-->
सार्कची गाडी घसरली

सार्कची गाडी घसरली

संपादकीय पान शुक्रवार दि. ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सार्कची गाडी घसरली
सध्या भारत व पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध एवढे ताणले गेले आहेत की, उभय देश युद्धाच्या तयारीत आहेत की काय, असा प्रश्‍न पडवा. या पार्श्‍वभूमीवर इस्लामाबाद येथे होऊ घातलेली आठ सदस्य देशांची ही परिषद आता भारताच्या बहिष्कारानंतर होणार नाही, असेच चित्र आहे. पाकिस्तान जे सदस्य येतील त्यांना घेऊन ही परिषद पार पाडण्याचा हेका लावून आहे. परंतु, अशा स्थितीत ही परिषद झाल्यास फारसे त्यातून काही साधले जाणार नाही, हे नक्की. सार्कची आता सध्याच्या स्थितीत गाडी रुळावरुन घसरलेली आहे, ती आता नजीकच्या काळात तरी रुळावर येण्याची चिन्हे नाहीत. सध्या भारत व पाकिस्तानातील संबंध प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहे. अर्थातच, त्याला पाकिस्तान जबाबदार आहे. अशा स्थितीत भारत या परिषदेत सहभागी होणार नाही, हे नक्कीच होते. मात्र, भारताच्या या भूमिकेला बांगलादेश व अफगाणिस्तानने पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे सार्कची ही गाडी पूर्णपणे रुळावरुन घसरली. शीतयुद्ध समाप्त झाल्यावर आशियाई प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांना आपली एक संघटना असणे गरजेचे वाटू लागले होते. त्यातून या संघटनेचा जन्म झाला. युरोपीयन आर्थिक समुदायाच्या धर्तीवर ही संघटना व्हावी, असे गेली दहा वर्षे भारताच्या पंतप्रधानपदी असलेले डॉ. मनमोहनसिंग यांना वाटत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत या संघटनेला तसे वळण देण्याचा प्रयत्नही केला होता. अर्थात, त्यात त्यांना मर्यादित यश आले. या देशांचे चलनही एक असावे, असे त्यांना वाटत होते. अर्थात, तसे झाले असते, तर या देशांच्या आर्थिक उद्धाराला मोठा हातभार लागला असता. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. आज या संघटनेत भारताचे वजन आहे व भारताच्या शब्दाला मान आहे. जगात आर्थिक संकटांचा सामना करण्यात बहुतांशी देश धडपडत असताना, भारताची आर्थिक स्थिती अजूनही चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे सार्कची भारताला गरज वाटत नाही. मात्र, सार्कमधील लहान देशांना ही संघटना हवी आहे व त्या जोडीला भारताचे सहकार्यही पाहिजे आहे. मात्र, पाकिस्तानला धडा शिकविताना व त्यांना एकटे पाडताना सार्कच्या अन्य सदस्यांना आपलेसे करावे लागणार आहे.

Related Posts

0 Response to "सार्कची गाडी घसरली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel