-->
उरीचा बदला...

उरीचा बदला...

संपादकीय पान शनिवार दि. ०१ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
उरीचा बदला...
उरीच्या हल्यानंतर भारत सरकार नेमके कशा प्रकारे त्याला प्रत्यूत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेरीस भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसुन तेथील अतिरेक्यांचे तळ नेस्तनाबूत केले व त्यात सुमारे ४० अतिरेक्यांना कंठस्थान घातले. भारताच्या लष्कराच्या दृष्टीने ही महत्वाची कामगिरी होती. भारतीय  लष्कराच्या सामर्थ्याचा तो अविष्कार होता आणि केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतीय सैन्य देखील अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करु शकते हे जगाला त्यांनी दाखवून दिले आहे. सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये  निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय. साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणार्‍या बॉम्बहल्ल्‌यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होत असते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.रात्रीच्या गर्द काळोखात पाक व्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांच्या छावण्यावर घुसून त्यांचा खातमा करणे व आपल्या सैनिकांचे कोणतेही नुकसान न करता परत येणे हे ऑपरेशन काही सोपे नव्हते. याव्दारे भारताने पाकिस्तानला एक स्पष्ट भाषेत संदेश दिला आहे. हा संदेश असा आहे की, तुम्ही अतिरेक्यांच्या कारवाया केल्यास आता आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला चोख ुत्तर देऊ. भारताच्या या कारवाईमुळे देशाच्या लष्कराचा जगात एक दबदबा निमार्ण झाला आहे.
तसेच भारताच्या या कारवाईला जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेने अतिरेक्यांचा खातमा करण्याच्या घटनेचे स्वागत केले आहे, यावरुन अमेरिकाही सध्याच्या स्थितीत पाकिस्तानच्या बाजूने नाही हे सिद्द झाले आहे. भारताने ही कारवाई करताना अनेक पथ्ये पाळली आहेत. यातील पहिले पथ्य म्हणजे ही कारवाई पाक व्याप्त काश्मिरमध्येच केल्याने भारताने सीमेचे उल्लंघन केलेले नाही. पाकव्याप्त हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमेचे उल्लंघन केले नाही. त्याचबरोबर आपले हे युध्द पाकिस्तान सरकारशी नाही, तर अतिरेक्यांच्या विरोधात आहे. ही कारवाई केवळ तेवढ्यापुरतीच होती, पुढील काळात असे वारंवार कारवाई करण्याचे काही संकेत भारताने दिलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान याचा फारसा मोठा कांगावा करु शकणार नाही. आम्ही युद्धखोर नाही, पण युद्धच करायचे असेल तर आता आम्ही तयार आहोत, हे पाकिस्तानला ठामपणे सांगण्याची आवश्यकता होती. या कारर्वामुळे पाकिस्तानच्या लष्कराला मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे भारताची ही कारवाई नाही तर त्यांनी केवळ गोळीबार केला असा पाक सरकारने कांगावा केला आहे. हे त्यांचे कातडी बचावू धोरण आहे व आपल्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची होऊ नये यासाठी केलेले हे विधान आहे. परंतु यातून नवाझ शरीफ यांचे देशातील स्थान अधिकच डळमळीत होणार आहे. मात्र आता भारताला या कारर्वानंतर अधिकच सतर्क साहावे लागणार आहे. अर्थात अशा कारवाईचे परिणाम असतात व ते टाळता येणार नाहीत. पाकिस्तानच्या  लष्कराची इच्छाशक्ती प्रबळ आहे व त्यांच्याकडे अमेरिकेच्या आशिर्वादामुळे शस्त्रास्त्रांचा साठाही मुबलक आहे. आपण जसा उरीचा बदला घेतला तसा ते या कारवाईचा देखील आज ना उद्या बदला घेण्यासाठी तयारी करणार. मग तो हल्ला थेट असेल किंवा अतिरेक्यांना पाठिशी घालून मागच्या दाराने युध्द खेळण्याचे त्यांचे नेहमीप्रमाणचे डावपेच असतील. त्यामुळे आपल्याला मुंबईसारखा एखादा मागच्या दाराने हल्ला होणार नाही ना यासाठी सतर्क राहावे लागेल. पाकिस्तानी लष्कर सीमेवरुन थेट लष्कर घुसवून हल्ला करण्याचे बहुदा धाडस करणार नाहीत. कारण तसे करण्याचे सध्याच्या स्थितीत त्यांना परवडणारे नाही, याची पाक लष्कराला व सरकारला कल्पना आहे. आपल्याकडे सरकारने अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेतला असला तरी खरे शौर्य हे लष्कराने दाखविले आहे. त्यांच्या कार्याला सलाम हा केलाच पाहिजे. कारण अतिरेक्यांच्या तळांची नेमकी माहिती मिळवून त्यांचा खातमा करणे ही काही सोपी बाब नव्हती. त्यासाठी नियोजन व अंमलबजावणी लष्कराने उत्तमरित्या केले. पाकिस्तान अनेदका आपल्याकडील अणवस्त्रांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धाक दाखवितो. परंतु अशा धमक्यांना भारत घाबरणार नाही, हे कारवाईने ठणकावून सांगण्यात आले आहे. भाजपाच्या या धोरणामुळे एक स्पष्ट झाले की, कॉँग्रेसच्या आजवरच्या धोरणापेक्षा वेगऴे धोरण मोदी सरकार पाकिस्तानच्या बाबतीत अंमलात आणावयास कचरणार नाही, हे आता पाकिस्तानला या कारवाईतून कळविण्यात आले आहे. तेथील लष्कराला, सरकारला व त्यांनी पोसलेल्या अतिरेक्यांसाठी ही एक संदेश ठरणार आहे. मोदी सरकारने ही जी कारवाई केली त्याचे स्वागत हे झाले पाहिजे. त्याचे सर्व श्रेय हे नरेंद्र मोदींकडेच जाते, यात काही शंका नाही. या कारवाईनंतर जनतेमध्ये उत्साहाची एक लाट उसळणे आपण समजू शकतो. सोशल मिडियातही या जोरदार स्वागत झाले आहे. अर्थात भाजपाने याचा राजीकय लाभ उठविण्याचा प्रयत्न करु नये, कारण यात राजकारण आल्यास या प्रश्‍नाची पुन्हा गल्लत होईल. कारण यातून होणार्‍या उन्मादातून प्रखर राष्ट्रवाद आपल्याला जन्माला घालावयाचा नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कारण प्रखर राष्ट्रवादातून अपल्याकडे प्रखर हिंदुत्ववाद पोसला जाण्याचा धोका आहे. देशाविषयी प्रेम असणे, राष्ट्रप्रेम असणे वेगळे व प्रखर राष्ट्रवाद असणे यात फरक आहे, हे सध्याच्या आनंद साजरा करताना लक्षात घेतले पाहिजे.
--------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "उरीचा बदला..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel