-->
भाजपाला घरचा आहेर

भाजपाला घरचा आहेर

संपादकीय पान सोमवार दि. ०९ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भाजपाला घरचा आहेर
भाजपाचे नरेंद्र मोदी यांचे सरकार आता अनेकांकडून टीकेचा विषय झाले आहे. विरोधकांची या सरकारवर होणारी टीका आपण एकवेळ बाजूला ठेवू परंतु भाजपातील जुन्या धुरणींनी या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केल्याने आश्‍चर्य वाटते. यापूर्वी यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांनी वेळोवेळी टीका केल्या आहेत. आता या रांगेत अरुण शौरी देखील आले आहेत. एकेकाळचे ज्येष्ठ पत्रकार व माजी केंद्रीय मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी आता नरेंद्र मोदींवर जोरदार आगपाखड केली आहे. अरूण शौरी यांनी नरेंद्र मोदी हे एकानुवर्ती अध्यक्षीय सरकार चालवत असल्याची टीका केली आहे. ही दिशा देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या शौरींनी इंडिया टुडे या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्यक्षीय पद्धतीचे सरकार मोदी चालवत असून समतोल साधण्याची यंत्रणा नसल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकारची गेल्या दोन वर्षातली कामगिरी आपण नीट न्याहाळली असून येत्या तीन वर्षांमध्ये मानवी हक्कांवर गदा येण्याचा धोका असल्याचा इशारा शौरींनी दिला आहे. आपल्याला सोयीस्कर नसलेल्या मतांची गळचेपी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होईल असेही त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी व जयललिता यांचा दाखला देत त्यांच्याप्रमाणेच मोदी देखील आत्मकेंद्रीत असल्याचा टीका शौरींनी केली आहे. असुरक्षितता, स्वत:च्या प्रेमात गुंतून राहणे आणि सगळ्या घटनांमधून वैयक्तिक लाभ मिळवत राहणे ही मोदींची वैशिष्ट्‌ये असल्याचे शौरींनी म्हटले आहे. याआधीही शौरींनी मोदींवर शरसंधान केलं होतं. लोकांचा वापर करायचा आणि त्यांना बाजुला फेकून द्यायचं ही मोदींची कार्यशैली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी माणसांना पेपर नॅपकिनप्रमाणे वापरतात, आणि त्याबद्दल त्यांना जराही खेद नसतो असेही शौरींनी म्हटले आहे. शौरींनी केलेली टीका ही अत्यंत जहरी आहे व  यातून मोदींचे पक्षांतर्गत विरोधक आता किती त्यांच्या विषयी कठओरपणे बोलतात हे स्पष्ट जाणवते. यातून भाजपाला घरता आहेरच मिळाला आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "भाजपाला घरचा आहेर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel