-->
हरहुन्नरी कलाकार

हरहुन्नरी कलाकार

संपादकीय पान शनिवार दि. ३० जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हरहुन्नरी कलाकार
आपल्या अर्धशतकाहून जास्त काळ रंगभूमी, चित्रपट, मालिका, लघुपट यात आपल्या विविध भूमिकांनी स्मरणात राहिलेले नंदू पोळ यांचे पुण्यात वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या विनोदी भूमिका प्रामुख्याने गाढवाचं लग्न यातील राजाची भूमिका अजरामर झाली आहे. या भूमिकेने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भूताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी अनेक मालिकातून कामे केली होती. नाजुका, प्रवासी, अडोस-पडोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायापालट या मालिकेतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी आपल्या अभिनयास बाल कलाकार म्हणून सुरुवात केली. सष्टांग नमस्कार या नाटकात त्यांनी बाल कलाकार म्हणून सर्वात पहिल्यांदा काम केले. घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा, महानिर्वाण या नाटकात त्यांनी लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांची अनेक वेळा लहान भूमिका असली तरी प्रेक्षकांच्या मनात ठसल्या आहेत, हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले. घाशीराम कोतवालमध्ये त्यांनी नाटकाच्या प्रारंभीच नांंदीमध्ये केलेल्या अभिनयामुळे प्रेक्षवांचे लक्ष वेधून घेत. अनेक नाटकात, सिनेमात त्यांनी नामवंत नटांबरोबर कामे केली. केवळ मराठीच नव्हे तर कन्नड, गुजराथी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिका अतिशय छोट्या असल्यातरी प्रक्षकांच्या मनात ठसल्या आहेत. थिएटर ऍकेडमीचे ते संस्थापक सदस्य होते. ते एक उत्कृष्ट ध्वनिमुद्रण तज्ज्ञ होते. त्यांनी ध्वनीमुद्रणाचा स्टुडियो काढला होता. गणपती देखाव्यातील शब्द-सूर ध्वनींमध्ये गुंफविण्यासाठी ते रात्रीचे दिवस करीत. अनेक वर्षे ते हे काम मोठ्या नेकीने करीत असत. त्याचबरोबर गप्पांचा फड जमविणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. कितीही मोठा कलाकार असो ते त्याला आपल्या गप्पांनी खिळवून ठेवत. चित्रपट हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे त्यावरील गप्पा यात त्यांचा हातखंडा होता. सतत हसतमुख, सदैव मदतीला तत्पर आणि गप्पांच्या मैफिलेतील एक हुकमाचा एक्का असे त्यांचे वर्णन नेहमी सिनेसृष्टीत केले जाई. मराठी चित्रपटसृष्टीतील ही वामनमूर्ती सर्व रसिकांच्या मनात छाप ठेवून आता आपल्यातून निघून गेली आहे.

0 Response to "हरहुन्नरी कलाकार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel