-->
एस.टी.चे भवितव्य अंधारात?

एस.टी.चे भवितव्य अंधारात?

संपादकीय पान शुक्रवार दि. 23 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एस.टी.चे भवितव्य अंधारात?
राज्याच्या स्थापनेनंतर सर्वसामान्यांनाच्या वाहतुकीसाठी स्थापन झालीली एस.टी. सध्या मोठ्या अडचणींना तोंड देत आहे. विविध कारणांमुळ एसयटी.कडे प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत एसटीचे तब्बल 15 कोटींहून अधिक प्रवासी घटले असून, हा सर्वात मोठा फटका मानला जातो. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होईल, या भीतीने एसटी महामंडळाने जानेवारी 2017 पासून तीन महिन्यांसाठी प्रवासी वाढवा विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणार्‍या आगार, चालक व वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. एस.टी. बसची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेले भाडे आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. दिवसाला 75 लाख प्रवासी प्रवास करत असताना, पाच वर्षांत यात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. आता हीच संख्या दररोज 64 लाख 7 हजार प्रवासी एवढ्यावर खाली आली आहे. 2011-12 मध्ये 260 कोटी 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, हाच आकडा 2015-16 मध्ये पाहिल्यास 245 कोटी 60 लाखांपर्यंत आला. एकंदरीतच प्रवासी संख्येत होत चाललेली घट पाहता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, एसटी महामंडळाकडून नवीन एसी बसेस घेतानाच स्वच्छता मोहीम व कॅटरिंग व्यवस्थेतही बदल करण्याचे प्रयोग केले जात आहेत. तरीही प्रवाशांत काही केल्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळेच एसटीकडून 1 जानेवारी ते 31 मार्च 2017 पर्यंत राज्यभर प्रवासी वाढवा विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रवासी वाढवण्यास मदत करणार्‍या आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या आगारांना दरमहा 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, तसेच दुसर्‍या क्रमांकावरील आगारास 75 हजार रुपये आणि तिसर्‍या क्रमांकावरील आगाराला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. अर्थात असा प्रकारचे अभियान राबवून एस.टी. प्रवासी काही वाढणार नाहीत. त्यासाठी एस.टी.च्या कारभारात आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या एस.टी.ला गावागावात सितार्‍यांशी व राज्यात खासगी बसशी स्पर्धा करावी लागत आहे. खासगी बसशी स्पर्धा करताना त्यांच्यासारख्या चांगल्या दर्ज्याच्या आरामदायी बस आणाव्या लागतील. खासगी कंपन्यांपेक्षा चांगली सेवा दिल्यास लोक एस.टी.कडे वळतील यात काही शंका नाही. त्याचबरोबर चालक व वाहक यांना प्रशिक्षण देऊन प्रवाशांनी कशा प्रकारे सौजन्याने वागायचे ते शिकवावे लागेल. त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एस.टी. जी भ्रष्टाचाराची जी ठिकठिकाणी भोके आहेत ती बुजवावी लागतील. एस.टी.ला यासाठी नव्याने गुंतवणूक करावी लागणार आहे, त्यासाठी विविध बँका कर्ज देण्यासाठी पुढेे येऊ शकतात. जिल्हा सहकारी बँकांना यासाठी कर्ज देण्यासाठी पुढाकार घेता येईल. त्याचबरोबर एस.टी.च्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हावार, तालुका पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना एस.टी. विषयीच्या तक्रारी या समितीकडे देता येतील. यातून काभार सुधारण्यास मदत होऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. एस.टी. ही जनसामान्यांसाठी आहे व तिचा उपयोग चांगल्यारितीने करुन घेता येऊ शकतो. त्यातील लाल फितीची कारभार दूर करावा लागेल. मात्र त्यासाठी परिवहनमंत्र्यांची इच्छाशक्ती असण्याची गरज आहे.

0 Response to "एस.टी.चे भवितव्य अंधारात?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel