-->
शोषितांच्या कैवारी

शोषितांच्या कैवारी

संपादकीय पान शनिवार दि. ३० जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शोषितांच्या कैवारी
ढाक्यात जन्मलेल्या प्रख्यात बंगाली लेखिका महाश्‍वेतादेवी यांचे गुरुवारी ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने कष्टकरी, शोषितांच्या बाजूने उभ्या राहाणार्‍या व आपल्या साहित्यातून त्यांची दु:खे मांडणार्‍या एक प्रतिभावान लेखिका काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांनी आजवर आपल्या साहित्यातून जी पात्रे रंगवली त्यातून समाजात जागृती करण्याचा हेतू होता. शोषितांची बाजू घेऊन त्यांनी नेहमीच आपले साहित्य गुंफले. मानवी हक्कंची चाड असणारे लिखाण त्यांच्या हातून घडले. महाश्‍वेतादेवींनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी लेखन केले आणि हेच त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य ठरले. ढाक्यात जन्मलेल्या महाश्‍वेतादेवींना साहित्याचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडिल हे प्रसिध्द कवी, कादंबरीकार होते तर त्यांचे काका चित्रपट निर्माते. तर त्यांचा आई धरित्रीदेवी या लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालपणापासून त्यांच्या मनात रविद्रनाथ टागोरांचे पुरोगामी विचार रुजविले गेले. यातूनच त्या पुढे इफ्टा चळवळीशी जोडल्या गेल्या. याच चळवळीत असलेल्या प्रसिद्द नाटककार बिजॉन भट्टाचार्यांशी त्यांचा विवाह झाला. मात्र त्यांचा विवाह काही टिकला नाही. त्यांचा १९५९ साली भट्टाचार्य यांच्यशी घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर महाश्‍वेतादेवी यांनी विजयगड महाविद्यालयात अध्यापनाचे काम सुरु केले. याच काळात त्यांनी पत्रकारिताही केली. एकीकडे अध्यान करीत असताना त्या बिहार, मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील आदिवासींशी जोडल्या गेल्या. दलित, आदिवासींच्या चळवळीत त्या सक्रिय काम करु लागल्या. तेव्हापासून त्यांनी शोषितांच्या बाजूने सुरु ठेवलेला लढा कायम ठेवला. अलिकडे पश्‍चिम बंगाल सरकारने शेतकर्‍यांच्या सुपिक जमिनी देऊन औद्योगिकीरण करण्याच घाट घातला होता. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. शांतिनिकेतनच्या बाजारीकरणालाही त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांचे हे दोन्ही लढे आपल्या वयाच्या ८०व्या वर्षी लढविले आणि त्यात त्यांना यश आले. त्यांच्या कार्याचा शासनाने वेळोवेळी विविध सन्मान देऊन गौरव केला. साहित्या अकादमी पुरस्कार, पद्मश्री, ज्ञानपीठ पुरस्कार, मॅगेसेसे पुरस्कार, पद्मविभूषण, बंगाभूषण या सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातींमध्ये त्यांनी काही काळ काम करुन त्यांच्या विषयी माहिती करुन घेतली होती. भटक्या विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी लातूर, परभणी, अंबेजोगाई, नांदेड, उस्मानाबाद अशा ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांच्यातील मातृत्वाचा झरा लक्षात घेता आदिवासी, कष्टकरी, दलित त्यांना मॉँ या नावानेच हाक मारीत. त्यांनी नक्षली चळवळीचाही जवळून अभ्यास केला होता. नक्षलवाद्यांवरील हजार चौरासिर मॉँ ही त्यांची कादंबरी गाजली होती. अऱण्येर अधिकार ही देखील नक्षलवाद्यांवरील त्यांची कादंबरी होती. झासिर राणी ही त्यांची पहिली कादंबरी. ही त्यांनी वयाच्या २८व्या वर्षी लिहली. वयाच्या ५५ व्या वर्षानंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. एका बंगाली दैनिकात त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या सक्रिय होत्या. तरुणपणात त्यांनी कष्टकरी, शोषितांच्या बाजूने उभे राहाण्याचे व्रत घेतले होते ते शेवटपर्यंत विविध माध्यमातून जोपासले.

0 Response to "शोषितांच्या कैवारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel