-->
अखेर आरोपपत्र दाखल

अखेर आरोपपत्र दाखल

संपादकीय पान सोमवार दि. १० ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
अखेर आरोपपत्र दाखल
संपूर्ण राज्यात खळबळ माजविणार्‍या कोपर्डी येथील शालेय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्याप्रकरणी आता ८५ ददिवस उलटून गेल्यावर अखेर आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे आरोपपत्र दाखल करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल सरकारवर निशाणा साधला जात होता. मात्र हा गुन्हा झाला त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लवकरच आरोपपत्र दाखल करण्याचे व आरोपींना फाशीची कडक शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे म्हटले होते. परंतु आता तीन महिन्यात जर हे आरोपपत्र सादर झाले नसते तर हे आरोपी सुटण्याची शक्यता होती. मात्र सरकारने अखेर दबावानंतर या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. मराठा संघटनांच्या विविध मोर्च्यात या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल केले असून हा खटला सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवतील. दोषारोपपत्रात जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरक्ष भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे हे आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध अमानुष अत्याचार, हत्या व बाल लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रात परिस्थितीजन्य, सबळ पुरावे व प्रत्यक्षदर्शी असे एकूण ७० साक्षीदार आहेत. तसेच ३९ प्रकारचा मुद्देमाल पकडल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीला ठार मारल्यामुळे कलम ३०२, अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी कलम ३७६ (अ), कलम ४ व ६, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम आरोपींवर लावण्यात आले आहे. यात आणखी आरोपी आढळल्यास १७३ (८) प्रमाणे त्यांचे जबाब घेऊन त्यांना आरोपी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने १३ जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोपर्डीतील शालेय मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. त्यास १५ जुलै रोजी श्रीगोंदे येथून अटक करण्यात आली. या घटनेत एकच आरोपी असावा असा पोलिसांचा प्रारंभी कयास होता. त्यामुळे शिंदे याचे साथीदार संतोष व नितीन दुर्लक्षित राहिले होते. मात्र नंतर चौकशीअंती यात आणखी आरोपी असल्याचे आढळले. तसे पाहता हे आरोपपत्र बरेच उशीरा दाखल झाले आहे. हा विलंब का, ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही अहवाल आले नसल्याचे पोलिस खासगीत सांगत होते. या प्रकरणात शिंदेला अटक झाल्यानंतर तो एकटाच नव्हे, एकूण तीन आरोपी आहेत, असा ग्रामस्थांचा दावा होता. इतर दोघांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी दबाव वाढवल्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी नितीन भैलुमे यास १६ जुलै, तर तिसरा आरोपी संतोष मवाळ यास १७ जुलैला अटक केली. दरम्यानच्या कालावधीत या प्रकरणाला जातीय रंग येऊ लागल्याने गांभीर्य वाढले. राज्यातील प्रमुख नेत्यांनी कोपर्डीला भेट दिल्यावर तेथील वातावरणत तापले. ज्यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल केले त्यावेळी त्यांच्यावर अंडी व चपला फेकण्यात आल्या. त्यामुळे या आरोपींविरुध्द असलेला असंतोष उघड झाला. सरकारने आता हा खटला फास्ट ट्रकवर चालवून आरोपींना कडक शासन कसे होईल त्यादृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.

0 Response to "अखेर आरोपपत्र दाखल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel