-->
मुंबईतला पाऊस...अस्मानी आणि सुल्तानीही!

मुंबईतला पाऊस...अस्मानी आणि सुल्तानीही!

रविवार दि. 03 सप्टेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
मुंबईतला पाऊस...अस्मानी आणि सुल्तानीही!
--------------------------------------
एन्ट्रो- तब्बल 12 वर्षांपूर्वी 26 जुलै 2005 साली देखील मुंबईची अशीच अवस्था झाली होती. हजारो मुंबईकर रात्रभर रस्त्यात अडकले होते. त्यावेळी मुंबईची पुन्हा अशी अवस्था होऊ नये यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. सरकारने त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे व मुंबईत पूर येऊ नये यासाठी बंदोबस्त कसा आसावा याची आखणी केली होती. अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, पुन्हा ये रे माझ्या मागल्या. 26 जुलैचा हा पाऊस गेला आणि त्यानंतर आखलेल्या योजनाही पावसात वाहून गेल्या असेच म्हणावे लागेल. कारण त्यावेळी मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सुचविलेल्या योजनांपैकी एकाही बाबीची अंमलबजावणी झाली नाही, त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल.
----------------------------------------------------------------
गेल्या पाच दिवसात राज्यभरात धुवाँधार पावसाने धुमाकूळ घातला होता. ज्या ठिकाणी पावसाने गेली पंधरा दिवस दडी मारली होती तिकडे पाऊस पडल्याने अनेकांना हायसे वाटले. शेतकरी राजा सुखावला. पावसाने आपली सरासरी कायम ठेवली. अनेक भागात नद्या,नाल्यांना पूर आले, सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला. मुंबई आणि कोकणात तर आभाळ फाटल्यासारखी स्थिती होती. मंगळवारी झालेल्या विक्रमी पावसाने तर मुंबईची पार वाट लावली. अर्थात पावसात मुंबईची वाट लागणे काही नवीन नाही. दरवर्षी मुंबईचा एक दिवस तरी पाण्याखाली जातो. मुंबईची जीवनवाहीनी म्हणून ओळखल्या गेलेल्या लोकलची पार दैना उडाली होती. यंदा मात्र शतकात कधी नव्हे एवढ्या पावसाची नोंद झाली. यंदा मुंबईत अडीचशे मी.मी.च्या वर पाऊस मुंबापुरीत कोसळला होता. मंगळवारी तर मुंबईचे जे हाल झाले ते पाहून 26 जुलै 2005 ची आठवण मुंबईकरांना झाली. जवळपास सर्वच रस्त्यांवर पाणी तुंबले. रेल्वे रुळही पाण्याखाली गेले यामुळे रेल्वेसेवा, बस सेवेसह टॅक्सी, रिक्षा बंद झाल्या. यामुळे चाकरमान्यांचे घरी परतण्यासाठी चांगलेच हाल झाले. तब्बल 12 वर्षांपूर्वी 26 जुलै 2005 साली देखील मुंबईची अशीच अवस्था झाली होती. हजारो मुंबईकर रात्रभर रस्त्यात अडकले होते. त्यावेळी मुंबईची पुन्हा अशी अवस्था होऊ नये यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. सरकारने त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे व मुंबईत पूर येऊ नये यासाठी बंदोबस्त कसा आसावा याची आखणी केली होती. अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, पुन्हा ये रे माझ्या मागल्या. 26 जुलैचा हा पाऊस गेला आणि त्यानंतर आखलेल्या योजनाही पावसात वाहून गेल्या असेच म्हणावे लागेल. कारण त्यावेळी मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सुचविलेल्या योजनांपैकी एकाही बाबीची अंमलबजावणी झाली नाही. या समितीने राज्य सरकारला मुंबईत मोठा बांधारा घालण्याची शिफारस केली होती. त्याव्दारे समुद्राचे पाणी थांबविता येऊ शकले असते. परंतु पूर ओसरला आणि या योजनाही हवेत विरल्या. त्यावेळी सत्तेत असलेल्या कॉग्रेस-राष्ट्रवादीला व महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपालाही याची पूर्णपणे विसर पडला. जर या शिपारशींची अंमलबजावणी त्याकाळी झाली असती तर यावेळच्या विक्रमी पावसावर काही तरी मार्ग काढता आला असता. जे मुंबईकरांचे हाल झाले तेवढे झाले नसते. परंतु जनतेच्या प्रश्‍नांचे या सत्ताधार्‍यांना काही देणेघेणे नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. पावसाळ्या आधी दरवर्षी नेते मंडळी अधिकार्‍यांचा ताफा घेऊन मुंबईत ठिकठिकाणी पाहणी करतात. नालेसफाई, रस्त्यांवर पाणी तुंबू नयेत म्हणून बरेच काही माही केल्याचे दाखवले जाते. मात्र, जे काही केले जाते ते केवळ फोटो काढण्या पुरतेच आणि वृत्तपत्रात छापून येण्या पुरतेच असते की काय? असे चित्र आहे. भाषणबाज नेतेही मुंबईकरांचे हाल होत असताना गायब होते. सर्वसामान्य मुंबईकर मात्र एकमेकांची मदत करीत होता. महानगर पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्याचे जवान मात्र, रात्रभर रस्त्यावर होते. जशी करता येईल तशी आणि जेथे करता येईल तेथे मदत मुंबईकर एकमेकांना करीत होते. थेट बंद पडलेल्या लोकलच्या डब्यापर्यंत जावून लोकांना खायला, प्यायला दिले गेले. मात्र, आम्ही करुन दाखवले वाले फक्त ट्विटरवरच दिसले. मुंबईकरांनी यावेळी संयम राखला. मनातल्या मनात चाचपडत त्यांनी संताप व्यक्त केला असेल, मात्र कोठेही त्याचा स्फोट झाला नाही. शांत राहत त्यांनी आलेल्या प्रसंगाला नेहमीप्रमाणे तोंड दिले. यामुळे त्यांचे कौतुक झालेे. मुंबईचे महापौर आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा न दाखवता, मुंबईकरांचे जे हाल झाले त्याचे खापर मुंबईच्या भौगोलिक स्थितीवर फोडून मोकळे झाले. कितीही पाऊस पडला तरी मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा महानगर पालिकेने पावसाआधी केला होता. पालिकेचा दावाही या पावसात पुन्हा वाहून गेला. मात्र, त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे महापौरांच्या वक्तव्यावरुन दिसते. तर मनपा आयुक्त अजॉय मेहता यांनी पावसाच्या पाण्यात मिसळलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागल्याचे सांगितले. त्यांनी हिंदमाता जवळ पाण्याचा निचरा व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, काही तरी चूक झाली असे सांगत काहीशी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला. हिंदमाताजवळ काही ना काही चुकलेले आहे, पंप चालू होते, तरी पाणी गेले नाही पाईप चोकअप होते की आणखी कोणती अडचण होती, याची तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले. मुंबईकरांनी हाल भोगल्यानंतर नेहमीप्रमाणे राजकारणाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे विरोधकांनी याचे खापर सत्ताधार्‍यांवर फोडले. सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विरोधकांचे आरोप मान्य नाहीत. आपल्याला राजकारण करायचे नाही ज्याना करायचे असेल त्यांना करु द्या असे सांगितले. मुंबईतील नालेसफाईचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही उध्दव ठाकरे यांना ते मान्य नसल्याचे दिसते. नालेसफाई झाली नसल्याचा आरोप खोटा असल्याचे ते म्हणतात. मुंबई मनपाने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये चांगले काम केले, म्हणूनच कालच्या अतिवृष्टीनंतरही आज मुंबई पूर्वपदावर आली असल्याचा दावाच उद्धव ठाकरे यांनी केला. अर्थात विरोधकांनी आरोप करणे आणि सत्ताधार्‍यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी आपलेच दावे खरे असल्याचे रेटणे हे या पुढेही सुरुच राहणार आहे. आणि मुंबईकरही नेहमीप्रमाणे आपला संयम राखत आल्या त्या परिस्थितीला तोंड देत राहतील. त्यामुळेच मुंबईवर केवळ अस्मानी तर होतीच शिवाय सुलतानीही होतीच, हे विसरुन चालणार नाही.
---------------------------------------------------------------------------------------

0 Response to "मुंबईतला पाऊस...अस्मानी आणि सुल्तानीही!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel