-->
आता भावूकता कशाला?

आता भावूकता कशाला?

संपादकीय पान मंगळवार दि. 15 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता भावूकता कशाला?
नेहमी आपण कणखर असल्याचे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यातील एका कार्यक्रमात भावूक झाले होते. एरव्ही कणखर असल्याचे भासविणारे आपले पंतप्रधान का बरे भावूक झाले? 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून देशात जो हाहाकार माजला आहे, त्यामुळे सरकार काहीसे हतबल झाले आहे. यातून मार्ग काढणे जमत नाही असेच दिसते. कारण आता निर्णय तर घेतला मात्र त्याचे काय परिमा होऊ शकतात त्याच अभ्यास न करता निर्णय घेतल्याने आपला निर्णय फसणार हे मोदी समजून चुकले आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी भावूक झाले आहेत. खरे तर भाजपाला देशाने पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. भाजपाने मोदींची एकमताने निवड केली आहे व त्यांना सर्व अधिकार बहाल केले आहेत. देशात अन्य मंत्री असले तरी त्याचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदीच आहेत. सर्वच निर्णय ते एक हातीच घेतात. त्यामुळे काळा पैसा नष्ट करण्यासाटी त्यांनीच हा निर्णय घेतला हे उघड आहे. जनतेच्या हाती पैसे नसल्यामुळे व बँकांसमोर रांगा लावण्याचे एकच काम असल्यामुळे जनता हैराण झाली आहे. काळा पैसेवाला बाजूला राहिला सध्या तरी सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे अशा कष्टकर्‍यांचे तर हाल सर्वात जास्त आहेत. अशा लोकांकडे खरे तर सरकारने जाऊन त्यांच्या नोटा बदलून दिल्या पाहिजेत. मात्र त्यांना रांगेत उभे करुन सरकार त्यांचा वेळ फुकट घालवीत आहे. मध्यप्रदेशातील असाच एका रेशन दुकानावर जनतेने हल्ला करुन तेथील धान्य लुटले, कारण येते त्यांच्याकडे पैसे असूनही कोणी धान्य देत नव्हते. अशी अभूतपूर्व परिस्थिती सरकारच्या अविचारामुळे आली आहे. आता मोदी म्हणतात मला केवळ 50 दिवस द्या. म्हणजे अजून 50 दिवस जनतेने रोजच्या रोज रांगा लावायच्या का? दिल्लीत बसून आम जनतेचा विचार न करता निर्णय घेतले की असे होते, हे मोदींना आता समजले असावे आणि त्याचमुळे ते भावूक झाले आहेत. आर्थिकविषयाचे सचिव शशिकांत दास यांनी रुग्णालय, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा वापरण्याची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सगळीकडे रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँका आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. जी दोन हजाराची नोट बाजारात सरकारने आणली आहे ती ए.टी.एम. मध्ये बसत नाही, त्याचा रंग जातो असे आज आढळले आहे, आणि पाकिस्तान बनावट नोटा आता करु शकणार आही असा खोटा दावा सरकार करते. बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच साडेचार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. तसेच एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येतील. मात्र प्रत्येक एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येणार नाहीत. हे देखील सरकार दिल्लीच्या केबिनीत बसून निर्णय घेते. कारण बँकांकडे पैसेच जनतेला द्यायला नाहीत. त्याविषयी मोदी व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर गप्प आहेत. नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक येचे सर्वात जास्त होल होत आहेत. याचा सरकारने विचार केलेला नाही का? काही ठिकाणी जुन्या नोटा 24 नोव्हेबरपर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विमान तिकीट आणि रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा चालतील, असे जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांपर्यंत रोख रक्कम पोहोचवण्यासाठी सरकारने सर्व पर्यायांचा वापर करण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पोस्ट ऑफिसांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील नागरिकांच्या सोईसाठी ग्रामीण भागातील रोख रकमेच्या पुरवठ्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक विशेष पथकात तयार करेल. तसेच नव्या नोटा देण्यासाठी एटीएमच्या रचनेत करण्यात येत असलेले तांत्रिक बदल पुढच्या काही दिवसांत पूर्ण होतील, मात्र हे सर्व सरकारचे दावे आहेत. प्रत्यक्षात लोकांचे हालच चालले आहेत.

0 Response to "आता भावूकता कशाला?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel