-->
अ‍ॅपलचा नवा अवतार

अ‍ॅपलचा नवा अवतार

सोमवार दि. 18 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
अ‍ॅपलचा नवा अवतार
जगातील मोबईल फोन निर्मीतीतील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी व वैयक्तीक संगणक उद्योगातील जगातील पहिल्या क्रमांकांची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले नवीन मोबाईलचे उत्पादन बाजारात आणले आहे. नेहमीप्रमाणे एका जाहीर सभेत अ‍ॅपलच्या नवीन फोनचे अनावरण करण्यात आले. जगात अ‍ॅपल कोणते नवीन उत्पादन आणणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात. प्रामुख्याने मोबाईलचे चाहते तर त्यावर फारच बारकाईने लक्ष ठेवून असतात. यंदा अ‍ॅपलने आणलेल्या आपल्या नवीन फोनमुळे जगात खळबळ माजली आहे. कारण यात असलेल्य फिचरमुळे हा मोबाईल चर्चेत आला आहे. या फोनचा वापर करणार्‍या व्यक्तीने आपला चेहरा फोनपुढे ठेवल्यास हा फोन अनलॉक होतो, असे नवे तंत्रज्ञान मोबाइल फोनच्या इतिहासात पहिल्यांदाच आणले आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकाची सुरक्षितता आणि फोन व ग्राहक यांच्यात विश्‍वास निर्माण झाला आहे. अ‍ॅपलने चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान फोनमध्ये आणून एक नवा वाद चिघळवला आहे. नवे तंत्रज्ञान व्यक्तीच्या चेहर्‍यांवरील विविध भाव, छटा, सुरकुत्या यांची व्यापक माहिती गोळा करून ती संग्रहित करेल आणि त्याचे विश्‍लेषण करेल व या कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होईल. परिणामी व्यक्तीच्या जगण्यातील नैसर्गिकतेवर परिणाम होईल. तसेच चेहरा ओळखणार्‍या तंत्रज्ञानामुळे रोजगार देण्यात कंपन्या भेदभाव करतील. काही कंपन्या जात, वर्ग, धर्म, लैंगिकता, बुद्धिमत्ता यांच्या आधारावर एखाद्याचा नोकरीचा अर्ज फेटाळून लावू शकतील, अशी भीती व्यक्त केली आहे. या भीती नाकारता येणार नाही. अ‍ॅपलने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले असले तरी सीसीटीव्ही, बुबुळे व बोटाचे ठसे अशा माध्यमांचा सुरक्षा यंत्रणा वापर करत आहेत. सीटीव्ही आपल्या कार्यालयात, बिल्डिंगमध्ये जेव्हा तुमचा चेहरा कॅमेराबद्ध केला जातो व अशा लाखो चेहर्‍यांचा संग्रह खासगी कंपन्या किंवा सरकारकडे जमा होतो तेव्हा अनेक कायदेशीर व व्यक्तिस्वातंत्र्याचे मुद्दे पुढे येत राहतात. अ‍ॅपलने शोधलेल्या या नवीन तंत्रज्ञानाने संशोधनात एक नवीन क्रांती आणली असली तरीही त्यातून अनेक प्रश्‍न उपस्थित होणार आहेत. अ‍ॅपलने नेहमीच संशोधन हा आपल्या उत्पादनाचा केंद्रबिंदू मानला आहे. सुरुवातीपासून या कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी संशोधनावर भर देऊन अ‍ॅपलला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलेे. 1976 साली त्यांनी आपल्या दोघा सहकार्‍यांसमवेत ही कंपनी स्थापन केली व आज ही जगातील अव्वल कंपनी म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला त्यांनी संगणक निर्मीतीचे काम सुरु करुन मोबाईलपर्यंत धडक मारली आहे. आज जगातील एक प्रतिष्ठीत ब्रँड म्हणून अ‍ॅपलकडे पाहिले जाते. यात त्यांच्या उत्पादनाचा मुळ गाभा हा संशोधन आहे. अमेरिकेत आज केवळ अ‍ॅपलच नाही तर अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्या जागतिक बाजारपेठेवर पकड ठेवून आहेत. आता त्यांच्या संशोधन करुन ग्राहकांना नवनवीन उत्पादन देण्याचा असलेल्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हे नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. मात्र हे उत्पादन वादग्रस्त ठरणार आहे, हे नक्की. कारण काही महिन्यांपूर्वी एका दहशतवाद्याकडील आयफोनमधील माहिती अमेरिकेच्या एफबीआय सुरक्षा यंत्रणेने अ‍ॅपलकडे मागवली होती. त्याला खासगीपणाच्या मुद्द्यावर अ‍ॅपल कंपनीने जोरदार विरोध केला होता. न्यायालयात हे प्रकरण गेले. अखेर अ‍ॅपलला माघार घ्यावी लागली. अ‍ॅपल आपल्याकडे ग्राहकांची माहिती राहील व त्याचा दुरुपयोग होणार नाही असे सांगत असताना हे प्रकरण घडले होते. अ‍ॅपलचे चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान याच प्रकारातील आहे. आपल्याकडे मोबाइलची मोठी बाजारपेठ जन्मास आली आहे. मात्र यातील केवळ दहा ते वीस टक्के लोकच अ‍ॅपलचा मोबाईल खरेदी करु शखत असतील. मात्र अ‍ॅपलसाठी भारत ही बाजरपेठ लोकसंख्येचा विचार करता मोठी आहे. अनेक कंपन्यांचे रोज नवा ब्रँड किंवा मोबाइलचे नवे व्हर्जन येत असते. अ‍ॅपल आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणेल व कोट्यवधी ग्राहकांची व्यक्तिगत माहिती या कंपन्यांकडे जमा होईल. ही माहिती विकली जाईल व बाजारयुद्ध तीव्र होत जाईल. ग्राहकांच्या छायाचित्राचा दुरुपयोग होण्याची भीतीही नाकारता येत नाही. आपल्याकडे सायबर कायदे देखील कडक नाहीत व ग्राहक चळवळीविषयी देखील फारशी जनजागृती नाही अशा वेळी अ‍ॅपलचे हे नवीन उत्पादन आपल्यासाठी अनेक धोके निर्माण करणारे ठरु शकते. खासगीपणा जपला जाणे हा व्यक्तीचा मूलभूत व व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. याबाबत आपल्याकडील न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. मोबाईल प्रामुख्याने स्मार्ट फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईवरील आपले अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मोबाईलवर पाहाण्याची सवय जडली आहे. ज्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळीही कामे होतच होती, आता मोबाईल आल्यावर कामे झपाट्याने होतात ही वस्तुस्थिती कोणी नाकारु शकणार नाही. परंतु आपण त्यावर किती अवलंबून राहाणार हा देखील मुद्दा आहे. अनेकदा आरोग्याचे गंभीर प्रश्‍न त्यातून उभे राहाणार आहेत. एकूणच मोबाईल कंपन्या नवीन फिचर्स आणून ग्राहकांना भूलविण्याचे काम करणार आहेत, कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे. मात्र आपण त्याच्या किती आहारी जायचे हे आपल्या हाती आहे.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "अ‍ॅपलचा नवा अवतार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel