-->
मुख्यमंत्री महोदय, करुन दाखवा!

मुख्यमंत्री महोदय, करुन दाखवा!

संपादकीय पान मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
मुख्यमंत्री महोदय, करुन दाखवा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यात लाखोंच्या संख्येने निघत असलेल्या मोर्चामुळे घायाळ झालेले दिसतात. शेवटी त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका जाहीर करुन आपले मौन सोडले. गेले दोन महिने सरकारला प्रत्येक जिल्ह्यात या मोर्चाची धडक बसत आहे. बरे, हे मोर्चे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीत, कोणतेही हिंसक वर्तन ते करीत नाहीत, अतिशय शिस्तप्रिय मोर्चे निघत असल्यामुळे सरकारची मोठी गोची झाली आहे. सुरुवातीच्या काळात या मोर्चाच्या मागे कुणीतरी राजकीय शक्ती कार्यरत असावी असे समजून व ब्राह्मण मुख्यमंत्री असल्याने मराठ्यांना सत्ता काबीज करण्याच्या हेतूने हे मोर्चे निघत असल्याचा अंदाज सरकारचा व काही त्यांच्या पत्रपंडित सल्लागारांचा होता. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील मराठा नेत्यांची बैठक बोलाविली व चर्चा केली. अशा प्रकारे या मोर्चेकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न सरकारकडून झाला. परंतु, मोर्चेकर्‍यांची एकजूट अभेद्य होती. कारण, हे मोर्चे अधिक व्यापक स्वरुपात निघू लागले व त्यात कुणी राजकीय शक्ती नसल्याचे उघड झाले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची व सत्ताधारी भाजप-शिवसेनेची पायाखालची वाळू सरकू लागली. आता माथाडी कामगारांच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण हवेच आहे, अशी भूमिका मांडली. अशा प्रकारे ठोस भूमिका सरकारतर्फे प्रथमच मांडली गेली. खरे तर, सरकारने केवळ घोषणा करायच्या नसतात, तर त्याची अंमलबजावणी कशी करणार त्याचा आराखडा तयार करायचा असतो. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा जरुर केली, मात्र त्याची अंमलबजावणी कशा मार्गाने करणार त्याचा काहीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अशाप्रकारे घोषणा करावयाची व भविष्यातील मोर्चातील हवा काढून घ्यायची, असा राजकीय डावही भाजपचा व त्यांच्या मागे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण नेमके कसे देणार व त्यासाठी कोणत्या कायद्यात बदल करणार, हेदेखील जाहीर करण्याची आवश्यकता आहे. फडणवीस महाशय सध्या या मोर्चांमुळे पूर्णपणे हतबल झाल्यासारखे झाले आहेत. मराठ्यांना राजकीय सत्ता पाहिजे असल्यामुळे हे मोर्चे निघत असल्याचे त्यांचे सल्लागार सांगत असले, तरी त्यांना आता ते पटलेले नाही. त्यामुळे आरक्षण देण्याची त्यांनी केलेली घोषणा ही मराठ्यांच्या प्रेमापोटी नाही तर आपल्या खुर्चीला जे हादरे बसत आहेत, ते सौम्य करण्यासाठी केली आहे. मात्र, आता जनता शहाणी झाली आहे. जर आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, तर मतपेटीतून त्याचे पडसाद लगेच उमटतात, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.

0 Response to "मुख्यमंत्री महोदय, करुन दाखवा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel