-->
प्रदूषणाची चादर

प्रदूषणाची चादर

संपादकीय पान बुधवार दि. 9 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
प्रदूषणाची चादर
------------------------------------------
देशाची राजधानी सध्या अस्वस्थ आहे. अर्थात, ही अस्वस्थता राजकीय रणधुमाळींमुळे नाही, तर प्रदूषणामुळे आहे. दिल्ली म्हटली म्हणजे देशाच्या राजकारणाचे व प्रशासकीय हालचालींचे मुख्य केंद्र. राजकारणाचा मुख्य अड्डा. परंतु, सध्या दिल्लीवर प्रदूषणाची जी चादर पसरली आहे, त्यामुळे दिल्लीचे हे भयाण वास्तव पुन्हा एकदा जनतेपुढे आले आहे. गेले तीन दिवस दिल्लीवर ही विषारी वायूची छाया पसरली आहे. एखाद्याने दिवसातून सुमारे 30 सिगारेट्स ओढल्यास त्याच्या शरीराची जी हानी होईल, तेवढी हानी प्रत्येक दिल्लीकराची होत आहे. यावरुन या भयाण स्थितीचा नेमका अंदाज येऊ शकतो. त्यामुळे शाळा गेले तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर ज्यांना अत्यंत गरजेचे आहे त्यांनीच कामा-धंद्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे दिल्लीतील बहुतांशी रस्ते ओस पडले आहेत. यावर उपाययोजना म्हणून तातडीने केंद्र व राज्य सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मात्र, या दोन्ही सरकारची परस्परात जुंपली आहे. सध्या दिल्लीतील जनतेला यातून बाहेर काढण्याऐवजी केंद्र सरकार दिल्लीतील सरकारवर आरोप करीत आहे, तर दिल्लीचे सरकार केंद्राची काही मदत मिळत नाही म्हणून हाकाटी करीत आहे. एकूणच पाहता, या प्रदूषणाचे निमित्त करीत दोन्ही सरकारने परस्परांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व दुर्दैवी आहे. सध्या केंद्र सरकार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातून विस्तवही जात नाही. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार म्हणते, बरे झाले आता केजरीवाल आपल्या तावडीत सापडले. परंतु, अशा प्रकारे केंद्र सरकारचे हे वागणे जनतेच्या विरोधात आहे. गेल्या वर्षीदेखील याच दिवसात दिल्लीत धुक्याची मोठी लाट आली होती. ही लाट प्रामुख्याने हरियाणातून आली होती. मात्र, या वेळची स्थिती थोडी वेगळी आहे. या वेळी प्रदूषित हवेचा थरच दिल्लीवर जमा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढील दहा दिवस औष्णिक वीज प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजना या स्वागतार्ह आहेत. मात्र, ही वरवरची मलमपट्टी झाली. अशा प्रकारच्या प्रदूषणाच्या चादरीला कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी सरकारने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, त्यासाठी केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही राजकारणातील आपले हेवेदावे बाजूला ठेवून दिल्लीकरांच्या उन्नतीसाठी पावले उचलण्याची गरज आहे. कारण, अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. प्रामुख्याने जी तरुण पिढी आहे, त्यांचे भविष्य अंधारात येऊ शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्याची ही चादर विरळ होत चालली असली, तरीही पुढील आठवडाभर तरी कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण राहाणार आहे. सरकारने वेळीच याचा धोका ओळखून आता उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "प्रदूषणाची चादर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel