-->
शिवसेनेने सत्ता सोडावी

शिवसेनेने सत्ता सोडावी

संपादकीय पान शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
शिवसेनेने सत्ता सोडावी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे कधी नव्हे एवढी जहरी टीका सध्या भाजपावर व मुख्यमंत्र्यांवर करीत आहेत. याचा अर्थ भाजपा-सेनेची युती आता तुटल्यात जमाच आहे. अशा वेळी मात्र शिवसेना सत्तेची फळे चाखत आहे. सेनेने ही दुटप्पी भूमिका सोडून द्यावी व सत्तेला रामराम करावा. अर्धवटराव असा उल्लेख उध्दवरावांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणुकीच्या प्रचार सभेत केला. मग अशा या अर्धवटरावांच्या सोबत सत्तेत मांडीला मांडू लावून का बसता असा सवाल या राज्यातील जनतेचा आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्य्ंत तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही हे उघड आहे. खरे तर सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेने भाजपाचे उंबरठे झिजवून त्यावेळी लाचारी पत्करली होतीच. त्यामुळे शिवसेना सत्तेशिवाय जगू शकणार नाही याची कल्पना भाजपाला आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी शिवसेना सत्ता काही सोडणार नाही याची खात्री त्यांना वाटते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीही शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करीत होते. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा ते एकत्र आले. आताही या दोन्ही पक्षांचे नेते अशीच टीका करीत आहेत. उध्दव ठाकरे असोत किंवा देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर टीका करीतच राहाणार व शिवसेना ही सत्ता दुसरीकडे उपभोगतच राहाणार, याची कल्पना भाजपाला आहे. दुदैवाची बाब म्हणजे हे दोन्ही नेते परस्परांवर वैयक्तीक पातळीवर टीका करीत आहेत. राजकारणात वैचारिक मतभेद जरूर असू शकतात मात्र टीका ही वैयक्तीक असू नये. टीका ही धोरणात्मक पातळीवरील असावी. मात्र याचे भान या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना राहिलेले नाही. अगदी कालपर्ंयत भाजपाही महानगरपालिकेत शिवसेनेच्या बरोबर सत्तेत होता. मग तेथे झालेल्या भ्रष्टाचारात त्यांचा वाटा नाही असे कसे म्हणता येईल? आता भाजपा जी टिका करीत आहे ती फसवी टिका आहे. त्यांना मुंबईचे महापौरपद मिळवायची स्वप्ने पडू लागल्यानेच त्यांना शिवसेना नकोशी झाली आहे. या दोन्ही पक्षांनी शहराच्या विकासासाठी दीर्घकालीन विचार करता ब्लू प्रिट तयार करणे आवश्यक आहे. मुंबईसारख्या मोठ्या महानगराला जागतिक दर्ज्याचे कसे शहर बनविता येईल याची आखणी करुन त्यावर चर्चा या निवडणुकीत झाली पाहिजे. त्यापैक्षा परस्परांवर शिंतोडे उडविण्यात हे दोन्ही पक्ष समाधान मानीत आहेत. शहराच्या विकासावर बोलत आहेत का? ते आरोग्य सेवेबद्दल बोलत आहेत का? शहराचा चेहरा बदलण्याची भाषा करीत आहेत का? विकासाच्या मुद्दयावर एकही शब्द दोन्ही पक्षांकडून काढला जात नाही. या दोन्ही पक्षांची सत्ता मुंबईकरांनी गेल्या पंचवीस वर्षात पाहिली आहे, अनुभवली आहे. त्यातून आता भाजपा वेगळा झाला म्हणजे ते काही धुतल्या तांदळाचे ठरु शकत नाहीत. मुंबईची काय अवस्था आहे? इथले रस्ते नीट नाहीत. स्वच्छ पाणी पिण्यासाठी नाही. ज्या पवई तलावातून मुंबईकरांना पाणी पुरविले जाते, तिथे जाऊन पाहिले तरी कुणीही पाणी पिण्याचे धाडस करणार नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईचा केवळ उल्लेख करतो मात्र हे शहर देखणे व्हावे यासाठी कोणताच पक्ष प्रयत्न करताना दिसत नाही. शिवसेनेच्या खूपच गप्पा झाल्या. आता त्यांनी राज्यातील केंद्रातील सत्ता सोडण्याची हिंमत दाखवावी.

0 Response to "शिवसेनेने सत्ता सोडावी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel