वरील अनिवासी भारतीयांचा विश्‍वास आता राहिलेला नाही. इंग्लंडमधील मोदींची झालेली ऐतिहासिक मुलाखत देखील फिक्स होती. यात विचारले गेलेले प्रश्‍न देखील फिक्स होते. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजा चेल्लयांवर विचारलेला प्रश्‍न व त्यावर मोदींनी त्यांचा सांगितलेला इतिहास हे प्रश्‍न अगोदर ठरलेले होते, हे आता जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. आपल्याकडील मोदी भक्ताींच अद्याप डोळ्यावर झापडे आहेत. विकासाच्या योजनांपेक्षा मंदिराच्या बांधकामाची चर्चा मोठी झाली आणि सरकारपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जास्तीची प्रसिद्धी मिळवू लागला, हा लोकशाही संविधानाचा अधिक्षेप कुणाच्याही लक्षात यावा. मोदींच्या न्यूयॉर्क, पॅरिस आणि शांघायमधील सभा दाखविणारी माध्यमे त्यांचा हा निषेध दाखविताना दिसली नसतील तर त्याचे कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देशात होत असलेली गळचेपी आणि माध्यमांच्या मालकांची मोदीशरण वृत्ती हे आहे. मोदींच्या पक्षाने फितविलेली न्यायालये, गोवा, मेघालय आणि नागालँडमध्ये विकत घेतलेले आमदारही जगाने पाहिलेे. मोदींच्या सत्तारूढ आघाडीला गेलेले तडेही जगाला दिसतात. धार्मिक ध्रुवीकरणाचे त्यांचे राजकारण आणि त्यातून गुजरात व उत्तर प्रदेशात झालेली अल्पसंख्याकांची हत्याकांडेही त्याच्या डोळ्यावर येतात. सारा मध्य आशिया, म्यानमार व श्रीलंका या देशांना धर्मांधांच्या हिंसाचाराने ग्रासले आहे. भारत त्यापासून 2014 पर्यंत दूर होता. आता भारतातही त्या हिंसाचाराने उसळी घेतलेली दिसत आहे. आजवर भारत सर्वधर्मसमभाव असलेला एक देश म्हणून जगापुढे मोठ्या अभिमानाने मिरवीत होता. आता हाच भारत हिंदुत्वाची कार्यशाळा बनून नजिकच्या काळात बहुदा सध्याचे संविधान बदलणार की काय असे वाटू लागले आहे. देशात आजवर झालेल्या कोणत्याही पंतप्रधानाने त्याची जगातली प्रतिमा एवढ्या अल्पावधीत मातीमोल केली नाही. पंडीत जवाहरलाल नेहरु ते डॉ. मनमोहनसिंग यांनी विदेशात जाऊन देशाची प्रतिमा उंचावण्याचा नेहमीच प्रयत्न केला व त्यात ते वेळोवेळी यशस्वी झाले.परंतु मोदींनी देशातील सर्व चित्रच पालटवले.देशाची प्रतिमा त्यातून मलिन झाली आहे. यामुळेच जगात आपल्या देशाची नाचक्की झाली आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "मोदींना जगात विरोध!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel