-->
मोदींना घरचा आहेर

मोदींना घरचा आहेर

संपादकीय पान मंगळवार दि. 06 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मोदींना घरचा आहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूविरोधी  असून नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदींच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वरिष्ठांकडून करण्यात आल्याने पंतप्रदान नरेंद्र मोदी आता घरचाच आहेर मिळाल आहे. मोदींनी हिंदूच्या लग्नसराईला सुरुवात होण्याआधी नोटाबंदीचा निर्णय घेतला. याशिवाय भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत, याबद्दल हिंदू महासभेने अतिशय तीव्र भाषेत टीका केली आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागील उद्देश अद्याप समजलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे 200 ते 300 रुपये कमावणार्‍या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही, असे हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी जे म्हटले आहे ते वास्तवदर्शीच आहे. हिंदूच्या लग्नसराईचे मुहूर्त सुरू होण्याआधी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यामुळे अनेक लग्नघरांना फटका बसला आहे. लोकांना त्यांच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. काहींना लग्नकार्य पुढे ढकलावी लागली. हिंदुंचा कळवळा घेणार्‍या मोदींनी हिंदुंचीच या निर्णयामुळे मोटी पंचाईत केली आहे. त्यामुळे हिंदू महासभा रागावणे समजू शकतो. पूजा पांडे यांनी महाराष्ट्रातील सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचाही उल्लेख केला आहे. सुभाष देशमुख यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या सोलापूरमधील लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेत इस्लामिक बँकिंग सेवा सुरू केली. या सेवेच्या माध्यमातून व्याजरहित ठेवी स्वीकारल्या जातात. शिवाय हा पैसा शून्य टक्के व्याजाने अल्पसंख्यांकांना दिला जातो, असे म्हणत पूजा पांडे यांनी मोदींनी आता हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला आहे, अशी टीका केली.
पंतप्रधान मोदी खोट्या सर्जिकल स्ट्राइकसाठी लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपदेखील महासभेच्या सदस्यांनी केला आहे. सीमावर्ती भागातील दहशतवादी कारवाया वाढत आहेत. दररोज आपले जवान शहीद होत आहेत. जर खरोखरच सर्जिकल स्ट्राइक झाला असेल तर त्याचा परिणाम दिसत नाही आहे, अशीही त्यांनी पुस्ती जोडून मोदींना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. अशोक कुमार पांडे यांनी मोदीभक्तांवरही जोरदार टीका केली आहे. मोदींचे ब्रँडिंग करुन भक्त मंडळी त्यांची भीती घालून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विरोध केल्यास देशविरोधी असल्याचा शिक्का मारला जातो आहे. सामान्य माणसाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रचंड त्रास होतो आहे. हिंदू महासभा ही हिंदुंची सर्वात जुनी संघटना मानली जाते व मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयाची त्यांनी स्तुती केली होती. आता मात्र नोटाबंदीच्या विरोधात व मोदींच्या व्यक्ती पुजेच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत.

0 Response to "मोदींना घरचा आहेर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel