-->
क्रांतीकारी निर्णय्

क्रांतीकारी निर्णय्

संपादकीय पान शुक्रवार दि. १ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
क्रांतीकारी निर्णय्
सध्या शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन रण माजले असताना मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी एक महत्वाचा क्रांतीकारी निकाल दिला आहे. ज्या धार्मिक ठिकाणी अथवा मंदिरात पुरुषांना प्रवेश मिळतो तेथे महिलांनाही प्रवेश मिळायलाच पाहिजे. कायद्याने महिलांना मंदिरात जाणे नाकारता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायलयाने मांडले आहे. राज्य सरकारने याबाबत दोन दिवसात स्पष्टीकरण द्यावे असेही उच्च न्यायालयाने बजावले आहे. त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरच नव्हे तर इतर ठिकाणीही महिलांना प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर काही मंदिरात महिलांना प्रवेश आहे तर पुरुषांना नाही अशा ठिकाणीही पुरुषांना प्रवेश मिळेल. शनिशिंगणापूर येथील शनि मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो. दोन-तीन महिन्यापूर्वी एका महिलेने शनिच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. त्यानंतर शनिला विटाळ झाले असे सांगत मंदिर ट्रस्टी समितीने दुधाचा दुग्धाषिशेक घातला. यानंतर काही महिला संघटना आक्रमक झाल्या. तसेच महिलांना का प्रवेश मिळत नाही यावरून आंदोलन केले. यावरून राज्यात बराच गदारोळ झाला. हा वाद सुरु असतानाच पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने वरील मत मांडले. मुंबईच्या वरळी समुद्र किनार्‍यावर हाजी अली शाह बुखारी यांचा दर्गा आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक येतात. परंतु, या दर्गातील गाभार्‍यातही महिलांना प्रवेश नाही. महिलांना येथे प्रवेश द्यावा, अशी जुनी मागणी आहे. नुकतीच काही मुस्लिम महिलांनी यासंबंधी निदर्शनेही केली होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातच्या गाभार्‍यातही महिलांना प्रवेश नाही. येथे प्रवेश मिळावा, यासाठी ७ मार्चला भूमाता ब्रिगेडने आंदोलन केले होते. जसा काही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो तसा काही देवींच्या मंदिरांमध्ये पुरुषांनाही प्रवेश नाकारला जातो. पुष्कर येथील रत्नागिरी पर्वतावर असलेल्या सावित्रीदेवीच्या मंदीरातही पुरुषांना प्रवेश नाही, तेथे केवळ महिलांनाच प्रवेश आहे. तसेच विशाखापट्टणम येथील कामाख्खी मंदिरातही फक्त महिलांना प्रवेश आहे व तेथे पुजारीही महिलाच आहेत. आता मात्र देवळातील प्रवेशांबाबत केला जाणारा हा लिंगभेद न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात येईल. धार्मिक देवस्थान मग ते कोणत्याही धर्मियांचे असो तेथे पुरुष व स्त्री अशा दोघांनाही प्रवेश दिला गेला पाहिजे. अर्थात यासाठी आपल्याला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात व त्यांच्या निकालामुळे मंदिरातील हा लिंगभेद दूर होतो हे आपल्याला लाजीरवाणेच आहे.

0 Response to "क्रांतीकारी निर्णय्"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel