-->
रेक्रॉर्डब्रेक पाऊस

रेक्रॉर्डब्रेक पाऊस

शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
रेक्रॉर्डब्रेक पाऊस
सतत धावणारी मुंबई नगरी गेल्या दोन दिवसांपासून रेक्रॉर्डब्रेक पावसामुळे स्थब्ध झाल्यासारखी होती. राज्याच्या बहुतांशी भागात गेल्या तीन दिवसांपासून विक्रमी पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पावसाने कहर केला आहे. अजूनही पुढील 48 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात गणपतींच्या दिवसात अशाच प्रकारचा विक्रमी पाऊस पडला होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्र ओला चिंब झाला होता. विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात वगळता आता राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट नसेल असेच दिसत आहे. मुंबईत गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने जसा कहर माजविला होता तसाच पाऊस यावेळी पडला. सहसा बंद न असणारा विमानतळही यावेळी बंद ठेवावा लागला, हे या पावसाचे एक वैशिष्ट्य.  पावसामुळे मुंबई विमानतळावरील स्पाइस जेटचे विमान घसरून चिखलात रुतले अन् हवाई वाहतूकही कोलमडली. बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम होता. घाबरून अनेक मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवाही जीवनाला पाऊसब्रेक लागला. मुंबईत विमानतळाचा मुख्य धावपट्टी बंद असल्याने 183 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर खराब हवामानामुळे धिम्या गतीने विमानांचे उड्डाण आणि लँडिंग सुरू होते. सलग कोसळणार्‍या पावसाची सांताक्रुझ वेधशाळेत 303.7 मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. भरतीमुळे मुंबई पुन्हा पाण्यात जाण्याची भीती आहे.
मुंबईत सलग दोन दिवस लागून राहिलेल्या पावसामुळे हिंदमाता, सायन रोड क्रमांक 24, वीरा देसाई रोड, एअर इंडिया कॉलनी, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, कोहिनूर सिटी मॉल, रमाबाई आंबेडकर नगर, चेंबूर येथील शेल कॉलनी, मानखुर्द, कुर्ला येथील शीतल आणि कमानी सिग्नल, अंधेरी येथील मरोळ, कुर्ला पश्‍चिमेकडील रेल्वे स्थानक परिसर, विद्याविहार पश्‍चिम येथील रेल्वे स्थानक परिसर, माटुंगा येथील गांधी मार्केटसह सखल भागात पाणी साचले होते. परिणामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गासह शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमी झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत सर्वत्रच अशी परिस्थिती असताना कालांतराने पावसाचा जोर ओसरला. पावसाचा जोर ओसरताना ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने रस्ते वाहतूक दुपारनंतर पूर्वपदावर आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रस्त्यावर उतरलेल्या वाहनांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने दुपारसह सायंकाळी रस्ते वाहतूक वेगाने सुरू होती. रेल्वेसेवेवरही याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. अनेक लांब पल्याच्या गाड्या रद्द झाल्या तर काही उशीरा धावत होत्या. उपनगरी वाहतूक अतिशय धीम्यागतीने सुरु होती. राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कृषी व्यापारास बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये 5,138 टन भाजीपाल्याची आवक झाली. यामधील 150 टन मालाची विक्रीच झाली नाही. 50 टनपेक्षा जास्त माल पावसात सडल्याने फेकावा लागला. गेल्या 48 तासांत रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होतेे. जिल्ह्यात 27 घरे-गोठे कोसळले आहेत, तर उरणमध्ये विजेची तार पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रभर पावसाने रायगड जिल्ह्यास झोडपून काढले आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक 362 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मच्छीमारीकरिता अरबी समुद्रात बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी दोन बोटींशी संपर्क झाला असून, या दोन्ही बोटी आणि 16 खलाशी सुखरूप आहेत. मात्र इतर दोन बोटींचा पत्ता लागला नाही. मानसशिवालय व हेरंभशिवलिंग या दोन बोटींचा संपर्क साधला जात नव्हता. मात्र वायरलेस यंत्रणेद्वारे संध्याकाळी संपर्क झाला आता या दोन्ही बोटी मुरूड-जंजिरा समुद्रातील बॉम्बे हाय प्लॅटफॉर्मजवळ सुरक्षित आहेत. यातील एकूण 16 खलाशीदेखील सुखरूप आहेत. अलिबाग तालुक्यातील पौर्णिमाप्रसाद आणि गंगासागर या दोन बोटींचा पत्ता लागलेला नाही. यावर अनुक्रमे 18 व 8 असे एकूण 26 खलाशी असल्याचे नाखवा आहेत. रत्नागिरीतील बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमार नौका सापडल्या आहेत. तसेच गुजरातमधून भरकटलेली एक नौका रत्नागिरीच्या किनारपट्टीवर आली आहे. संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, परंतु कोणत्याही नदीची जलपातळी धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सावित्री नदीची प्रत्यक्ष जलपातळी 4.80 मीटर होती. धोकादायक जलपातळी 23.95 मीटर असलेल्या कुंडलिका नदीची प्रत्यक्ष जलपातळी 22.90 मीटर होती तर धोकादायक जलपातळी 9 मीटर असणार्‍याा अंबा नदीची प्रत्यक्ष जलपातळी 6.60 मीटर होती. आता अजूनही पावसाचा इशारा दिलेला असला तरीही आतातरी नद्यांची जलपातळी आवाक्यात आहे. सध्या पडलेल्या पावसाने सर्वांनाच दिलासा दिला आहे. यामुळे पिकांचे फारसे नुकसान होणार नाही. अर्थात या पावसामुळे धरणांच्या जलपातळीत भर पडली आहे. त्यामुळे यंदा बहुतांशी महाराष्ट्र दुष्काळमुक्त असेल अशी अपेक्षा करावयास नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे पावसाचे जे पाणी पडते त्यातील प्रत्येक थेंब जमा करुन त्याचा वापर करण्यासाठी आपण अजूनही मागे पडतो. अनेक दरणे बांधली पण ती पुरेशी नाहीत. कोकणातील पाणी तर थेट समुद्राला वाहून जाते. त्यावर उपाय योजल्यास आपण पावसाचा प्रत्येक थेंबाचा वापर चांगल्या रितीने करु शकतो. आजवर यासंबंधी अनेक अहवाल झाले मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. आता वेळ प्रत्यक्षात काम करण्याची आहे.
---------------------------------------------------------

1 Response to "रेक्रॉर्डब्रेक पाऊस"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel