-->
कसोटीचा आठवडा

कसोटीचा आठवडा

संपादकीय पान शुक्रवार दि. 02 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कसोटीचा आठवडा
नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरचा पहिलाच पगाराचा आठवडा उजाडत आता असून पगारदारांकडून होणारी प्रचंड मागणी आणि नोटांची टंचाई यातून मार्ग काढताना बँकांची कसोटी लागणार आहे. पगाराच्या तोंडावर बँकेत गेलेल्या अनेक ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षाही खूपच कमी रोख रक्कम काढता आल्यामुळे 1 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार्‍या पगारानंतरची मागणी पूर्ण कशी करायची हा बँकांपुढील मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे बँकांवर आठवडाभर ताण राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर होणारी पैशांची मागणी लक्षात घेता नोटांचा पुरवठा वाढवण्याची मागणी बँकांच्या संघटनांनी केली असली तरी किती नोटांचा पुरवठा करण्यात येणार याला देखील मर्यादा आहेतच. कारण नव्या नोटा छापण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असले तरी 85 टक्के नोटा बाद झाल्याने हा तुटवडा बरुन काढण्यसाठी किमान चार ते पाच महिने लागतील असा अंदाज आहे. सध्याचा चालू आठवडा व त्यापुढचे 10 दिवस बँक कर्मचार्‍यांसाठी प्रचंड ताणाचे राहणार आहेत. मोठ्या संख्येने कर्मचारी, कामगार, सेवानिवृत्त आणि निवृत्तिवेतनधारक त्यांचा पगार काढण्यासाठी बँकेत गर्दी करणार आहेत. पुरेशा प्रमाणात नोटा पुरवण्यात रिझर्व्ह बँकेला अपयश आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने बँकांना संरक्षण पुरविण्याची व्यवस्था केली पाहिजे. बँकांचे बहुतांश एटीएम अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे 10 डिसेंबरपर्यंत या काळात बँकांतच पैसे काढण्यासाठी गर्दी उसळणार आहे. नोटा टंचाईमुळे पगारदारांनी मागणी केलेली रक्कम देण्यास बँका असमर्थ ठरल्या तर बाचाबाची आणि हाणामारीचे प्रसंग उद्भवण्याचा धोका असल्याने पुढचे 10 दिवस बँकांना पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी बँकांच्या संघटनांनी रास्त मागणी केली आहे. येत्या आठवड्याभरात पैशाची मागणी वाढणार असल्यामुळे आम्ही जास्त नोटा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. सर्व शासकीय चलन मुद्रणालयांमध्ये 500 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थमंत्रालयाला कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु गेल्या पंधरा दिवसात नेमक्या किती नवीन नोटा उपलब्ध करुन दिल्या याची आकडेवारी काही सरकारने प्रसिध्द केलेली नाही. ग्राहकांच्या खात्यात महिना संपताच पगाराची रक्कम जमा होणार असल्यामुळे पैशांची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पुरेशी व्यवस्था केली आहे, असे सरकारतर्फे सांगितले जात असले तरी नोटा उपलब्ध होतील व सर्व ग्राहकांना पैसे मिळतील .याची खात्री सध्या देता येत नाही. अशा स्थितीत सरकार येत्या दोन दिवसात नेमकी कोणती भूमिका घेणार आहे? कारण सध्या तरी मागणीच्या तुलनेत नोटांचा पुरवठा होत नसल्यामुळे अद्यापही बँकांचे व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडून दररोज नवीन निर्देश दिले जात आहेत. हे निर्देश संंबंधित बँकांच्या मुख्यालयांकडून अधिकृतपणे कळवल्याशिवाय त्याची लगेचच अंमलबजावणी करणे बँक कर्मचार्‍यांना जिकिरीचे होत आहे. रिझर्व्ह बँकेचे हे निर्देश तोडग्यापेक्षा जास्त प्रश्‍नच निर्माण करत आहेत. त्यामुळे बँकांसाठी सध्याचा चालू आठवडा कसोटीचा ठरणार आहे.

Related Posts

0 Response to "कसोटीचा आठवडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel