-->
उलाढाल थंडावली

उलाढाल थंडावली

संपादकीय पान शनिवार दि. 19 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उलाढाल थंडावली
पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी 500 व1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद केलेल्या घोषणेला आज बरोबर दहा दिवस झाले आहेत. ही घोषणा झालेल्या दिवसापासून गेल्या दहा दिवसात देशात एक गोंधळ उडाला आहे. यात तीन दिवस बँकांना सुट्टी होती. म्हणजे गेल्या सात दिवसात बँका चालू असलेल्या काळात तेथे नोटा बदलून येणार्‍या लोकांची संख्या काही कमी होत नाही. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातून शंंभर टक्के काळा पैसा हद्दपार होणार नाही, मात्र अशी काही हवा तयार करण्यात आली की, आता देशात सर्व व्यवहार पांढरेच होणार, घरे स्वस्त होणार, भ्रष्टाचार संपणार इत्यादी इत्यादी. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. पंतप्रधानांना आपल्या घोषणेचे मार्केटिंग करण्याचे एक कौशल्य संपादन केले आहे, त्याच धर्तीवर लोकांना उल्लू बनविण्याचे काम सुरु आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गेले दहा दिवस देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यातून ज्यांचे रोजंदारीवर पोट आहे तो वर्ग भरडला जात आहे. मुंबईसारख्या मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या शहरातील ही हालत आहे तर अन्य शहरातील तसेच ग्रामीण भागातील विचारच न केलेला बरा. रेस्टॉरंट, रस्त्यावरील विक्री करणारे यांच्या उलाढालीत सुमारे 50 टक्क्याने घट झाली आहे. शहरातील कृषी क्षेत्राची उलाढात होत असलेले नवीन मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील उलाढाल तब्बल 50 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या दहा दिवसात मुंबईतील एका पाहाणीत सर्व मिळून सुमारे 800 कोटी रुपयांची उलाढाल थांबल्याचेे दिसत आहे. नवीन मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीती उलाढाल 32 कोटी रुपयांनी घसरली आहे. मुंबईत दरवर्षी रेस्टॉरंट उद्योग निव्वळ 32,000 कोटी रुपयांची उलाढाल करतो. त्यांची ही उलाढाल 40 टक्क्यांनी घसरली आहे, असे इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंटस्चे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षात एक तर बाजारातील मंदीने प्रत्येक जण हैराण झाला आहे. त्यातच नोटा बंदीमुळे या मंदीत आणखीनच भर पडली आहे. देशातील प्रत्येक उद्योगाला याचा फटका सहन करावा लागत आहे. केवळ रेस्टॉरंटच नव्हे तर किराणा मालाची दुकाने, बेकरी, केमिस्ट, तयार कपड्याची दुकाने या सर्वांची उलाढाल किमान 50 टक्क्यांनी घसरली आहे. सध्याच्या स्थितीत लोकांकडे पैसा असला तरीही तो खर्च करणार तरी कसा? कारण सरकारने नव्याने बाजारात आणलेली दोन हजार रुपयाची नोट मोडावयास गेले तरी त्याचे सुटे मिळत नाहीत. त्यामुळे अगदीच जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याची खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळेच जवळपास खप 50 टक्क्यांनी घसरले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार, रियल इस्टेट उद्योगातील काळा पैसा यामुळे संपुष्टात येईल व घरांच्या किंमती घसरतील. मात्र हे काही खरे नाही. सध्या हा उद्योग मंदीतच आहे त्यामुळे त्यांच्या किंमती मागणीनुसार थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या आहेत. सरकारने 500 व 1000 रुपयाच्या नोटा रद्द केल्यापासून नवीन घरांच्या खरेदीचे प्रमाण हे सुमारे 40 टक्क्यांनी घसरले आहे. रियल इस्टेट उध्योगावर मोठ्या मंदीचे सावट आहे. येथे होणार्‍या प्रकल्पांच्या चौकशा थंडावल्या आहेत. रियल इस्टेट उद्योगाला मंदीचा फटका गेले दोन-तीन वर्षे आहे. मात्र त्यातही या उद्योगाने थोडाफार तग धरला होता. आता मात्र या उद्योगाला आणखी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र यामुळे आगामी काळात जागांच्या किंमती खूप मोठ्या प्रमाणात घसरतील व लोकांना स्वस्त घरे मिळतील हे मात्र स्वप्नच राहाणार आहे. कारण यामुळे घरांच्या किंमती खाली येतील असे सध्या तरी काही दिसत नाही. मात्र एक बाब आहे की, यामुळे व्याजाचे दर घसरले आहेत. आता जवळपास सहा टक्क्यांवर खाली आले आहेत. आणखी एक-दोन टक्के व्याजाचे दर उतरल्यास गृहकर्ज आणखी स्वस्त होईल. आता सध्या व्याजाचे दर घसरु लागले आहेत व नजिकच्या काळात ते आणखी उतरण्याची शक्यता गृहीत धरले तर त्याचा फायदा रियल इस्टेट उद्योगाला होणार हे नक्की. कारण गृहकर्ज स्वस्त झाल्याने मागणी वाढणार आहे. मागमी वाढल्यास या उद्योगात जी सध्याची मंदीसारखी स्थिती आहे ती सैल होण्यास मदत होईल. देशातील करमणूक उद्योगालाही सध्याच्या परिस्थीतीचा फटका बसला आहे. अनेक नाटके गेले काही दिवस प्रेक्षकाविना होती. मात्र आता नाट्यगृहांनी चेक स्वीकारण्यास सुरुवात केल्याने पुन्हा नाटके हाऊसफूल्ल होऊ लागली. चित्रपटांच्याबाबतीत सिंगल स्क्रिन असलेल्या थिएटरांचा धंदा 50 टक्क्याहून जास्त घसराल आहे. मल्टिफ्लेक्सला मात्र तेवढा फटका बसलेला नाही. कारण येते नेटवरुन तिकीटांचे बुकिंग करण्याची व्यवस्ता आहे. व्हेंटिलटर या मराठी चित्रपटाने गेल्या दहा दिवसात 11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अनेक व्यवसायांवर मात्र गदा आली आहे. यातील सर्वाधिक फटका ज्वेलर्संना बसला आहे. त्यांचा व्यवसाय 75 टक्क्यांनी खाली आला आहे. सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली घोषणा स्वागतार्ह असली तरीही    त्यासाठी नोटा बदलून देण्याची जी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती ती मात्र न केल्याने त्याचा फटका सर्वांना बसत आहे. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे हे सर्व झाले आहे, त्यामुळे उद्योगधंद्यांना आता मंदीच्या फेर्‍यातून जावे लागत आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "उलाढाल थंडावली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel