-->
जय-पराजयाचा धडा

जय-पराजयाचा धडा

संपादकीय पान बुधवार दि. 23 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जय-पराजयाचा धडा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसने प्रत्येकी दोन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी 19 नोव्हेंबरला मतदान झाले होते. सहा जागांसाठी एकूण 30 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमध्ये काँग्रसेच अमर राजूरकर, गोंदियात भाजपचे परिणय फुके, जळगावमध्ये शिवसेना-भाजप युतीचे चंदू पटेल, सातारा-सांगलीत काँग्रेसच्या मोहनराव कदम आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तत्त्वे, निष्ठा गुंडाळून आपापल्या स्वार्थासाठी परस्परांकडे मदतीसाठी हात पसरले होते. जळगावची निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सुप्त संघर्षामुळे रंगतदार बनली होती. आतापर्यंत नेहमी बिनविरोध होणारी निवडणूक यंदा अविरोध न होणे खडसेंचे यश असल्याचे मानले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत खडसे समर्थकांच्या गटाकडून भाजपला अपशकून होण्याची भीती होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी सर्व शक्यतांना विराम देत जळगावच्या जागेवर विजय मिळवला. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या नांदेडमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आले. खा. चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक आ. चिखलीकर यांनी त्यांचे मेहुणे व माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना मैदानात उतरवले होते. शिंदे यांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ही लढत तुल्यबळ झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या अमर राजूरकर यांनी 251 मते मिळवत 48 मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला. अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेच्या विजयासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठकही घेतली होती. या निवडणुकीसाठी विशाल युती झाल्याने शिंदेंचा विजय निश्‍चित असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. तर अमर राजुरकर मैदानात असल्याने अशोक चव्हाण यांनी कंबर कसली होती. आजी-माजी मुख्यमंत्री आमनेसामने असल्याने नांदेडमधील निवडणूक प्रतिष्ठेची झाली. अखेर या लढतीत अशोक चव्हाण यांनी वर्चस्व सिद्ध केले. नांदेड विधानसभा परिषदेच्या निवडणुकीत एकूण मतांची संख्या 472 मते होती. यामध्ये काँग्रेस 201, राष्ट्रवादी काँग्रेस 106, शिवसेना 51, भाजपा 10, लोकभारती 13, एमआयएम 12, मनसे 9, स्वीकृत सदस्य 37 आणि इतर अशी मते होती. या निवडणुकीत भाजप, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जात काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीयांचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसचा झेंडा फडकवला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यंदा विधानपरिषदेच्या जळगाव मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही निवडणुकीच्या रिंगणात चंदू पटेल यांच्याविरोधात सात अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे खडसे फॅक्टर चंदू पटेल यांना अपशकून करणार, का याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी 421 मते मिळवत विजय संपादन केला. या जागेसाठी खडसेंनी सुचविलेल्या विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांना उमेदवारी नाकारत महाजनसमर्थक चंदू पटेल यांना उमेदवारी दिली गेली. पक्षाचा क्रियाशील सदस्य नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी देऊन भाजपने नवीन पायंडा पाडल्याची टीका खडसेंनी केली. त्यामुळे या निवडणुकीत चंदू पटेल यांना खडसे गटाकडून दगाफटका होऊ नये म्हणून गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचा गट सावध झाला होता. विरोधी पक्षातून प्रबळ उमेदवार समोर आल्यास त्यास नाराज गटाकडून रसद पुरविली जाण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात राहणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. काँग्रेस, शिवसेना, खान्देश विकास आघाडीसह 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रिंगणात भाजप विरोधात सात अपक्ष उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणार्‍या सातारा-सांगलीतील लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या जागेवर काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी मिळवलेला विजय अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षाच्या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली होती. आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली होती. यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेना- भाजप - राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. तानाजी सावंत यांना तब्बल 348 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांना 78 मतं मिळाली आहेत. यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महायुतीची स्थापना केली होती. शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असलेले तानाजी सावंत हे उस्मानाबादचे असले तरी त्यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली होती. बंडखोर उमेदवार संदीप बजेरिया यांनीदेखील सावंत यांनाच पाठिंबा दिला होता. भंडारा गोंदिया मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन, भाजपतर्फे परिणय फुके आणि काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणात होते. भंडारा गोंदिया मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला समजला जातो. या भागातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली होती. कागदावरील आकडेवारी बघता राष्ट्रवादी मजबूत स्थितीत होती. तर भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू साथीदार परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता होती. मंगळवारी मतमोजणीतून यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तबच झाले आहे. भाजपच्या परिणय फुके यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे भंडारा - गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही परिणय फुके यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भंडार्‍यात मुख्यमंत्र्यांनी पटेलांना शह दिल्याचे चित्र दिसत आहे. या मतदार संघात दुसर्‍यांदा काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यावेळी सर्वच राजकिय पक्षांनी आपापल्या सोयीसाठी आपल्या विचारांना गुंडाळून ठेवून विजयासाठी आखाडे बांधले होते. त्यात काहींचा जय झाला तर काहींचा पराजय.
----------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "जय-पराजयाचा धडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel