-->
महाराजांचे विचार अंमलात आणा!

महाराजांचे विचार अंमलात आणा!

संपादकीय पान गुरुवार दि. 22 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महाराजांचे विचार अंमलात आणा!
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा घाट घालून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडावयाचे ठरविलेले दिसते. अर्थातच या भूमिपुजनाला शिवसेनेला डावलण्याचा घाटही त्यासठीच होता. कारण याचे श्रेय फक्त भाजपालाच मिळावे असे मोदींपासून सर्व भाजपाच्या नेत्यांना मनापासून वाटत असावे. मात्र शिवसेनेला अखेरच्या क्षणी यात समाविष्ट करुन शिवसेनेचा हा बालहट्ट संपविण्याचा निर्णय भाजपाने घेतला असावा. आता या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी व उध्दव ठाकरे हे असतील. मुंबई महानगरपालिका निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये होणार आहे. पालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होऊन जागावाटप झाले होते. यावेळी मात्र केंद्रात व राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरीही मुंबई महानगरपालिकेत एकमेकांविरुध्द लढतील असे सध्यातरी चित्र आहे. कारण हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत, कल्याण-डोंबिवली निवडणुकीतही वेगळे लढले. आता मात्र भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे भूमिपुजन करुन तसेच मुंबईतील विविध विकासांच्या प्रकल्पांची उद्दघाटने करुन महानगरपालिका निवडणुकांसाठी आपल्यासाठी पोषक वातावरण निर्मिती सुरु केली आहे. आता याच प्रकारे शिवस्मारकाचे भूमिपूजन होत आहे. अर्थात अरबी समुद्रात होणार्‍या शिवस्मारकाला स्थानिक मच्छिमारांनी विरोध केला आहे. कारण त्यामुळे मासेमारी करणं कठीण होईल असं मच्छिमारांचं म्हणणं आहे. शिवस्मारक भूमीपूजनसाठी 70पेक्षा जास्त किल्ल्यांवरील माती आणि नदीचं पाणी आणलं जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून आणि संबंधित भागातील आमदार ही माती आणि पाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील. 24 डिसेंबराला शिवाजी महाराजाचे वंशज सातार्‍याचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभीजीराजे यांच्यातर्फे शिवस्मारकाचे भूमीपूजन प्रत्यक्ष समुद्रातील खडकावर केलं जाईल. मुंबईजवळ अरबी समुद्रात महाराष्ट्र शासनाच्यावतीने साकारण्यात येणारा महत्त्वांकाक्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून हा एकमेवाद्वितीय आहे. ते जगातील आठवे आश्‍चर्य ठरेल, इतक्या भव्यपणे या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. खरे तर यांची सुरुवात व असे स्मारक उभारण्याचे आश्‍वासन कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात झाली होती. परंतु हा प्रकल्प काही ना काही कारणांनी रखडतच गेला. या स्मारकासाठी समुद्रात आठ ते नऊ जागांची पाहणी करण्यात आली होती. निश्‍चित केलेल्या जागेवर बेसाल्टचा खडक सुस्थितीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक हे जागतिक दर्जाचे असून यात साकारण्यात येणारा पुतळा हा 190 मीटर उंचीचा असणार आहे. जगातील सर्व पुतळयांपेक्षा हा पुतळा उंच असणार आहे. विशेष म्हणजे या पुतळयाच्या आतमध्ये दोन लिफ्ट बसवण्यात येणार असून या लिफ्ट मधून छत्रपती शिवरायांच्या हातात असणा़र्‍या तलवारीच्या टोकापर्यंत लोकांना जाता येईल, अशी सोय असेल. या पुतळयापर्यंत पोहोचण्यासाठी जेटीचा वापर करण्यात येणार आहे. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवणारे वस्तुसंग्रहालय, अद्ययावत उपहारगृह, अ‍ॅम्पीथिएटर, बगीचा, दोन हेलिपॅड, एक्झिबिशन सेंटर, समुद्र मत्स्यालय आदी सुविधा असणार आहेत. सुमारे साडे हजार कोटी रूपयांपर्यंत या स्मारकाचा खर्च आहे. अर्थातच हा खर्च कित्येक पटीने अन्य प्रक्लापंप्रमाणे वाढतच जाईल, यात काही शंका नाही. वॉटरस्पोर्ट, लेझर शो आदी सुविधाही या स्मारकात असेल. दोन टप्प्यात शिवस्मारकाचे काम पूर्ण होणार असुन पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल. यामध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा समावेश असेल, तर दुसर्‍या टप्प्यात आर्ट गॅलरी, संग्रहालय, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक बाबींचा समावेश असणार आहे. शिवस्माराचे स्वरुप पाहता ते भव्य दिव्य असणार व त्याचे कुणीही स्वागत करील यात काहीच शंका नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा या स्मारकाला विरोध असण्याचेही कारण नाही. परंतु शिवाजी महारांचे अशा प्रकारे स्मारक उभारण्यापेक्षा आपण शिवरायांच्या विचारांची अमंलबजावणी करणे हेच मोठे काम ठरेल व त्यांचा तोच उचित सन्मान ठरु शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. रयतेचा तो राजा होता. महिलांचा सन्मान त्यांनी नेहमीच केला, गरीब-दिनदुबळ्याच्या हिताचे नेहमीच निर्णय घेतले. हिंदु-मुस्लिम एैक्य नेहमीच त्यांनी टिकवले. महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख हा मुस्लिम सरदार होता तसेच अनेक महत्वाच्या हुद्यावर त्यांच्याकडे सरदार मुस्लिम होते, याचा आपण कधी विसर पडू देता कामा नये. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुंच्या रक्षणकर्ते नव्हते तर सर्वसामान्य रयतेचे रक्षणकर्ते होते, त्यांनी जात-पात-धर्म याचे राजकारण कधीच केले नाही. अशा या शिवाजी महाराजांचे विचार आजही आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यांचे विचार आजही आपण अंमलात आणल्यास आपले जीवन सुसाह्य होऊ शकते. याची जाणीव आजच्या राज्यकर्त्यांनी व जनतेनेही ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे स्मारके उभारुन आपण शिवाजी महाराजांना केवळ देखणी वास्तू म्हणून जगापुढे आणत आहोत. तसे न करता त्याचे विचार अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्याची आजची अवस्था पाहून प्रत्येक शिवप्रेमींना लाज वाटते. सरकारने एक नवे स्मारक उभारण्याएवजी रायगड किल्ला तसेच शिवकालीन अन्य किल्ले जरी चांगल्या स्थितीत ठेवले तरी खूप मोठे स्मारक होईल. मात्र सरकारला तसे काही करावेसे वाटत नाही ही सर्वात दुदैवी बाब आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "महाराजांचे विचार अंमलात आणा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel