-->
अम्मानंतरचा अण्माद्रमुक

अम्मानंतरचा अण्माद्रमुक

संपादकीय पान मंगळवार दि. 13 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अम्मानंतरचा अण्माद्रमुक
पक्ष जर व्यक्तिकेंद्रीत असेल व ती व्यक्ती अचानक निघून गेल्यास पक्षाची अधोगती सुरु होते. तामीळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाभोवती आज हीच मोठी समस्या निर्माण झाली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष कसा चालणार अशी स्थिती येऊन ठेपली आहे. कारण पक्षात नेतृत्व करायला आज दुसरी फळीच अस्तित्वात नाही. त्यामुळे अम्मा जाऊन आठवडा लोटत आला तरीही अजून पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्णय झालेला नाही. अण्णा द्रमुकची ही स्थीती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या राजकीय डावपेचाचा भाग म्हणून जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष जसाच्या तसा भाजपात विलीन करून घेण्याची तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ायंनी अम्मांचे अंत्यदर्शन घेणे व त्यांनी सर्व खासदारांची भेट घेणे ही घटना बरीच काही बोलून जाते. मागच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत भाजपाला राज्यत रुजवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, मात्र जयललितांनी पूर्ण बहुमत मिळवले. लोकसभा निवडणुकीतही 37 पैकी 35 खासदार जयललितांनी जिंकून आणले. ज्या पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये विलीन होण्याची इच्छा नाही त्यांनी शशिकला यांचे नाव पुढे केले आहे. परंतु शशिकला हे धनुष्य पेलणार किंवा नाही तो प्रश्‍नही आहेच. तामीळनाडूत गेली तीस वर्षे व्यक्तीवर आधारीत राजकारण सुरु आहे. एम.जी. आर. यांच्या निधनानंतरही पक्षात उभी फूट पडली होती. त्यातील एक गट एम.जी.आर. यंच्या पत्नीच्या बाजूने उभा राहिला तर दुसरा गट जयललिता यांच्या बाजूने. मात्र काळाच्या ओघात जयललिता यांनी पक्षावर आपली पक्कड घट्ट बसविली ती आजवर निधन होईपर्यंत. आता देखील एम.जी.आर. गेल्यानंतरची स्थिती पक्षात पुन्हा निर्माण झाली आहे. यात सध्याचा राज्यातला द्रमुक पक्ष बाजी मारु शकतो का? असा देखील सवाल आहे. 1967 नंतर मात्र या राज्यात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांना फारसा जम बसवता आलेला नाही. द्रमुक आणि अण्णा द्रमुकमधल्या पक्षांचेच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिलं. दोन्ही पक्षांना तमीळ भाषिक राष्ट्रवाद, द्रविडी अस्मिता या गोष्टी मान्यच होत्या. तरीही या दोन पक्षांच्या विचारप्रणाली, राजकारणामध्ये काही भेदही होते. द्रमुक हा पक्ष तमीळ राष्ट्रवादाची जास्त आग्रही मांडणी करीत होता. या पक्षाच्या मागे शहरी मध्यमवर्ग, दुकानदार, छोटे व्यापारी यांचाही सहभाग होता, तर अण्णा द्रमुक हा पक्ष तमीळ राष्ट्रवादाचा तुलनेनं कमी आग्रह धरणारा वर्ग होता. द्रमुकचे नेते करुणानिधी यांनी हा पक्ष केडरबेस्ड, कार्यकर्त्यांना, संघटनेला महत्त्व देणारा ठरेल यादृष्टीने वाढविला. तर अण्णा द्रमुक हा व्यक्तीपुजेला महत्व देणारा पक्ष ठरला. चित्रपटसृष्टीच्या कलाकारांचा प्रभाव या पक्षावर नेहमीच वाढत गेला. त्यामुळेच केंद्रात नरसिंहराव सत्तेत असताना तामीळ सुपरस्टार रजनिकांत याने जयललितांच्या कारभारावर टीका केली होती. याचा परिणाम असा झाला की, जयललिता त्यावेळी सत्तेत न येता द्रमुक आला होता. एकूणच काय सुपरस्टारचे महत्व इथे नेहमीच राहिले. जयललिता यांनी आपल्या शेवटच्या दोन कालावधीत अनेक जनताभीमूख योजना आणल्या. अम्मा कॅटिंन ही त्यतील एक अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना. आपल्याकडे मागच्या युती सरकारने याच धर्तीवर झुणका भाकरी योजना आणली होती. परंतु त्या योजनेचे कसे दिवाळे वाजले आणि नेत्यांनी आपली धन कशी करुन घेतली हे आपण पाहत आलोच आहोत. परंतु अम्मा कॅन्टिनमध्ये असे झाले नाही. ही योजना खरोखरीच गरीबांच्याच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्याही फायद्याची ठरली आहे. केवळ हीच योजना नाही तर गरीबांना मोफत घरे देण्याचा उपक्रमही यशस्वीरित्या त्यांनी राबविला होता. सुनामी असो किंवा वादळातील तडाख्यातील लोकांचे पुनर्वसन तामीळनाडून उत्तम झाले आहे. याचे अर्थातच सर्व श्रेय जयललिता यांच्या एकहाती कारभाराकडे जाते. मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा तामीळनाडूत कळीचा होता. हा प्रश्‍न व त्याच्या जोडीला दलितांच्या आरक्षमाचा प्रश्‍न त्यांनी सोडविला. आता जयललिता यांच्या निधनानंतर तामीळनाडूत काय होऊ शकते? ते़थील राजकारण कोणती दिशा घेऊ शकते? एक बाब स्पष्ट आहे की, अम्मांच्या निधनानंतर अण्णाद्रमूक पक्ष सध्यातरी एका मोठ्या शॉकमध्ये आहे. यातून तो लगेचच बाहेर पडणे अशक्य आहे. जयललिता यांची पोकळी भरुन यायला बराच कालावधी लागेल. परंतु आता लगेचच पक्षात उभी फूट पडेल की, पडणार नाही. भाजपात पक्ष विलीन करण्यासाठी भाजपा उताविळ झाला असला तरी हा त्यांचा डाव यशस्वी होईल का? विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे कितपत यशस्वी होतात? या प्रश्‍नांची उत्तरे काळ देणार असला तरीही भाजपात पक्ष थेट विलीन करण्याचा प्रस्वात लगेचच मान्य होईल असे काही नाही. परंतु भाजपा या पक्षातील खासदारांचा वापर करुन काही विधेयके राज्यसभेत सहजरित्या संमंत करु शकतो. तसेच लोकसभेत या पक्षाचे खासदार तटस्थ राहिले तरीही भाजपालाच फायदा होऊ शकतो. अण्णा द्रमुकचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत पन्नासपेक्षा जास्त खासदार आहेत. जीएसटीसारखं विधेयक मंजूर व्हावं म्हणून या पक्षानं केंद्र सरकारला संसदेत मदत केलेली आहेच. पुढच्या दोन वर्षांत होणार्‍या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांतही या पक्षाच्या आमदार-खासदारांची मदत भाजपला उपयुक्त वाटेल. त्याहीपेक्षा दूरचं म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकनं आपल्याशी युती करावी, असाही भाजपचा प्रयत्न असेलच. यातूनही शशिकला हा भावी जयललिता होतील का त्यावरही बरेच राजकारण अवलंबून असेल.
------------------------------------------------------

0 Response to "अम्मानंतरचा अण्माद्रमुक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel