-->
मुंबईवर प्रभूकृपा

मुंबईवर प्रभूकृपा

संपादकीय पान शनिवार दि. २३ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुंबईवर प्रभूकृपा
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणचे सुपुत्र असले तरी त्यांची कर्मभूमी ही मुंबईच राहिली आहे. त्यामुळे त्यंना मुंबईतील चाकरमन्यांचे प्रश्‍न चांगलेच माहित आहेत. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून जीच्याकडे पाहिले जाते त्या लोकल्सवरील वाढता ताण लक्षात घेता त्यात काही तरी तातडीने सुधारणा व नवीन प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीसाठी हाती घेणे गरजेचे आहे. हे अर्थातच प्रभू यांनी नेमके हेरले व त्यादृष्टीने काही महत्वाचे विस्तार प्रकल्प हाती घेतले आहेत. नुकत्याच त्यांनी मुंबईतील आपल्या दौर्‍यात या प्रकल्पांची घोषणा केली. त्यांच्या या घोषणांचे स्वागत व्हावे. तसेच राज्यातील रेल्वेचे प्रदीर्घ काळ रखडलेले नऊ प्रकल्प त्यांनी मार्गी लावण्याची घोषणा केली आहे. येत्या चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. मुंबईतील सी.एस.टी. ते पनवेल, चर्चगेट-विरार हे दोन्ही मार्ग एलिव्हेटेड करणार, सी.एस.टी. ते चर्चगेट भूमीगत रेल्वे करणार, हार्बरवर कॅब सिग्नल यंत्रणा, एसी लोकल हे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यातील पहिली एसी लोकल येत्या मे महिन्यात धावेल. आजवर रेल्वेमंत्री पद हे महाराष्ट्राच्या वाट्याला फारच कमी वेळा लाभले. यापूर्वी एकदा राम नाईक यांच्या रुपाने हे पद राज्याच्या वाट्याला आले होते. परंतु राम नाईक यांनी राज्याच्या रेल्वे विकासासाठी फारसे लक्षणीय काम केलेच नाही. त्यामुळे आता सर्व लक्ष सुरेश प्रभू यांच्यावर लागले आहे. रेल्वेमंत्री हे कोणत्या राज्याचे नसतात ही वस्तुस्थीती असली तरीही ज्या राज्याचा रेल्वेमंत्री असतो तो बरेचदा झुकते माप आल्या राज्याला देतो. त्यात काही त्याचे चुकते असेही नाही. प्रभूंकडून त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या त्यांनी मुंबई, राज्यासाठी आखलेल्या योजना पाहता प्रभूंची कृपा आपल्यावर होते आहे असे म्हणता येईल. गेल्या दोन दशकांपूर्वी मुंबईत मेट्रो, मोनो, रेल्वेचे जाळे उभारुन सार्वजनिक वितरण व्यवस्था युरोपच्या धर्तीवर उभारण्याची गरज होती. परंतु आपण त्याकडे नेहमीच दुलर्क्ष केले. त्यातून मुंबईतील वाहानांची गर्दी वाढल्यावर सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता जाणवू लागली. आता उशीरा का होईना गेल्या पाच वर्षात सरकारला जाग आली व त्यातून मेट्रो व मोनो प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली. आता जर त्यात रेल्वे प्रकल्प चांगले उभारले तर मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो. सुरेश प्रभू यांनी हे प्रकल्प पुढील साडेतीन वर्षात मार्गी लावल्यास मुंबईकर जनता त्यांना खर्‍या अर्थाने दुवा देईल.
--------------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मुंबईवर प्रभूकृपा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel