-->
उत्तर प्रदेशात रणधुमाळी

उत्तर प्रदेशात रणधुमाळी

संपादकीय पान बुधवार दि. 9 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उत्तर प्रदेशात रणधुमाळी

दिल्लीवर प्रदूषणाची चादर पसरलेली असताना त्याच्या शेजारीच असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या राजकीय रणधुमाळींनी वेग घेतला आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या असून, भाजप सत्ता काबीज करण्यासाठी आक्रमक झाला आहे. तर सध्या सत्तेवर असलेला समाजवादी पक्ष आपल्या पक्षातील राजकीय मतभेदाची ठिगळे लावत असताना, आपल्याकडे सत्ता कशी टिकेल, यासाठी धडपडत आहे. तर मायावती यांचा बहुजन समाज पक्ष पुन्हा नव्याने उभारुन येण्यासाठी झेप घेत आहे. गेली 27 वर्षे सत्तेशिवाय असलेला काँग्रेस पक्ष आता आपल्या जागा कशा वाढतील, यासाठी धडपडत आहे. भारतीय जनता पक्षासाठी उत्तर प्रदेशातील ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी परिवर्तन यात्रा आयोजित केली आहे. यातून हिंदू मते एकवटून राज्यात आपण कशा प्रकारे जिंकू शकू, याची आखणी ते करीत आहेत. मात्र, भाजपच्या या परिवर्तन यात्रेला लोकांना जमविण्यासाठी बारबाला आणून त्यांना नाचविले जात आहे. या यात्रेच्या निमित्ताने ज्या सभा आयोजित केल्या जात आहेत, त्याअगोदर बारबालांचे नाच आयोजित करुन लोकांना खिळवून ठेवले जात आहे. सध्या भाजप पैशाच्या जोरावर सत्ता काबीज करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहे, हेच यावरुन दिसते. भाजपला अपेक्षित असलेले परिवर्तन ते हेच अपेक्षित आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मात्र, अशा प्रकारे बारबाला नाचवून व लोकांमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडून सत्ता गाठता येत नाही. आणि, अशा प्रकारे सत्तेत आलेले लोक फार काळ टिकत नाहीत, हे जागतिक वास्तव आहे. सर्वधर्मांना समवेत घेऊन जाणारेच टिकू शकतात. भाजप अशा प्रकारे काही करुन सत्ता काबीज करावयास उत्सुक असताना सध्या सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षातील कर्तेकर्विता असलेल्या यादव घराण्यात उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. तिकडेदेखील काका-पुतण्या नाट्य रंगात आले आहे. मुलायमसिंग यांचे बंधू व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात सध्या तू-तू, मै-मै अशी सतत सुरु असते. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. या भांडणाचा फायदा उठविण्यास भाजप सज्ज झाली आहे. तर मायावती यांचा हत्ती संथपणाने सत्तेच्या दिशेने कूच करीत असल्याचे विविध सर्वेक्षणात आढळले आहे. काँग्रेस मात्र आपल्या जागा किती वाढतील याकडे लक्ष ठेवून आहे. सध्या तरी त्यांच्यासाठी सत्ता दूरच आहे. मात्र, कोणाला पाठिंबा देऊन आपण सत्तेच्या जवळ कसे राहू, याचा ते प्रयत्न जरुर करतील. उत्तर प्रदेशातील ही रणधुमाळी जशी निवडणूक जवळ येईल, तशी आणखी रंगतदार होणार आहे.

0 Response to "उत्तर प्रदेशात रणधुमाळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel