-->
नारायण राणेंचा प्रहार

नारायण राणेंचा प्रहार

संपादकीय पान गुरुवार दि. 01 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नारायण राणेंचा प्रहार
माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नगरपालिकेतील निवडणुकांच्या निकालानंतर कॉग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर घणाघाती प्रहार केला आहे. राणेंच्या टीकेचे मुख्य लक्ष्य हे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. कॉग्रेसच्या या पराभवाचे अर्थातच खापर हे प्रदेशाध्यक्षांवर येते, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. खरे तर त्यांनी या पराभवाबाबत अस्वस्थ व्हायला पाहिजे. मात्र अशोक चव्हाण हे शांत आहेत व नारायण राणे अस्वस्थ आहेत. याचे कारण या दोघांची प्रकृती भिन्न आहे. अशोक चव्हाण हे कॉग्रेस संस्कृतीत मुरलेले नेते आहेत व अकरा वर्षापूर्वी शिवसेनेतून मोठ्या अपेक्षा घेऊन आलेले नारायाणराव अजूनही खरे कॉग्रसेवासीय झालेले नाहीत, असे म्हमावे लागेल. अर्थात राणेंचा स्वभाव काँग्रेस संस्कृतीत रमणारा नाही. त्यांच्यातील लढाऊ मास लिडर हा सतत जागृत असतो. केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करणार्‍या काँग्रेसी नेत्यांसारखे राणे नाहीत. त्यांच्या रक्तात राजकारण, समाजकारण भिनलेले आहे. जनतेसाठी सतत काम करा तुमच्याबरोबर जनता राहिल, हा बाळासाहेब ठाकरेंचा संदेश सतत जपणारे ते नेते आहेत. आजवर त्यांनी कार्यकर्त्यांना जपले आहे, त्यांना सांभाळले आहे. अनेकदा पक्षाच्या बाहेरील लोकांची कामे करुन अनेकांशी चांगले नाते जुळवले आहे. मैत्री जागवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. कॉग्रेस आज तलागाळात पोहोचलेला पक्ष असला तरीही त्यांच्याकडे अशा प्रकारचे नेते हाताच्या बोटावर सापडतील. राजकारण हे चोवीस तास करण्याचे काम आहे, असे समजून काम करणार्‍या जातीवंत राजकीय नेत्यात राणेंचा समावेश होतो. त्याचबरोबर एकाद्या नेत्याचे चुकले तर त्याला तोंडावर ताड की फाड सांगणे हा त्यांचा स्वभाव आहे. कॉग्रेसमध्ये अनेकजण समोरुन गोडगोड बोलतील परंतु पाठीमागून वार करतील अशा स्वभावाचे ते नाहीत. त्यामुळे कॉग्रेसमध्ये आल्यावर केवळ तीन वर्षातच त्यांना डावलून अन्य कुणाची मुख्यमंत्रीपदी नेमणूक होत आहे असे दिसताच केंद्रीय नेतृत्वाचे कसे चुकते आहे ते स्पष्ट बोलणारे नारायणराव हे कॉग्रसचे एकमेव नेते असतील. तसेच कॉग्रसमध्ये केंद्रीय नेतृत्वावर प्रामुख्याने गांधी घराणे व त्यांच्या भोवतालचे कडबोळे यांच्यावर टीका करणार्‍याला पक्षात माफी नसते. परंतु सोनिया गांधींनी व राहूल गांधींनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले व पक्षात पुन्हा घेतले व पुन्हा मंत्रिमंडळातील मानाचे दुसरे स्थान दिले. अशा प्रकारे बंडखोरी करुन व केंद्रीय नेत्यावर टीका करणार्‍या नेत्याचा सन्मान होण्याचा मान फक्त राणे यांनाच कॉग्रेसच्या इतिहासात मिळाला असावा. कॉग्रेसने राणे यांना त्यावेळी माफ केले यामागचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्यामागे जनता आहे याची कल्पना केंद्रीय नेतृत्वास होती. त्यामुळे त्यांना डावलणे म्हणजे पक्षाचे नुकसान करुन घेणे हे स्पष्ट दिसल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने त्यांना माफ केले असावे. नारायणरावांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाला ते आपले सर्वस्व देतात. हा पक्ष कसा वर येईल यासाठी झपाटून काम करतात. आता देखील त्यांनी केलेले आरोप याच तळमळीने केले आहेत. सध्याच्या स्थितीत सत्ताधारी बदनाम होतील मग आपणच सत्तेवर येऊ अशी कॉग्रेसमधील नेत्यांची धारणा आहे. मात्र असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही कॉग्रेसजनांची वृत्ती त्यांना मान्य नाही. सरकारच्या अनेक नकारात्मक बाबी आपण नजरेस आणून दिल्या पाहिजेत, त्यासाठी जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, सरकारविरुध्द आंदोलने केली पाहिजेत तरच आपल्याला भविष्यात जनता पुन्हा सत्तेत बसवेल ही नारायणरावांची तळमळ आहे. मात्र गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्या क़ाँग्रेस नेत्यांना जनआंदोलने करणे काही मनाला रुचणारे नाही किंवा त्यांना पसंत पडणार नाही. अर्थातच ते एवढी वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे सुस्तावले देखील आहेत. राणेंचा आपल्याकडे सहज सत्ता येणार नाही, त्यासाठी सरकारविरोधी आंदोलने उभारावी लागतील हा त्यांचा विचार कॉग्रेस नेत्यांना काही पचनी पडेल असे दिसत नाही.  अर्थात राणे यांचे राजकीय करिअर हे शिवसेनेपासून सुरु झाल्यामुळे ते रस्त्यावरचे नेते आहेत व सत्ता उपभोगूनही त्यांनी आपला हा स्वभाव काही बदललेला नाही.   कॉग्रेस संस्कृती जी मोठ्या अभिमानाने सांगितली जाते ती ही असावी व त्यामुळेच ते त्यात काही रमत नाहीत. ते त्यांच्या स्वभावाला मुरड घालू शकत नसल्यामुळे ते यात काही रमणार नाहीत. अशा स्थितीत राणेंपुढे पर्याय आहेत तरी काय? सध्याच्या सत्ताधारी पक्षात जाणे किंवा अन्य पक्षात जाणे किंवा आपला एखादा नवीन पक्ष स्थापन करणे वा सध्याच्याच पक्षात राहून लढा देणे. सध्याच्या स्थितीत यातील प्रत्येक पर्यायांचा विचार करावयाचा झाल्यास राणे शिवसेनेत जाऊ शकत नाहीत, भाजपावर व मोदींवर त्यांनी एवढी टिका केली आहे की तेथे ते जाणे प्रशस्त ठरणार नाही. राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्‍नच शिल्लक राहात नाही. स्वत:चा पक्ष स्थापन करुन त्याला कितपत यश मिळणार हे प्रश्‍न आहेतच. अशा स्थितीत राणेंपुढे सध्या कॉग्रेस पक्षातच राहून संघर्ष करणे योग्य ठरणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राणेंनी आपल्याला खासदार होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात सत्ता आल्यास पुन्हा मुख्यमंत्री होण्यात रस नाही की काय? असाही सवाल उपस्थित होतो. असो, नारायणरावांनी यावेळी आपला प्रहार राजयातील नेत्यांवरच केला आहे, केंद्रीय नेतृत्वावर टीका केलेली नाही. त्यामुळे कॉग्रेसमध्येच राहून असे प्रहार करीत आपले पक्षातील वजन व दबदबा वाढवित नेण्याचे त्यांचे धोरण राहिल्यास त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. शेवटी राणे काय करतात ते सांगता येत नाही. सध्या फक्त बघत राहाणेच इष्ट ठरेल.
-------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "नारायण राणेंचा प्रहार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel